Asim Munir On Kashmir : (म्हणे) ‘काश्मिरी बांधव भारताच्या नियंत्रणाच्या विरोधात संघर्ष करत आहेत !’

पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे काश्मीरवरून पुन्हा विधान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरवरून भारताच्या विरोधात विधान केले आहे. ते म्हणाले की,  आपल्याला आपल्या काश्मिरी बांधवांच्या त्यागाचे स्मरण करायला हवे, जे भारताच्या अवैध नियंत्रणाच्या विरुद्ध संघर्ष करत आहेत.

१. मुनीर पुढे म्हणाले की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा आणि काश्मिरी लोकांच्या आकांक्षांनुसार काश्मीर प्रश्‍नाच्या न्याय्य निराकरणाचा प्रबळ समर्थक आहे. भारत जाणूनबुजून या प्रदेशात तणाव निर्माण करत आहे, तर पाकिस्तान आतंकवादाच्या नायनाटाच्या जवळ पोचत आहे. (यापेक्षा हास्यास्पद वाक्य ते कोणते ? – संपादक)

२. मुनीर यांनी दावा केला की, भारताने कोणत्याही चिथावणीखेरीज पाकिस्तानवर दोनदा आक्रमण केले. यात भारताच्या रणनीतीच्या दूरदृष्टीचा चिंताजनक अभाव दिसला.

असीम मुनीर

भविष्यात कोणत्याही आक्रमकतेला निर्णायक आणि योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

मुनीर यांनी एप्रिलमध्ये काश्मीरवर बोलल्यानंतर झाले होते पहलगाम येथील आक्रमण

असीम मुनीर यांनी एप्रिल महिन्यात काश्मीरला ‘पाकच्या गळ्याची नस’ म्हटले होते. त्यानंतर काही दिवसांनीच पहलगाम येथे आतंकवादी आक्रमण झाले होते. आता मुनीर यांनी पुन्हा काश्मीरविषयी विधान केल्याने पन्हा आतंकवादी आक्रमण होण्याची चर्चा होऊ लागली आहे.

संपादकीय भूमिका

इस्रायलने जसे इराणमध्ये घुसून इराणी सैन्याच्या प्रमुखांसह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांना ठार मारले होते, तशीच कारवाई आता भारताने पाकमध्ये करणे आवश्यक झाले आहे. भारत असे धाडस करून आतंकवादापासून देश आणि देशवासीय यांचे रक्षण करील का ?