साक्षात् भगवंतालाही भक्तासाठी नृत्य करायला लावणार्‍या गायन, वादन आणि नृत्य या दैवी कला !

१. गायन, वादन आणि नृत्य या कला इतक्या दैवी आहेत की, ‘भगवंतालाही भक्तासाठी नृत्य करावे’, असे वाटणे

नामदेव कीर्तन करी प्रेमभरे नाचे पांडुरंग ।
जनाबाई म्हणे देवा बोला अभंग ।। धृ. ।।

अभंग बोलता कीर्तनी रंग ओढावला ।
प्रेमाची आनंदे देव नाचू लागला ।। १ ।।

अर्थ : संत नामदेव कीर्तन करत आहेत. त्यांच्या कीर्तनात त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः पांडुरंग नाचत आहे. जनाबाई देवाला अभंग म्हणायला सांगत आहेत.

‘अभंगातील वरील ओळी वाचूनच आपली भावजागृती होते. माझ्या मनात ‘संत नामदेव महाराज कीर्तन करत असतांना प्रत्यक्ष पांडुरंगाने केलेले नृत्य कसे असेल ?’, हा विचार आल्यावर पुष्कळ आनंद होऊन मला माझ्या डोळ्यांसमोर ‘साक्षात् पांडुरंग नृत्य करत आहे’, हे दृश्य आले. सारे भक्त पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात. खरंच गायन, वादन आणि नृत्य या कला इतक्या दैवी आहेत की, ‘भगवंतालाही भक्तासाठी नृत्य करावे’, असे वाटते.

कलियुगात ‘भक्तीयोगानुसार साधना’ ही सर्वश्रेष्ठ साधना सांगितली आहे. गायन, वादन आणि नृत्य या कलांचे हेच वैशिष्ट्य आहे. या कलांची प्रस्तुती करणारे कलाकार ती भक्ती अनुभवतातच; परंतु ती पहाणारे प्रेक्षकही भक्तीत तल्लीन होऊन जातात.

२. संत नामदेव अभंग गात असतांना विठ्ठलही न रहावून आनंदाने ताल धरून नाचू लागणे 

वरील अभंगात संत जनाबाई संत नामदेवांना म्हणतात, ‘आता तुम्हीच अभंग गा !’ त्यावर संत नामदेव अभंग गाऊ लागतात. त्या वेळी विठ्ठलाला रहावत नाही आणि तो तेथे येऊन आनंदाने ताल धरून नाचू लागतो. भक्तीयोग अनुभवायला देणारे आणि भगवंतालाही ‘स्वतः नाचावे’, असे वाटणारे हे ‘नृत्य’ किती दैवी आहे, याची आपल्याला कल्पना आली असेल.

३. भक्तीमुळे संत नामदेवांना प्रत्यक्ष भगवंत दिसतो, तर परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प अन् साधकांचा भाव यांमुळे साधकांना भगवंताची अनुभूती येणे 

नृत्यामुळे आपले देहभान हरपून जाते. ‘आपण कोण आहोत ? कुठे आहोत ?’, हेसुद्धा आपल्याला कळत नाही. तेव्हा देवच आपल्यासमोर आलेला असतो. संत नामदेवांच्या भक्तीमुळे स्वतः भगवंत तेथे आला, तर गुरुदेवांचा संकल्प आणि साधकांचा भाव यांमुळे साधकांना ‘देव आपल्या समवेत आहे’, याची अनुभूती येते.

४. पंढरीच्या वारीत अभंग आणि गजर (जयजयकार) यांमुळे विठ्ठलाची अनुभूती घेणारे वारकरी !

आता आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी चालू आहे. ‘वारी’ म्हटले की, आपले मन भगवत्भेटीच्या ओढीने रमून जाते. ‘वारी’ची कल्पना करताच मन ‘तुळस डोक्यावर ठेवलेले, अनवाणी चालणारे, विठ्ठलाचे गुणगान करत ऊन, पाऊस आणि वारा यांची तमा न बाळगता अखंड नामसंकीर्तन करणारे वारकरी आपल्या डोळ्यांसमोर येतात.’ अभंग आणि गजर यांविना वारीला शोभा नाही. येथेही ‘संगीत देवाला अत्यंत प्रिय आहे’, हे आपल्या लक्षात येते.

भारतीय परंपरेत गायन, वादन आणि नृत्य यांना पुष्कळ महत्त्व आहे. विठ्ठलनामाचा गजर करतांना मन श्रीरंगाच्या भक्तीत रंगून जाते. मनाला विठ्ठलाची अनुभूती येते. भक्तांचे रोम-रोम विठ्ठलमय होऊन जाते आणि कंठामध्ये केवळ विठूनामच येते.

५. अभंग आणि ओव्या यांसारखे साहित्यलेखन हे विठ्ठलभक्तीचे सर्वांत मोठे साधन असणे

कु. अपाला औंधकर

विठ्ठलाला संगीत अतिशय प्रिय आहे. अभंग आणि ओव्या यांसारख्या साहित्याच्या माध्यमातून अनेक संतांनी विठूरायाचे गुणगान केले आहे. प्रत्येक संतांच्या या रचना पाहिल्या, तर प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाची अनुभूती आल्याविना रहाणार नाही. त्या काळी ‘साहित्यलेखन’ हेसुद्धा विठ्ठलभक्तीचे सर्वांत मोठे साधन होते. संत त्यांच्या काव्यातून अथवा अभंगातून आपल्या मनी असणारा विठ्ठलाप्रतीचा अनन्यसाधारण भाव व्यक्त करत असत. त्यामुळे वर्षानुवर्षे आपल्याकडे अभंग आणि ओव्या यांची परंपरा चालत आली आहे. ‘भक्ताचा भाव व्यक्त करण्यासाठीच देवाने या कलांची निर्मिती केली असेल’, असे मला वाटते.

मी संपूर्णतः पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन पुढील ओळी गाते,

नाचत डोलत देवाचा घडला पितांबर ।
सावध होई देवा ऐसें बोले कबीर ।। २।।

नामयाची जनी लोळे संताते पायी ।
जनन मरणापासून मुक्त करिते विठाबाई ।। ३।।

अर्थ : अशा प्रकारे कीर्तनात नाचत डोलत देवाचा पितांबर सिद्ध झाला. संत कबिरांनी देवाला सावध होण्यास सांगितले. संत नामदेव महाराजांची शिष्या संत जनाबाई संतांना शरण जातात आणि म्हणतात, ‘पांडुरंग जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून आपल्याला मुक्त करतो.’

‘हे कमलनयना विठूराया, तुझे नामसंकीर्तन करत करत आम्हाला तुझ्या रंगात रंगून आणि देहभान हरपून नृत्यसेवा करता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

(२१.६.२०२५)