सनातन संस्‍थेच्‍या वतीने संतांना ‘हिंदु राष्‍ट्र रत्न’आणि हिंदुत्‍वनिष्‍ठांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार प्रदान !

पू. अधिवक्‍ता हरि शंकर जैन यांना ‘हिंदु राष्‍ट्र रत्न’ पुरस्‍कार देऊन सन्‍मान करतांना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

नवी देहली – सनातन संस्‍थेच्‍या वतीने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे पार पडलेल्‍या ‘सनातन राष्‍ट्र शंखनाद महोत्‍सवा’त हिंदु धर्म आणि राष्‍ट्र रक्षण यांसाठी विशेष कार्य करणार्‍यांना ‘हिंदु राष्‍ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार घोषित करण्‍यात आले होते. त्‍यांपैकी पुरस्‍कार प्राप्‍तकर्ते देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे अध्‍यक्ष पू. अधिवक्‍ता हरि शंकर जैन यांना ‘हिंदु राष्‍ट्र रत्न’ पुरस्‍कार हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला.

मंत्री श्री. कपिल मिश्रा यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार देतांना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

यासह सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या हस्‍ते देहली राज्‍याचे कला आणि सांस्‍कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा अन् ऋषिकेश येथील गीता भवनचे श्री. गौरीशंकर मोहता यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

श्री. प्रमोद कांबळे यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार देतांना सद़्‍गुरु नंदकुमार जाधव

यासमवेत अहिल्‍यानगर येथील प्रसिद्ध भारतीय शिल्‍पकार तथा चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांचा सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांच्‍या हस्‍ते ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार देऊन सत्‍कार केला. पुरस्‍कार दिल्‍यानंतर संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त करत मनोगत व्‍यक्‍त केले.

‘हिंदु राष्‍ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार देण्‍यामागील उद्देश !

हे पुरस्‍कार प्रदान करण्‍यामागील उद्देश सांगतांना सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस म्‍हणाले, ‘‘देशात विविध क्षेत्रांत कार्य करणार्‍यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, तसेच भारतरत्न आदी विशेष पुरस्‍कारांनी सन्‍मानित केले जाते; मात्र हिंदु धर्मजागृती आणि धर्मरक्षण करणार्‍यांना कोणताच पुरस्‍कार दिला जात नाही. आज सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८३ व्‍या जन्‍मदिवसाच्‍या निमित्ताने हिंदु धर्मविरांना ‘हिंदु राष्‍ट्र रत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. प्रत्‍येक वर्षी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्त असे पुरस्‍कार दिले जातील.

संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत

१. पू. अधिवक्‍ता हरि शंकर जैन, देहली : ‘हिंदु राष्‍ट्र रत्न’ पुरस्‍कार प्राप्‍त झाल्‍याने नवीन कार्य करण्‍यासाठी ऊर्जा मिळाली आहे. जोपर्यंत आयुष्‍य आहे, तोपर्यंत अनेक मंदिरांच्‍या मुक्‍तीचे कार्य पूर्ण करणे, हे आमचे दायित्‍व समजून ते पूर्ण करणार.

२. श्री. कपिल मिश्रा, कला आणि सांस्‍कृतिक मंत्री, देहली : गोवा येथे झालेल्‍या महोत्‍सवात केलेल्‍या शंखनादाचा आवाज वर्षानुवर्षे घुमेल. ‘अशा प्रकारचा शंखनाद महोत्‍सव देहली येथेही व्‍हावा’, अशी विनंती आहे.

३. श्री. प्रमोद कांबळे, प्रसिद्ध भारतीय शिल्‍पकार आणि चित्रकार, अहिल्‍यानगर : या पुरस्‍कारासाठी मी स्‍वतःला भाग्‍यशाली समजतो. पुढील कार्य करण्‍यासाठी मला यातून प्रेरणा मिळेल.

(श्री. प्रमोद कांबळे यांनी स्‍वामीनारायण मंदिरासाठी स्‍वामीनारायण यांच्‍या जीवनावर आधारित १० भव्‍य सेट्‌स, ‘सारे जहां से अच्‍छा’ या नावाने ५०० महान भारतीय व्‍यक्‍तींचे विशाल पेन्‍सिल स्‍केच, छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अनेक मूर्ती, तसेच शिर्डीच्‍या प्रसादालयामध्‍ये ७० फूट उंच साईबाबांची मूर्ती घडवली आहे. अयोध्‍येतील श्रीराममंदिराच्‍या परिक्रमा मार्गावर भगवान श्रीरामाच्‍या जीवनाशी संबंधित १२५ चित्ररथ त्‍यांच्‍या दिशादर्शनाखाली सिद्ध झाले आहेत.)