सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, म्हणजे सनातनचा विजयोत्सव !

‘१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. या महोत्सवात ३० सहस्रांहून अधिक साधक, जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या महोत्सवाचे आध्यात्मिक यश या लेखात थोडक्यात दिले आहे.

(भाग १)

१. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामुळे झालेला आध्यात्मिक लाभ

१ अ. आध्यात्मिक संस्थांचे कार्य लंबरेषेत (व्हर्टिकल) आणि क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल), असे दोन प्रकारे होऊ शकणे : आध्यात्मिक संस्थांचे कार्य सूक्ष्म स्तरावर दोन प्रकारचे होऊ शकते. एक म्हणजे लंबरेषेत (व्हर्टिकल), म्हणजे भूलोकातून वरच्या वरच्या सूक्ष्म लोकांत पसरणारे आणि दुसरे क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल), म्हणजे भूलोकातील जिवांमध्ये पसरणारे.

श्री. निषाद देशमुख

बर्‍याचशा आध्यात्मिक संस्थांचे कार्य हे शक्तीप्रधान असल्याने ते केवळ क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल) असते. त्यामुळे अशा संस्थांचे कार्य पहिल्या ५ – १० वर्षांतच स्थूल विश्वात पुष्कळ भरारी घेते; पण त्यांना सूक्ष्म उच्च लोकात कार्यरत असलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा पाठिंबा नसतो. त्यामुळे त्या संस्था समाजाच्या सात्त्विकतेत वाढ करण्यात फारसे यशस्वी होऊ शकत नाहीत.

याउलट अत्यंत अल्प संस्थांचे कार्य प्रथम ऊर्ध्वगामी किंवा लंबरेषेत (व्हर्टिकल) वाढते आणि एका टप्प्यापर्यंत ऊर्ध्वगामी स्तर गाठल्यावर पुढे २० ते ३० वर्षांनी त्या संस्थेचे कार्य स्थुलातून चैतन्याच्या स्तरावर क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल) होऊन विश्वव्यापी होते आणि सहस्रो वर्षे टिकते, उदा. आद्य शंकराचार्य यांचे कार्य. हे कार्य मुळात चैतन्याच्या स्तरावर असल्याने ते शक्तीप्रधान नसून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज युक्त असते.

१ आ. आध्यात्मिक संस्थांनी प्रथम क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल) कार्य करण्यातील तोटा : आध्यात्मिक संस्थांनी स्थापनेनंतर पहिली काही वर्षे क्षितिजाला समांतर रेषेत कार्य केल्यावर त्यांच्यात कार्यरत असलेली आध्यात्मिक ऊर्जा कार्य यशस्वी होण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे संस्थेच्या आरंभीच्या काही वर्षांत संस्थेत सहभागी होणार्‍यांना अनुभूती येतात. पुढे त्या संस्थेत साधना करणार्‍यांना पुढच्या टप्प्याच्या अनुभूती येत नसल्याने काही वर्षांनी त्या संस्थेच्या कार्याची गती मंदावते. क्षितिजाला समांतर रेषेत कार्य करणार्‍या एखाद्या आध्यात्मिक संस्थेचे कार्य सनातन हिंदु धर्माच्या उत्थानाच्या दिशेने होत असल्यास तिच्या विविध प्रचारकांवर मोठ्या वाईट शक्ती आक्रमणे करून त्यांना आध्यात्मिक त्रास देतात. त्यामुळे समाजात त्यांची आणि संस्थेची अपकीर्ती करणे वाईट शक्तींसाठी अत्यंत सोपे होते. अशा संस्था शक्तीप्रधान असल्याने मोठ्या वाईट शक्तींचे ज्ञानयुक्त आक्रमण सहन करण्याची शक्ती त्यांच्यात नसते. त्यामुळे काही वर्षांनी ती आध्यात्मिक संस्था शिकवत असलेली साधना किंवा कार्य यांसंदर्भात समाजात विकल्प आणि संभ्रम निर्माण होऊन त्या संस्थेचे कार्य फारसे पुढे जात नाही.

१ इ. वर्ष २०२४ पासून सनातनचे कार्य आकाशतत्त्वाच्या स्तरावर पाेचणे आणि त्यामुळे ते लंबरेषेसह क्षितिजाला समांतर रेषेतही चालू होणे : ऊर्ध्वगामी किंवा लंबरेषेत (व्हर्टिकल) चालू असलेले सनातन संस्थेचे कार्य पृथ्वी, आप, तेज आणि वायु, या तत्त्वांना ओलांडून वर्ष २०२४ पासून आकाशतत्त्वाच्या स्तरावर पोचले आहे. आकाशतत्त्व हे सर्वव्यापक असते. त्यामुळे आकाशतत्त्वाच्या स्तरावरील कार्य एकाच वेळी ऊर्ध्वगामी (व्हर्टिकल) आणि क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल), या दोन्ही स्तरांवर होते. ऊर्ध्वगामी कार्यात आध्यात्मिक अनुभूती देऊन समाजाच्या सात्त्विकतेत वाढ करण्याची क्षमता असते, तर क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल) होणारे कार्य समाजाभिमुख, म्हणजे समाजातील अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणारे, असे असते. वर्ष २०२३ – २०२४ पासून सनातन संस्थेकडून काही प्रमाणात आकाशतत्त्वाच्या स्तरावर कार्य होणे आरंभ झाले आहे. त्यामुळे ‘वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा केला जाणे, ३० नोव्हेंबर २०२४ या दिवशी स्वामी गोविंददेव गिरि यांच्या सत्काराचा कार्यक्रम, वर्ष २०२५ मधील कुंभमेळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची रथयात्रा होणे’ इत्यादी आध्यात्मिक महत्त्व असलेल्या कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन झाले. या कार्यक्रमांत सहस्रो लोक सहभागी होते आणि त्यांना आध्यात्मिक स्तराच्या अनुभूतीही आल्या. यातून हा कार्यक्रम आकाशतत्त्वाशी निगडित असल्याचे सिद्ध होते.

१ ई. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या माध्यमातून सनातनचे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या संगमाने युक्त असे कार्य होणे : या शृंखलेत झालेले कार्यक्रम प्राधान्याने ब्राह्मतेजयुक्त होते, तर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या संगमाने युक्त असे होते. त्यामुळे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातून एकीकडे ब्राह्मतेजाच्या बळावर सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल) पूर्ण भूलोकात पसरण्यास साहाय्य झाले, तर क्षात्रतेजाच्या बळावर पूर्ण विश्वात सनातन (हिंदु) राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी जगताची (पृथ्वीची) कुंडलिनीशक्ती जागृत करण्याच्या कार्याचा शुभारंभ झाला.

१ उ. शंखनाद महोत्सवात धर्मरक्षक आणि धर्माच्या उत्थानाचे कार्य करणारे संत एकत्रित आल्याने जगताची कुंडलिनीशक्ती जागृत होणे : समष्टी संत काळाची पावले ओळखून कार्य करत असतात. त्यांनी केलेल्या कार्याचे फळ काही वर्षांनी स्थुलातून दिसून येते. भविष्यकाळाची स्थिती ओळखून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘सनातन राष्ट्र शंखनादा’सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमाचा आध्यात्मिक परिणाम असा आहे की, ज्याप्रमाणे व्यक्तीच्या देहातील डाव्या बाजूला असणारी चंद्रनाडी आणि उजव्या बाजूला असणारी सूर्यनाडी एकत्रितपणे कार्यरत झाल्यावर जिवाची सुषुम्नानाडी चालू होते, त्याप्रमाणे समाजपुरुषाची डावी बाजू म्हणजे सनातन धर्माचे रक्षण करणारे धर्मवीर आणि समाजपुरुषाची उजवी बाजू म्हणजे सनातन धर्माच्या उत्थानाचे कार्य करणारे संत, हे एका व्यासपिठावर एकत्रित आल्यावर समाजपुरुषाची सुषुम्नानाडी चालू होते, म्हणजे जगताची (पृथ्वीची) सुषुम्नानाडी चालू होते. सनातन धर्माचे रक्षण करणारे धर्मवीर आणि सनातन धर्माच्या उत्थानाचे कार्य करणारे संत एकत्रित येणे, म्हणजे पुरुषार्थी लोकांचे संघटन होणे. हेच कार्य सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात साध्य केले गेले आहे. त्याचे स्थूल परिणाम पुढे काही वर्षांनंतर समाजात दिसून येणार आहेत.

२. अध्यात्मप्रसार आणि सनातन राष्ट्र-स्थापनेचे कार्य रोखण्यासाठी वाईट शक्तींनी तीव्र आक्रमण करणे; पण गुरु, संत आणि देवता यांच्या कृपेमुळे त्यांना यश न येणे

२ अ. वर्ष २००९ मध्ये सनातनचे ऊर्ध्वगामी कार्य रोखण्यासाठी मोठ्या वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर मरणांतिक आक्रमण करणे : वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे कार्य पहिली ४ – ५ वर्षे अन्य संस्थांप्रमाणे क्षितिजाला समांतर रेषेत (हॉरिझॉन्टल) होते. हे कार्य रोखण्यासाठी वाईट शक्तींनी वर्ष २००१ पासून आक्रमणे करणे चालू केले. या आक्रमणांना परतवण्यासाठी सनातन संस्थेचे कार्य हळूहळू अधिक प्रमाणात ऊर्ध्वगामी किंवा लंबरेषेत (व्हर्टिकल) होत गेले. सनातनचे कार्य ऊर्ध्वगामी होतांना स्वर्गलोक पार करून पुढच्या सूक्ष्म लोकात कार्यरत होत होते. त्यामुळे हे कार्य रोखण्यासाठी वर्ष २००९ मध्ये बलाढ्य वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मृत्यू होईल, एवढे तीव्र आक्रमण केले. या आक्रमणातून सनातनचे ऊर्ध्वगामी कार्य रोखण्याचा बलाढ्य वाईट शक्तींचा उद्देश होता.

२ आ. सनातनचे क्षितिजाला समांतर रेषेतील अध्यात्मप्रसाराचे आणि सनातन राष्ट्राच्या पुनर्स्थापनेचे कार्य रोखण्यासाठी वाईट शक्तींनी शंखनाद महोत्सवात जीवित हानीच्या उद्देशाने तीव्र आक्रमणे करणे : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे एकीकडे अध्यात्मप्रसाराच्या कार्याला गती मिळाली, तर पूर्ण विश्वात सनातन राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेसाठी शक्तीपातासारखी प्रक्रिया घडून जगताची (पृथ्वीची) कुंडलिनीशक्ती जागृत करण्याच्या कार्याचा शुभारंभ झाला. त्यामुळे जसे सनातनचे ऊर्ध्वगामी, म्हणजे उच्च लोकांतील कार्य रोखण्यासाठी पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी तीव्र आक्रमण केले होते, तसे सनातन संस्थेचा क्षितिजाला समांतर रेषेतील (हॉरिझॉन्टल) अध्यात्मप्रसार आणि सनातन राष्ट्राची पुनर्स्थापना हे कार्य रोखण्यासाठी वाईट शक्तींनी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात जीवित हानी होईल, एवढी तीव्र आक्रमणे करून अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी केलेले आक्रमण अतिभयंकर असूनही सनातनचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे तिन्ही गुरु, विविध संत आणि देवता यांच्या कृपेमुळे वाईट शक्तींचे षड्यंत्र निष्फळ झाले.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १८.५.२०२५)

लेखाचा भाग २ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/940637.html

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.