काही मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे काही जण आता ‘कर्तव्या’पेक्षा ‘हक्क’ अधिक सांगू लागले आहेत. हा भाग असला, तरी गोव्यात मंदिरांचे व्यवस्थापन पहाणार्यांवर होणारा ब्राह्मणीकरणाचा आरोप हा कसा धादांत चुकीचा आणि हास्यास्पद आहे ?, हे लेखकाने या लेखात उलगडून दाखवले आहे, तसेच असे आरोप करणार्यांना सडेतोड उत्तर दिले आहे ! त्याचप्रमाणे ‘आदिवासींच्या अर्मूत देवतांना मूर्तीरूप देणे’ आणि ‘ख्रिस्त्यांनी केलेले मूर्तीभंजन’ यांची विचित्र तुलना करणार्या साम्यवाद्यांच्या ‘खोट्या कथानकाला’ही लेखकाने सुरूंग लावला आहे !

१. मंदिरात ‘देव’ महत्त्वाचा !
हा लेख लिहायला घेतला, तोवर ‘कुठल्या देवळात कोण ‘महाजन’ (देवळाचे वंशपरंपरागत हक्कदार, विश्वस्त किंवा व्यवस्थापक सदस्य) ? आणि का आहेत ?’, हा विचार कधी डोक्यात आलाच नाही. ‘देव महत्त्वाचा, तिथे जाऊन त्याचे दर्शन घेणे महत्त्वाचे आहे. देव तिथे आहे, म्हणून ते देवस्थान’, इतकेच देवस्थानाला महत्त्व देत आलो; परंतु अनेक देवळे अशी आहेत, जिथे एकदा जाऊन आलो, तिथे पुन्हा कधीच पाऊलही टाकणार नाही. बाहेरूनच नमस्कार ! कारण तिथे चाललेले प्रकार शास्त्र सोडूनच द्या, श्रद्धेलाही पायदळी तुडवणारे होते !
२. लहान स्वरूपात असलेली देवळे ही गावाची केंद्रस्थाने !

लहान स्वरूपात असलेली देवळे ही गावाची केंद्रस्थाने होती. ती प्रत्येकाचे दायित्व होते. देवळात प्रवेश नसला, तरी तो अन्याय वाटत नसे. ‘देवाला आपल्यासाठी बाहेर यावे लागते’, याचे दु:ख असे. ‘देव काय तो या एकाच देवळात आहे’, अशी भावना कधीच नव्हती. देवळेही वेगवेगळी होती. ग्रामदेवता, कुलदेवता अशी साधारण झोपडीवजा देवळांची विभागणी होती. बाकी राखणदार, क्षेत्रपाल, निसर्गदेवता या उघड्यावरच असायच्या. त्यांना देवळे नव्हती आणि खरे सांगायचे तर असूच नयेत. राखणदार हा फिरताच हवा, त्याला बंदिस्त करणे अयोग्य आहे. सीमा संपेपर्यंत तो आपले रक्षण करत येतो, ही भावना तिथून जाणार्या प्रत्येकाची असे. दगड, वारूळ या निसर्गरूपात पूजण्यापासून ते मूर्तीरूपात पुजणे, हा एकाच संस्कृतीचा भाग होता आणि आहे.
३. काही मंदिरांमध्ये ‘दायित्वा’ची जागा ‘हक्का’ने घेतली
काही मंदिरांमध्ये ‘दायित्वा’ची जागा ‘हक्का’ने घेतल्यापासून अन्यायाची जाणीव वाढीस लागली. देवस्थानी किंवा निसर्गस्थानी पाया पडण्यासाठी न जाता हक्क गाजवण्यासाठी माणसे जाऊ लागली. पहिले दर्शन घेण्याचा, पहिली पूजा करण्याचा मान महत्त्वाचा ठरला. देवापेक्षाही ‘देवस्थाना’ला नको इतके महत्त्व प्राप्त झाले. ‘आपले हक्क प्रस्थापित करणे’ आवश्यक ठरले. अनेक देव जे स्थलांतरित झाले, त्यांची देवळे आरंभी झोपडी किंवा लहान घरे यांसारखीच होती. कवळे, म्हार्दोळ, मंगेश ही देवस्थानेही तशी लहानच होती. वतने मिळवून, आर्थिक आणि राजकीय वजन वापरून देवळे भव्य बांधली. ज्यांनी त्यांची पुनर्स्थापना मोठ्या प्रमाणात केली, त्यांचा दबदबा तिथे राहिला. पुढे ‘मझानिया’अंतर्गत (मधल्या दर्जाचा नियम) त्यांनी त्यांचे वर्चस्व आणि हक्क अबाधित राहील, अशी सोय राजकीय आणि वैयक्तिक वजन वापरून केली. यात एक सूक्ष्म भेद आणि कारण आहे, जे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
साम्यवाद्यांनी गोव्यातील मंदिरांविषयी ब्राह्मणीकरण किंवा सांस्कृतिकीकरण अशी मांडणी करणे !
मंदिरांविषयी थेट ‘सारस्वतीकरण’ असा शब्द ज्यांना वापरायचा नव्हता, त्यांनी त्याला ‘ब्राह्मणीकरण’ म्हटले. त्यालाच पुढे ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले. त्यासाठी न.चि. ढेरे, भागवत, कोसंबी या इतिहास संशोधकांची उदाहरणे दिली; ज्यांनी या सर्वांची विभागणी ‘शोषक-शोषित’ (साम्यवादी किंवा विद्रोही यांनी) या दृष्टीकोनातूनच केली. ‘एकाच संस्कृतीची वेगवेगळी रूपे’, अशी त्याची वास्तविक मांडणी त्यांनी केली नाही. त्यामुळे आता ज्याला ‘सांस्कृतिकीकरण’ म्हटले जाते, ते ‘कुठल्या तरी उपर्या संस्कृतीने केलेले आक्रमण’ आहे, अशा पद्धतीने ते मांडले जाते.
– श्री. प्रसन्न बर्वे
४. प्रत्येक मंदिराचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक !
काही देवस्थानांच्या महाजनकीत आणि भूमींत स्वजातीयांची नावे घुसडण्याचे काम सारस्वतांनी केले आहे, यात काहीच वाद नाही; पण तो नियम सरसकट देवळांसाठी लावणे चुकीचे ठरेल. प्रत्येक देवस्थान सुटे सुटे घेऊन त्याचा अभ्यास करणे आणि मांडणी करणे आवश्यक आहे. कुलदेवतेची, ग्रामदेवतेची, स्थानदेवतेची, निसर्गदेवतेची आणि आधुनिक काळात बांधलेली इष्टदेवतेची मंदिरे अशी त्याची विभागणी करणे आवश्यक आहे.
५. शहरीकरण होतांना ग्रामीण भागातील निसर्गदेवतांचे मूर्तीरूपात रूपांतर होणे
साम्यवादी आणि समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या संशोधकांनी जी पाचर मारली, तीच आता पुढे मंदिरे तोडण्यात आणि फोडण्यात उपयोगी पडत आहे. ज्या ‘सांतेर’ या निसर्गदेवतेची मूर्ती आधुनिक काळात झाली, ती कुणी केली ? बोडगिणीतल्या अमूर्त देवाला ‘राख रे बाबा’ म्हणत दिवा लावला जायचा, त्याचे मूर्तीरूप आणि देवस्थान कुणी केले ? जसे ग्रामीण भागाचे शहरीकरण होतांना जे जे पालट होते गेले, तसेच पालट निसर्गदेवतांचे मूर्तीत रूपांतर होत गेले. जशी त्याची मांडणी केली जाते, तसा हा नंतर आलेल्यांनी आदिवासींवर केलेला अन्याय नव्हता.
ठराविक कुळांकडे मंदिरांची महाजनकी (प्रशासकीय हक्क) आहेत, म्हणजे इतरांवर अन्याय आहे, असे म्हणणे चुकीचे; त्याविषयीची कारणमीमांसा !

गोव्यातील सर्वांत प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांमध्ये सारस्वतांची ‘महाजन’की (प्रशासकीय हक्क) आहे. यातही कुळावी असलेले सर्व सारस्वत महाजन नाहीत. प्रामुख्याने वत्स, कौशिक आणि भारद्वाज या गोत्रांतील सारस्वतच महाजन आहेत. इतर सारस्वत नाहीत आणि अन्य जातीचेही कुणी नाहीत. असे फक्त सारस्वतांनीच केले आहे का ?, तर तसेही नाही. ‘श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्था’नात १२ क्षत्रिय कुळे महाजन आहेत. तिथे अन्य क्षत्रिय कुळांना आणि अन्य कुणासही महाजन होण्याचा अधिकार नाही. गोव्यातील एकूण साधारण ४५० मंदिरांपैकी, ५० च्या आसपास मंदिरे सारस्वतांच्या व्यवस्थापनाखाली आहेत. उर्वरित ४००हून अधिक मंदिरे ही बहुजन, क्षत्रिय मराठा, दैवज्ञ (शेट), देसाई आणि इतर हिंदु समुदायांची आहेत. या सर्व मंदिरांमध्ये तोच ‘मझानिया’ नियम (मधल्या दर्जाचा नियम) लागू होतो आणि जी कुळे / कुटुंब यांनी मंदिराची स्थापना किंवा पुनर्स्थापना केली, त्यांच्याकडेच प्रशासकीय हक्क (महाजनकी) रहातात. त्यामुळे ‘तो अन्य लोकांवर, जातींवर अन्याय आहे’, अशी भूमिका मांडणे आणि त्याचे सार्वत्रिकीकरण वा सरसकटीकरण करणे चुकीचे आहे.
– श्री. प्रसन्न बर्वे
६. ‘निसर्गदेवतांचे मूर्तीरूप होण्या’ची तुलना ख्रिस्त्यांनी केलेल्या मूर्तीभंजनाशी करणे, हा निव्वळ अभद्रपणा !
‘ब्राह्मणीकरण’, ‘संस्कृतीकरण’ हा विचार आता एका घातक वळणावर पोचलेला आहे. चर्च, मिशनरी यांच्याशी त्याची तुलना केली जात आहे. ती संस्कृती वेगळी, भिन्न आणि मूर्तीभंजनाचा जगभर इतिहास असलेली संस्कृती आहे. ‘तिला (ख्रिस्त्यांच्या मूर्तीभंजनाला) अन्यायकारी, अत्याचारी म्हणायचे असेल, तर मग रोईण किंवा वारूळरूपी सांतेर देवतेची मूर्ती झाली, भट आणि मंत्र आले यालाही अन्याय, अत्याचार म्हणा’ अशी ‘समांतर रेषा’ आखली जात आहे. एखादा अधिवक्ता ‘तू करतोस तेच त्याने तुझ्या पत्नीसमवेत केले, याला बलात्कार म्हणावयाचे, तर तू जे आपल्या पत्नीसमवेत करतोस, त्यालाही बलात्कार म्हणावे लागेल’, असा तर्क देऊ लागला, तर ते जितके अभद्र असेल, तितकेच हेही आहे.
७. निसर्गदेवतांना मूर्तीरूप देणे, म्हणजे आदिवासींवर अत्याचार संबोधून ख्रिस्त्यांचे मूर्तीभंजनाच्या अत्याचारांचे स्वरूप सौम्य करणे
प्रत्येक देवळाचा स्वतंत्र आणि वेगळा अभ्यास करून त्यांची वर्गवारी करून नंतर एखाद्या विधानावर येणे योग्य ठरेल. ‘आदिवासींवर अत्याचार’ अशा पद्धतीने जे सरसकटीकरण केले जाते आणि त्यातून ख्रिस्तीकरणाचे (‘ख्रिश्चॅनिटी’चे) अत्याचार सौम्य करण्याचे प्रकार थांबलेच पाहिजेत. जे अशा विचारसरणीला पुढे ढकलतात, ते स्वत: प्रतिवर्षी जांबावलीला जाऊन गुलाल उधळतात, हे लक्षात घेतल्यास त्यामागचा ‘समाजवाद’ही कळतो. अशांनाच विठ्ठल हा ‘बहुजनां’चा देवू’ वाटतो आणि बुद्धमंदिर पाडून विठ्ठलाचे मंदिर उभारल्याचा साक्षात्कारही होतो !
८. विविध कायद्यांमुळे देवस्थानांचे अस्तित्व धोक्यात आल्याने देवाला बाहेरूनच नमस्कार करण्याची वेळ आल्यावर ‘महाजनकी’ आणि ‘अत्याचार’ या साम्यवादी वैचारिक आक्रमणाला अर्थच उरणार नाही
‘देव आपल्या भक्तीसाठी आणि देवस्थान सांस्कृतिक दायित्वासाठी आहे’, असे न वाटता; ज्यांना देव हा पहिल्या मानाच्या पूजेसाठी आणि देवस्थान हे व्यवस्थापनाचा, मालकीचा हक्क गाजवण्यासाठी आहे असे वाटते, त्यांचे देव लवकर भले करो ! पुढील काळात देवाला देवळात न जाता बाहेरूनच नमस्कार करण्याची ‘पाळी’ आणण्याचे काम न्यायालयीन पातळीवर सध्या जोरात चालू आहे. त्यांना यश आल्यास खरोखरच देवाला बाहेरूनच नमस्कार करावा लागेल. मग ती ‘महाजनकी’, ‘बहुजनकी’, ते ‘अन्याय-अत्याचार’ यांना काहीच अर्थ उरणार नाही. केवळ हक्कांची जाणीव असलेलेच देवस्थानात उरतील, दायित्वाची जाणीव असलेले बाहेरूनच नमस्कार करतील !
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा.
(साभार : ‘प्रसन्नवदने’ ब्लॉगवरून)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !