देशी गोवंशाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण यांसाठी कार्यरत ‘महाराष्‍ट्र गोसेवा आयोग’ !

७ जुलै २०२३ या दिवशी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना झाली. त्याचा उद्देश देशी गोवंशाचे जतन (गो-संगोपन), संवर्धन आणि संरक्षण करणे हा आहे. ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’च्या वतीने राज्यात २२ जुलै या दिवशी ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने आयोगाचा उद्देश, गोवंशाचे संवर्धन होण्यासाठी करण्यात येणार्‍या सध्याच्या आणि भविष्यातील योजना यांविषयी ‘महाराष्‍ट्र राज्‍य गोसेवा आयोगा’चे अध्‍यक्ष श्री. शेखर मुंदडा यांच्याशी झालेल्या वार्तालापातील माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

श्री. शेखर मुंदडा

१. ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन’ दिन साजरा करण्याचा उद्देश

१ अ. गोवंश जतन : देशी गायींचे प्रमाण अल्प झाल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. परिणामस्वरूप रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. ऑक्सिजनचे प्रमाण न्यून होणे, आपली रोगप्रतिकारकशक्ती न्यून होणे, कर्करोगाचे प्रमाण वाढणे इत्यादी काही उदाहरणे सांगता येतील. ‘सेंद्रिय शेती’ ही केवळ देशी गोवंशाच्या आधारावर होऊ शकते; म्हणून त्यांचे जतन आवश्यक आहे.

१ आ. गोवंश संवर्धन : शेतकर्‍यांना गोवंशाचे संवर्धन करणे खर्चिक झाल्याने तो गाय कसायाला विकतो. तसे होऊ नये म्हणून त्यांना विनंती आहे की, तो गोवंश गोशाळेला द्या. गोशाळांना त्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.

१ इ. गोवंश संरक्षण : महाराष्ट्र राज्यात शासनाने ‘गोवंशहत्या बंदी’ कायदा लागू केला आहे, तसेच गायीला ‘राज्यमाता’ घोषित करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाला आदेश देऊन गोहत्या करणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या त्रिसूत्रींची जागरूकता नागरिकांमध्ये यावी, यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

श्री. जयेश बोरसे

२. देशी गोवंशाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करणे !

शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन यांसाठी राज्यातील नोंदणीकृत ७ गोवंशियांच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत. खिल्लार, देवणी, लाल कंधार, डांगी, गवळऊ, कोकण कपिला आणि कठाणी, तसेच देशातील नोंदणीकृत उत्कृष्ट गोवंश असलेल्या गीर, थारपारकर, काँक्रेज, ऑगल, हलीकर अशा गोवंशियांचाही सांभाळ राज्यात केला जातो.

देशी गायींच्या संख्येत घट होण्यामागे संकरित गायींच्या तुलनेत असलेली अल्प उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता आहे. ही कारणमीमांसा लक्षात घेऊन देशी गायींची संख्यात्मक वाढ करण्यासमवेत गुणात्मक वाढ करण्यासाठी त्यांची प्रजननक्षमता आणि उत्पादनक्षमता वाढवून उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक ठरते.

३. मनुष्यासाठी ‘वैद्य’ असणारी गोमाता !

गोवंश संवर्धन, ही काळाची आवश्यकता आहे. गाय ही मनुष्यासाठी ‘वैद्य’सुद्धा आहे, तसेच घराचे मंदिर करणारी ‘माता’सुद्धा आहे. घरात कुणी आजारी असेल, तर त्या लहरी गायीला जाणवतात आणि जेव्हा ती चरण्यासाठी रानात जाते, तर त्या व्यक्तीला आवश्यक अशा वनस्पती खाते जेणेकरून त्याला दुधाच्या माध्यमातून ते औषध मिळावे. जेव्हा आपण गायीच्या शेणाने घर सारवतो, गोमूत्राने शुद्धी करतो, तेव्हा मंदिराप्रमाणे पावित्र्य घराला येते.

४. गोवंश संवर्धनाचे महत्त्व

भारतासारख्या उष्ण कटीबंध देशामध्ये जिथे प्रदेशानुसार हवामान पालटते, तिथे देशी गोवंशाने जनुकीय बदलांना अनुसरून तग धरला आहे. देशी गोवंशामध्ये पुढीलप्रमाणे रोगप्रतिकारकक्षमता, अत्यल्प परजिवी प्रादुर्भाव, प्रतिकूल वातावरणात जीवन सुसह्यता,  उष्ण हवामानात तग धरण्याची क्षमता, उपलब्ध चार्‍याचा वापर करत गुजराण, सकस आणि पोषक दूध, नियमित प्रजननाची गती, शेती कामासाठी ओढ क्षमता, गोमयातून भूमी सुपीकता अशा मूलभूत गुणवत्ता आहेत.

५. गायीला ‘राज्यमाते’चा दर्जा !

‘राहुरी कृषी विद्यापीठ, पुणे’च्या माध्यमातून गोवंश संवर्धन, तसेच पालन करणार्‍यांना प्रशिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, तसेच गोआधारित पर्यटनसुद्धा चालू करण्यात आले आहे. २२ जुलैपासून साजरा होणारा ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ पूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विभाग स्तरावर साजरा करण्यात येईल. त्यामध्ये प्रदर्शन भरवून जागृती करण्यात येईल.

भारतियांमध्ये गायीप्रती अजूनही इतकी श्रद्धा आहे की, बरेच लोक अजूनही गायीला घास भरवल्याविना जेवण करत नाहीत, गाय हा कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. तोच आदर लक्षात घेऊन शासनाने गायीला ‘राज्यमाते’चा दर्जा दिला आहे.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गायीचे पूजन केले. त्यामागे जागरूकता हाच उद्देश होता की, लुप्त होत चाललेल्या गोवंशियांचा तुम्हीसुद्धा सांभाळ करा.

६. आयोग राबवत असलेल्या सध्याच्या योजना

‘अक्षय्य तृतीया’, म्हणजे ३० एप्रिलपासून ‘गोमय मूल्यवर्धन दिवस’ चालू करण्यात आला. त्याचा उद्देश गोमूत्रापासून, तसेच शेणापासून बनवलेल्या उत्पादनांची विक्री आणि जागरूकता हा आहे. ‘गोमय गणपति’ या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक लाभ तर होईलच; पण पर्यावरणाचीसुद्धा शुद्धी होईल. सर्वत्रच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगून आदेश काढण्यात आला आहे की, आता अंत्यविधीला लाकूड न वापरता ‘गोकास्ट’ (शेणापासून बनवलेले लाकूड) वापरण्यात यावे.

‘गोवर्धन गोवंश योजने’मध्ये प्रत्येक तालुक्याला तेथील गोशाळांना गायींच्या संख्येनुसार १५ ते २५ लाख रुपयांचे ‘शेड’साठी अनुदान देण्यात आले. ‘परिपोषण’ योजनेच्या अंतर्गत ५० रुपये प्रतिदिन प्रतिदेशी गायीसाठी अनुदान सर्व गोशाळांना देण्यात आले.

७. ‘गोहत्याबंदी’ कायदा संपूर्ण देशभर लागू करावा !

नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात ३ ते ४ लक्षवेधी या केवळ गायीवरच झाल्या. केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी ‘गोहत्याबंदी’ कायदा संपूर्ण देशभर लागू करावा. अनधिकृत पशूवधगृहे बंद पाडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

त्याचा प्रारंभ झाला आहे, त्याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे म्हशीचे मांस सांगून गायीचे मांस घेऊन जाणार्‍या ‘अलाना, भाग्यनगर’ येथील आस्थापनाला टाळे लावण्यात आले आहेत. गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद होणार नाहीत, याची दक्षता सर्वत्रच्या पोलीस यंत्रणांना घेण्यास आयोगाने सांगितले आहे.

८. आयोगाच्या भविष्यातील योजना

‘गोमय मूल्यवर्धन’ या योजनेच्या अंतर्गत गोशाळांना गोमूत्र, शेण यांच्यापासून विविध उत्पादने सिद्ध करण्यासाठी ‘यंत्र’ देणे आणि त्यांच्या होणार्‍या विक्रीच्या माध्यमातून गोशाळांना ‘स्वावलंबी’ बनवणे, म्हणजे अनुदान, देणगी यांवर गोशाळांना अवलंबून रहावे लागणार नाही. गोमय पदार्थांचे ‘सर्टिफिकेशन’ (प्रमाणीकरण) करणे.

– श्री. जयेश बोरसे, पुणे. (२०.७.२०२५)

संपादकीय भूमिका

गोरक्षणासाठी कार्य करणार्‍या गोरक्षकांना सर्व प्रकारचे साहाय्य करणे, हेच प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे !