मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !

मन्दिराणि राष्ट्रस्य आधारस्तम्भा: सन्ति ।

मंदिराची भूमिका समजून घेतल्याविना भारताची कथा समजू शकत नाही. सहस्रो वर्षांपासून मंदिरे केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती, तर ज्यांच्यावर भारतीय राष्ट्राची उभारणी झाली, अशा त्या पायाभूत संस्था होत्या. राष्ट्र-राज्याची आधुनिक संकल्पना उदयास येण्याच्या पुष्कळ आधी भारत एक ‘सांस्कृतिक राष्ट्र’ म्हणून कार्यरत होते. ते एका राजकीय सत्तेने नव्हे, तर सामायिक पवित्र भूगोल, सांस्कृतिक स्मृती, ज्ञानप्रणाली आणि सामूहिक चेतना यांनी एकत्र बांधले गेले होते. या सांस्कृतिक सातत्याच्या केंद्रस्थानी ‘मंदिर’ उभे होते.

मंदिराला केवळ एक ‘धार्मिक वास्तू’ म्हणून पहाणे, म्हणजे त्याची संपूर्ण भूमिका न समजणे होय. ऐतिहासिकदृष्ट्या मंदिर हे सामाजिक संघटन, ज्ञाननिर्मिती, आर्थिक पुनर्वितरण, कलात्मक उत्कृष्टता, वाद निवारण आणि सामुदायिक एकोपा यांची संस्था राहिली आहे. ते एक असे केंद्र होते, ज्याभोवती समाज स्वतःला संघटित करत असे. जर राष्ट्राला एखाद्या लोकांची सामूहिक सांस्कृतिक अभिव्यक्ती मानले, तर मंदिरे हे त्याचे सर्वांत मजबूत आधारस्तंभ ठरले आहेत.

– श्री. संदीप सिंह, ‘टेंपल इकॉनॉमिक्स’ आणि ‘अ डिकेड फॉर मंदिर’ या ग्रंथांचे लेखक, मुंबई.

१. भौगोलिक विविधतेत सांस्कृतिक ऐक्य निर्माण करणे, हे मंदिरांचे महत्त्वाचे कार्य !

मंदिरांच्या सर्वांत महत्त्वाच्या कार्यांपैकी एक म्हणजे भौगोलिक विविधतेमध्ये सांस्कृतिक ऐक्य निर्माण करणे. भारत अनेक भाषा, चालीरीती, प्रादेशिक परंपरा आणि स्थानिक प्रथा यांचे माहेरघर आहे. या विविधतेला एका सुसंगत एकसंधतेत जोडणारी गोष्ट, म्हणजे देशभर पसरलेल्या पवित्र केंद्रांचे जाळे. उत्तरेकडील केदारनाथ मंदिरापासून दक्षिणेकडील रामेश्वरम् मंदिरापर्यंत, पूर्वेकडील जगन्नाथ मंदिरापासून पश्चिमेकडील द्वारकाधीश मंदिरापर्यंतच्या तीर्थयात्रा मार्गांनी असे सांस्कृतिक महामार्ग निर्माण केले, ज्यांनी या उपखंडाला एकात्म केले. भारतभर प्रवास करणार्‍या यात्रेकरूला भाषिक विविधता आढळत असे; पण सांस्कृतिक जवळीक मात्र जाणवत असे. ‘मंदिर’ या पवित्र चळवळीने राजकीय राष्ट्रवाद उदयास येण्याच्या पुष्कळ आधीच राष्ट्रीय चेतना निर्माण केली.

२. शिक्षण आणि बौद्धिक जीवनाची केंद्रे असलेल्या मंदिरांमुळे राष्ट्राचा सांस्कृतिक अन् तात्त्विक पाया टिकून रहाणे

श्री. संदीप सिंह

मंदिरे ही शिक्षण आणि बौद्धिक जीवनाची केंद्रेही होती. सर्वसामान्य समजुतीनुसार शिक्षण, म्हणजे केवळ गुरुकुल किंवा नालंदा महाविहारासारखी विद्यापिठे; परंतु सहस्रो मंदिरे हीसुद्धा ज्ञानकेंद्रे म्हणून कार्यरत होती. तिथे ग्रंथालये होती, तात्त्विक वादविवाद आयोजित केले जात, हस्तलिखिते जतन केली जात, विद्वानांना प्रशिक्षण दिले जात असे आणि व्याकरण अन् तर्कशास्त्रापासून खगोलशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्र, वास्तूकला, संगीत आणि राज्यशास्त्र इथपर्यंतच्या विविध विषयांचे शिक्षण दिले जात असे. मंदिर हे असे ठिकाण होते, जिथे ज्ञान केवळ साठवले जात नव्हते, तर पिढ्यान्‌पिढ्या हस्तांतरीतही केले जात होते. या बौद्धिक सातत्यामुळे राष्ट्राचा सांस्कृतिक आणि तात्त्विक पाया टिकून राहिला.

३. प्राचीन काळची मंदिरे म्हणजे अनेक संसाधने उपलब्ध असलेली विकासात्मक संस्था !

आर्थिकदृष्ट्याही मंदिरांनी मध्यवर्ती भूमिका बजावली. ती सार्वजनिक कल्याण आणि संसाधनांच्या वितरणाच्या सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक होती. मंदिरांना दिलेल्या देणग्या म्हणजे केवळ संपत्तीचा व्यर्थ साठा नव्हता. या संसाधनांमधून अन्नदानासाठी निधी पुरवला गेला, कारागिरांना आधार मिळाला, पाण्याच्या साठ्याची देखभाल झाली, रस्ते बांधले गेले, शाळा टिकवल्या गेल्या, आरोग्यसेवा पुरवली गेली आणि दुष्काळ, तसेच संकट यांच्या काळात साहाय्य दिले गेले. मंदिरांनी शिल्पकार, वास्तूविशारद, संगीतकार, नर्तक, पुजारी, शेतकरी, धातूकामगार, विणकर आणि व्यापारी यांचा समावेश असलेल्या स्थानिक आर्थिक परिसंस्था निर्माण केल्या. इतकेच नव्हे, तर मंदिरांच्या अर्थव्यवस्थेभोवती संपूर्ण शहरे समृद्ध झाली. या अर्थाने मंदिर ही एक आध्यात्मिक आणि विकासात्मक संस्था होती.

४. मंदिराच्या परिसंस्थेत कला आणि संस्कृती यांचा विकास

मंदिरे ही कला आणि संस्कृती यांची भांडारे म्हणूनही कार्यरत होती. भारतीय स्थापत्यकला, शिल्पकला, शास्त्रीय नृत्य, संगीत आणि धार्मिक विधी यांतील सर्वोच्च अभिव्यक्ती मंदिरांच्या परिसंस्थेतच विकसित झाल्या. तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराची भव्यता असो, कोणार्क येथील सूर्यमंदिरातील गुंतागुंतीचे कोरीवकाम असो किंवा मीनाक्षी अम्मान मंदिरातील भक्तीपूर्ण परंपरा असो, मंदिरांनी भारतीय सौंदर्यशास्त्राला आकार दिला आणि सांस्कृतिक सातत्य जपले. त्यांच्या दगडात तत्त्वज्ञान, विधींमध्ये लय आणि स्थापत्यकलेत तत्त्वमीमांसा सामावलेली होती.

५. परकीय आक्रमणांच्या काळात संस्कृती टिकवून ठेवण्यामध्ये मंदिरांची भूमिका

परकीय आक्रमणे आणि राजकीय अस्थिरता यांच्या काळात मंदिरे ही सांस्कृतिक प्रतिकाराची प्रतिके बनली. आक्रमणकर्ते अनेकदा केवळ संपत्तीसाठीच नव्हे, तर या संस्था भारताचा सांस्कृतिक कणा आहेत, हे समजून मंदिरांना लक्ष्य करत असत. मंदिराचा विध्वंस हा सांस्कृतिक स्मृतीला तडा देण्याचा एक प्रयत्न होता. तरीही इतिहासात वारंवार झालेल्या पुनर्बांधणीचीही नोंद आहे. पवित्र स्थळांची पुनर्बांधणी ही समाजाची लवचिकता आणि सांस्कृतिक भावना विझू न देण्याचा त्याचा निर्धार दर्शवते. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी ही केवळ एका देवस्थानाची पुनर्स्थापना नव्हती, तर ती राष्ट्रीय आत्मसन्मानाची घोषणा होती.

६. मंदिरे ही समाजाला व्यापक सामूहिक उद्देशाची आठवण करून देणारी एकतेची केंद्रे

मंदिरे सामाजिक एकतेची केंद्रेही राहिली आहेत. सण, यात्रा, सामुदायिक भोजन, स्थानिक सभा आणि सामूहिक विधी यांमुळे सामाजिक भांडवल निर्माण झाले. विविध व्यवसाय आणि पार्श्वभूमी यांचे लोक सामायिक सहभागासाठी एकत्र आले. मंदिराने संकुचित ओळखींच्या पलीकडे जाणारी आपलेपणाची भावना निर्माण केली. त्याने समाजाला त्याच्या व्यापक सामूहिक उद्देशाची आठवण करून दिली.

७. देशात सांस्कृतिक नूतनीकरणासाठी मंदिरांचे केंद्रस्थान पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक !

सध्या भारतामध्ये सांस्कृतिक नूतनीकरणासाठी मंदिरांचे केंद्रस्थान पुन्हा प्रस्थापित करणे अत्यावश्यक आहे. याचा अर्थ त्यांना केवळ श्रद्धेची स्थळे म्हणून पहाणे नव्हे, तर शिक्षण, सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा आणि नैतिक सार्वजनिक जीवन यांना आकार देण्यास सक्षम असलेल्या जिवंत संस्था म्हणून त्यांना पुन्हा एकदा मान्यता देणे होय.

८. मंदिरे म्हणजे भारतीय राष्ट्राची जिवंत रचना !

राष्ट्र केवळ राज्यघटना, सरकारे किंवा आर्थिक धोरणे यांनी घडत नाही. ते लोकांच्या जाणिवेला आकार देणार्‍या संस्थांनी घडते. भारतासाठी ‘मंदिर’ हीच ती संस्था राहिली आहे. त्याने संस्कृतीच्या आत्म्याचे पोषण केले आहे, लोकांना काळ आणि स्थळ यांच्या पलीकडे जोडले आहे अन् राष्ट्राची ओळख असलेल्या मूल्यांना टिकवून ठेवले आहे. मंदिरे ही भूतकाळातील अवशेष नाहीत. ती भारतीय राष्ट्राची जिवंत रचना आहेत !

लेखक : श्री. संदीप सिंह, ‘टेंपल इकॉनॉमिक्स’ आणि ‘अ डिकेड फॉर मंदिर’ या ग्रंथांचे लेखक, मुंबई.