‘गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने परात्पर गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता व्यक्त करत असतांना ‘गुरुदेवांनी मला किती दिले आहे, त्यांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे कसे जपले आहे, प्रत्येक लहान-मोठ्या सुख-दुःखाच्या प्रसंगात कसे सांभाळले ?’, असे सर्व माझ्या डोळ्यांसमोरून तरळले. कृतज्ञतेचा विचार करतांना मला आठवले, ‘मी प्रसंगांमध्ये विष्णुस्वरूप गुरुमाऊलींची सर्वज्ञता अनुभवली आहे आणि त्यांचे सगुण रूप असलेल्या संतांनी मला प्रेम दिले आहे.’ माझ्यावर संतांनी केलेल्या कृपेविषयी येथे दिले आहे.

१. परात्पर गुरु कालिदास देशपांडे
१ अ. साधिका लहानपणी मिरज आश्रमात रहात असणे, तिचे आई-वडील बाहेरगावी प्रसाराला गेल्यावर तिला एकटेपणा वाटायला लागल्यावर आई-वडिलांनी तिला गुरुदेवांना आत्मनिवेदन करायला सांगणे : मी लहानपणी मिरज येथील सनातनच्या आश्रमात राहून शाळेत जात असे. त्या वेळी परात्पर गुरु कालिदास देशपांडे मिरज आश्रमात रहात होते. माझे आई-बाबा (सौ. मधुवंती पिंगळे आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे) प्रसार, तसेच अन्य सेवा यांच्या निमित्ताने बाहेरगावी असायचे. शाळेत किंवा आश्रमात काही प्रसंग झाल्यास किंवा मला एकटेपणा वाटायला लागला की, मी आई-बाबांना दूरभाष करत असे. तेव्हा आई-बाबा मला सांगायचे, ‘‘तू परात्पर गुरुदेव पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून त्यांना आत्मनिवेदन कर. तू त्यांना मनातील सर्व विचार सांग. ते तुला यातून निश्चितच बाहेर काढतील.’’ आई-बाबांनी मला कधीच मानसिक स्तरावर सांभाळले नाही.

१ आ. साधिका गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असतांना परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांनी तिची प्रेमाने विचारपूस करणे आणि ‘त्यांच्या रूपात गुरुदेव आले आहेत’, असे साधिकेला जाणवणे : आई-बाबांनी असे सांगितल्यावर मी परात्पर गुरुदेवांच्या खोलीत बसून त्यांना सूक्ष्मातून आत्मनिवेदन करत असे. मी त्यांना मनातील सर्व विचार सांगत असे. काही वेळा मला रडू येत असे. एकदा मी गुरुदेवांना आत्मनिवेदन करत होते. तेव्हा परात्पर गुरु देशपांडेकाका तेथे आले. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवून विचारले, ‘‘बाळा, काय झाले ?’’ मला रडतांना पाहून त्यांनी मला कुशीत घेतले. त्यांना मी मनातील सर्व विचार सांगितले. तेव्हा मला जाणवले, ‘साक्षात् गुरुदेवच परात्पर गुरु देशपांडेकाकांच्या माध्यमातून तेथे आले आहेत.’
२ – ३ प्रसंगांत असे झाले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपण गुरुदेवांना सूक्ष्मातून जे सांगतो, ते त्यांना समजते आणि कुणाच्या तरी माध्यमातून ते आपल्याला साहाय्य करतात.’ परात्पर गुरु देशपांडे काकांनी मला इतक्या प्रेमाने कुशीत घेतले होते की, मला वाटले ‘मी गुरुदेवांच्याच कुशीत आहे.’ मला त्यांच्या रूपात गुरुदेवच दिसत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

२ अ. साधिका रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना तिने गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी तिची विचारपूस करणे किंवा त्यांचे वचन साधिकेच्या वाचनात येणे : मी बर्याच प्रसंगांत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या माध्यमातून गुरुदेवांची सर्वज्ञता अनुभवली. मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला प्रत्येक प्रसंगात आणि साधनेतील चढ-उताराच्या प्रसंगी पुष्कळ प्रेम दिले. मी मनातील विचार गुरुदेवांना आत्मनिवेदन करून सांगत असे किंवा वहीत लिहून त्यांना सांगत असे. मी मनातील विचार लिहून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केल्यावर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा दूरभाष येणे, ‘त्यांनी माझी आठवण काढली’, असे साधकांनी सांगणे, माझ्या त्या वेळच्या स्थितीला आवश्यक असे त्यांचे वचन दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येणे किंवा अन्य ठिकाण वाचनात येणे’, असे होत असे.
२ आ. साधिका श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यापासून सेवेनिमित्त दूर असली, तरीही ‘त्या सूक्ष्मातून सतत समवेत आहेत’, असे साधिकेला जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भेटीतील क्षण आठवून किंवा त्याविषयीचे लिखाण वाचल्यावर माझे मन प्रसन्न आणि उत्साही होत असे. मी त्यांच्यापासून कितीही दूर असले किंवा कित्येक मास माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही, तरीही ‘त्या सतत सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, असेच मला जाणवते.
२ इ. साधिकेची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी बर्याच कालावधीत भेट झाली नसल्यासही तिला ‘त्या सूक्ष्मातून समवेत आहेत’, असे जाणवणे : मी रामनाथी आश्रमात गेल्यावर १ – २ वेळा माझी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी भेट झाली नव्हती आणि बर्याच कालावधीत त्यांच्याशी बोलणे झाले नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मी त्यांच्यापासून दूर गेले आहे का ? माझ्या साधनेची स्थिती चांगली नाही; म्हणून असे झाले आहे का ?’ तेव्हा लगेचच असे काहीतरी घडायचे की, ‘त्या आणि गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवायचे. असे मला अनेक वेळा अनुभवायला आले आणि येत आहे.
मी या सर्वांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
३. सद्गुरु राजेंद्र शिंदे

३ अ. गुरुदेवांनी साधिकेला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून संघर्षमय प्रसंगातून बाहेर काढणे : मला देवाच्या कृपेने काही कालावधीसाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा मला सदगुरु राजेंद्र शिंदे यांचा सत्संग लाभला. माझ्या मनाचा संघर्ष होत असतांना मी गुरुदेवांना आत्मनिवेदन करत असे. तेव्हा लगेचच समोरून सद्गुरु राजेंद्रदादा यायचे आणि मला माझ्या स्थितीला आवश्यक अशी सूत्रे सांगायचे. असे बर्याच प्रसंगांत झाले. गुरुदेवांनी मला सद्गुरु राजेंद्रदादांच्या माध्यमातूनही पुष्कळ साहाय्य केले, प्रेम दिले आणि संघर्षमय प्रसंगातून बाहेर काढले.
४. पू. (सौ.) अश्विनी पवार

४ अ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी साधिकेला आईचे प्रेम देणे आणि शिकवणे : मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात असतांना मला पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा जवळून सत्संग लाभला. त्या वेळी पू. अश्विनीताई संत नव्हत्या, तरीही त्या माझ्या मनातील प्रत्येक विचार जाणत असत. माझे आई-बाबा माझ्या लहानपणापासून माझ्या जवळ नव्हते. मी आश्रमातील साधकांच्या समवेतच अधिक काळ राहिले. मी पूर्णवेळ साधना करू लागल्यावर पू. अश्विनीताईंनी माझे दायित्व घेतले. तेव्हा मला ‘कपडे कसे वापरायचे ? कसे ठेवायचे ? कसे रहायचे ? कसे बोलायचे ?’, याविषयी काही समजत नव्हते. त्या वेळी पू. ताईंनी माझे कपडे पाहून ते विभागून दिले. त्यांनी माझे खराब झालेले कपडे काढून टाकले. त्यांनी मला ‘कधी कोणते कपडे घालायचे ?’, त्याविषयी सांगितले. आई आपल्या बाळाचे पहाते, तसे पू. ताईंनी मला मुलीप्रमाणे सांभाळले. गुरुदेवांनी मला पू. ताईंच्या रूपातून सांभाळले.
५. पू. रमानंद गौडा

५ अ. साधिकेच्या मनात योग्य-अयोग्य याविषयी संभ्रम असल्यास पू. रमानंद गौडा तिला ‘योग्य काय असायला हवे ?’, याविषयी सांगत असणे : मी सेवेनिमित्त मंगळुरू सेवाकेंद्रात आल्यावर मला पू. रमानंद गौडा (पू. अण्णा) यांचा सत्संग लाभला. गुरुदेव पू. अण्णांच्या रूपातूनही माझ्या समवेत आहेत. माझ्यामध्ये ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ हा स्वभावदोष आहे. त्यामुळे मला मनातील विचार व्यक्त करणे जमत नाही. ‘पू. अण्णांना माझ्या मनातील सर्व विचार कळतात’, असे मला अनुभवायला आले. माझ्या मनात एखाद्या गोष्टीविषयी योग्य-अयोग्य किंवा अन्य सूत्रे यांविषयी संघर्ष चालू असल्यास काहीतरी प्रसंग घडायचा आणि पू. अण्णा ‘योग्य काय असायला हवे ?’, हे त्या प्रसंगाला धरून सांगायचे. माझ्या मनाची स्थिती ओळखून गुरुदेव त्यांच्या माध्यमातून माझ्या लक्षात आणून द्यायचे.
५ आ. गुरुदेवांनी पू. रमानंद गौडा यांच्या माध्यमातून साधिकेच्या मनातील विचार ओळखून तिला साहाय्य करणे : पू. अण्णा त्यांचा अमूल्य वेळ माझ्यासारखा पामर जिवाला देतात. मी त्यांना वैयक्तिक गोष्टी किंवा सेवा यांविषयी सांगत असतांना ते माझे सर्व बोलणे ऐकून घेतात. तेव्हाही मला जाणवते, ‘कोण आहे त्यांच्या रूपात ? कोण सांभाळत आहे मला ? माझ्या मनातील विचार ओळखून साहाय्य करणारे कोण आहे ?’, तर ते म्हणजे पू. अण्णांच्या रूपातील गुरुदेव !’
६. साधिकेला ‘गुरुदेव साक्षात् विष्णुस्वरूप असून ते संत आणि सद्गुरु यांच्या रूपांतून प्रत्येक साधकाच्या समवेत आहेत’, याची जाणीव होणे

मला ज्या संतांचा अधिक सत्संग लाभला, त्यांच्याविषयी मी लिहिले; पण प्रत्येकच संतांचे असे असते. यातून मला जाणीव झाली, ‘आपले गुरुदेव सामान्य नसून ते साक्षात् विष्णुच आहेत. आपण पृथ्वीवर कुठेही असलो, त्यांच्यापासून कितीही दूर असलो, तरीही आपण त्यांना सूक्ष्मातून सांगितलेला प्रत्येक विचार त्यांच्यापर्यंत पोचतो आणि ते कुणाच्या तरी माध्यमातून आपल्याला साहाय्य करतात. असे म्हणतात ना, ‘मुंगींच्या पायांतील घुंगराचाही आवाज देवाला ऐकू येतो, तर आपण जे देवाला सांगतो, ते त्याला ऐकू येणार नाही का ?’ याचीच अनुभूती मला प्रत्येक वेळी येते.
७. कृतज्ञता आणि प्रार्थना
असे वाटते, ‘सर्वसामर्थ्यवान, सर्वज्ञानी आणि सर्वव्यापी श्रीविष्णुस्वरूप गुरुदेव आणि सर्व संत अन् सद्गुरु यांनी आपल्याला जवळ केले आहे. ते प्रत्येक क्षणी आपल्यासाठी धावून येतात. आणखी काय हवे ?’ ‘हे विष्णुस्वरूप गुरुदेवा, मला केवळ तुमच्या चरणांशी ठेवा. तुम्ही, तसेच सद्गुरु आणि संत आमच्यासाठी जे करत आहात, त्याविषयी आमच्या मनात सतत कृतज्ञताभाव जागृत राहू दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. वैदेही गौडा (वय २९ वर्षे, वर्ष २०२५ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मंगळुरू (१.७.२०२२)
साधिकेने गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगितलेला विचार सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सूक्ष्मातून जाणून त्यानुसार कृती करणे

माझ्या लहानपणापासून माझे बाबा (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे) सेवेनिमित्त माझ्यापासून दूर राहिले. मला त्यांचा अल्प सहवास मिळाला. आताही माझा त्यांच्याशी फार संपर्क होतो, असे नाही. माझे त्यांच्याशी बोलणे अल्प असते; पण ‘मी त्यांच्याशी आतून जोडले गेले आहे’, असे मला जाणवते.
मी बाबांना वडिलांच्या रूपात पहाण्याऐवजी ‘सद्गुरु’ या रूपातच पहाते. मी माझ्या मनात आलेला विचार सूक्ष्मातून गुरुदेवांना सांगते. तेव्हा बाबा आमच्या कौटुंबिक ‘व्हॉट्सॲप’ गटात माझ्या मनात आलेल्या विचारासंदर्भातील आवश्यक छायाचित्रे आणि लेख पाठवतात. एकदा काही प्रसंगांमुळे ‘मला सर्व दूर करतात, सहभागी करून घेत नाही’, असे वाटून एकटेपणा वाटत होता. माझ्या मनात ५ ते १० मिनिटे असे विचार येत होते. मी खोलीत गेल्यावर आईला माझ्या मनातील विचार सांगितले आणि पुढील सेवा करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत बाबांनी मला एक छायाचित्र ‘व्हॉट्सॲप’ गटात पाठवले. ते पाहून मला जाणीव झाली, ‘साक्षात् गुरुदेव माझ्या समवेत असूनही मी कसा विचार करत आहे ?’ तेवढ्यात आईचाही दूरभाष आला. ती मला म्हणाली, ‘‘बघ, तुला कसे वाटत होते; पण बाबांनी हे छायाचित्र पाठवले आहे. यातून लक्षात आले ना, ‘अन्य कुणी नसले, तरी गुरुदेव तुझ्या समवेत आहेत.’’
– सौ. वैदेही गौडा (वय २९ वर्षे, वर्ष २०२५ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मंगळुरू (१.७.२०२२)
|
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !