गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !

‘श्री. शांताराम मांडवकर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे दैनिक ‘सनातन प्रभात’आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांच्याशी संबंधित सेवा २५ वर्षांपासून तळमळीने करत आहेत. त्यांची साधिकेच्या लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

‘श्री. शांताराम मांडवकर

१. देहभान विसरून झोकून देऊन सेवा करणे 

‘शांतारामदादा २५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याची सेवा आनंदाने करत आहेत. थंडी, ऊन, वारा, पाऊस, या कशाचीही पर्वा न करता दादा ही सेवा करतात. ते केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत नसून वाचकांना साधना सांगणे, त्यांना सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ उपलब्ध करून देणे, या सेवाही करतात. कितीही कष्टाची सेवा असली, तरी ते स्वतःचा विचार न करता झोकून देऊन सेवा करतात.

२. व्यवसाय सांभाळून सेवा करणे

त्यांचा बांधकामाशी संबंधित व्यवसाय आहे. त्यांचे काम कष्टप्रद आहे, तरीही ते कामावरून घरी आल्यावरही सायंकाळी तेवढ्याच उत्साहाने सेवा करतात. ते व्यावसायिक कामे करत असतांना त्यांना भ्रमणभाष केल्यास ते तत्परतेने प्रतिसाद देतात.

३. शिकण्याची वृत्ती 

त्यांचे शिक्षण फारसे झाले नाही, तरीही त्यांचा अनेक सेवा शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ते ‘विविध प्रकारच्या सेवा कशा करायच्या ?’, हे शिकून घेतात. ते इतर साधकांना सेवा शिकवण्यासाठी प्रयत्न करतात.

४. दादा व्यष्टी साधना परिपूर्ण करण्याचा तळमळीने प्रयत्न करतात.

अधिवक्त्या सौ. अपर्णा कुलकर्णी

५. कौशल्यपूर्ण सेवा करणे 

ते व्यासपीठ उभारण्याची सेवा आणि प्रदर्शनकक्ष लावण्याची सेवा कौशल्याने करतात. त्यांनी अनेक कार्यक्रमांच्या वेळी व्यासपीठ उभारण्याची सेवा केली आहे. ‘शांतारामदादा असले की, ती सेवा परिपूर्ण होणारच’, असा अनेक साधकांना विश्वास आहे. ‘या सेवेतील बारकाव्यांचा अभ्यास करून गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा कशी होईल’, याची दादांना तळमळ असते.

६. सेवेशी एकरूप होऊन सेवा करणे 

‘सनातन प्रभात’च्या कोणत्या वाचकाची वर्गणी कधी संपणार आहे ? वाचकांकडे कधी ‘सनातन प्रभात’ चालू केले आहे ? वाचकाची किती वर्गणी शेष आहे ?, अशा अनेक गोष्टी दादांना मुखोद्गत असतात. साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अनेक वर्गणीदारांची नावे दादांना मुखोद्गत आहेत.

७. सेवा समयमर्यादेत पूर्ण करणे 

शांतारामदादा दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ या दोन्हींशी संबंधित सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. ही सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी आणि परिपूर्ण होण्यासाठी दादा पुष्कळ तळमळीने प्रयत्न करतात. या सर्व सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नरत असतात.

८. परिचितांना सनातन संस्थेशी जोडून ठेवणे

समाजातील अनेक व्यक्ती दादांच्या परिचयाच्या आहेत. दादांनी त्यांना वेगवेगळ्या माध्यमांतून सनातन संस्थेशी जोडून ठेवले आहे.

९. त्यागी वृत्ती 

दादांची आर्थिक परिस्थिती मध्यम आहे, तरीही कुठेही सेवेला जाण्यासाठी ते कधीच पैशाचा विचार करत नाहीत.

१०. ‘प.पू. गुरुदेव प्रत्येक सेवा पूर्ण करून घेणारच आहेत’, अशी दादांची श्रद्धा असते.

११. जाणवलेले पालट 

पूर्वी दादांच्या मनात साधकांविषयी पुष्कळ प्रतिक्रिया असत; मात्र आता दादांच्या मनातील प्रतिक्रियांचे प्रमाण न्यून झाले आहे. ‘साधकांना साहाय्य कसे करता येईल’, असा दादांचा विचार असतो.

‘गुरुदेवांच्या कृपेने शांताराम दादांसारखे साधक आम्हाला लाभले आहेत’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, दापोली, रत्नागिरी.

(१६.६.२०२६)