श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतकण !
‘साधनेच्या प्रवासात स्वतःचा, स्वतःच्या रूपाचा आणि शारीरिक स्थितीचा स्वीकार करणे, यांसह ‘आपल्याला मिळालेल्या या अनमोल देहाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे’, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. देह हा केवळ हाडामांसाचा सांगाडा नसून ते ईश्वरापर्यंत पोचण्याचे एक दिव्य साधन आहे. तेच ‘परमात्म्याचे मंदिर’ आहे. या देहाद्वारेच आपल्याला ‘चालणे, बोलणे, सृष्टीचा आनंद घेणे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे साधना करणे अन् ईश्वराची सेवा करणे’ शक्य होते, तरीही आपण स्वतःच्या देहाकडे कृतज्ञतेने पहाण्याऐवजी अनेकदा तक्रारीच्याच दृष्टीने पहातो.

१. शारीरिक स्थिती स्वीकारण्यातील मनाचे अडथळे
आपल्या दुःखाचे मूळ शरिरात नाही, तर आपल्या मनाच्या अडथळ्यांत आहे. शारीरिक स्थिती स्वीकारतांना मनाचे काही अडथळे बाधक ठरतात.
अ. अनेकदा स्वतःच्या शारीरिक उणिवा, उदा. उंची, वर्ण (रंग), वजन, काही व्यंग असल्यास ते, अशा प्रकारे बाह्य रूपामुळे मनात न्यूनगंड निर्माण होतो.
आ. इतरांची शारीरिक स्थिती, त्यांची शारीरिक क्षमता आणि त्यांचे बाह्य रूप यांविषयी त्यांच्याशी तुलना होऊन स्वतःला न्यून लेखले जाते.
इ. शारीरिक उणिवेमुळे अनेकदा ‘लोक माझ्याविषयी काय विचार करत असतील ?’, हा विचार मनाला दुःखी करतो.
ई. अनेकदा केवळ स्वतःच्या शारीरिक उणिवांकडेच अधिक लक्ष जाते. आपल्याकडे ९५ टक्के गोष्टी चांगल्या असतात; पण त्याबद्दल कृतज्ञ रहाण्याऐवजी आपले मन आपल्याकडे नसलेल्या ५ टक्के गोष्टींमध्येच अडकून पडते.
२. स्वतःच्या शारीरिक स्थितीविषयी कृतज्ञताभाव कसा ठेवावा ?
स्वतःला स्वीकारण्याचा पुढचा टप्पा, म्हणजे भगवंताने जे काही दिले आहे, त्याविषयी कृतज्ञता अनुभवणे. ‘स्वतःच्या शारीरिक स्थितीविषयी कृतज्ञताभाव कसा असावा ?’, हे पाहूया.
२ अ. ईश्वराने घडवलेल्या रूपात स्वतःचा मनापासून स्वीकार करा ! : ईश्वराने आपल्याला ज्या रूपात घडवले आहे, त्या रूपात आपण स्वतःचा मनापासून स्वीकार करायला हवा. भगवंताने अनेक फुले निर्माण केली आहेत. गुलाबाच्या फुलाचा स्वतःचा डौल आहे, तर मोगर्याच्या फुलाला स्वतःचा अनुपम सुगंध आहे. निसर्गात कोणतेही फूल श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. प्रत्येक फुलाचे काही ना काही वेगळेपण असते. त्याचप्रमाणे प्रत्येक मानवी देहाची रचना, क्षमता आणि त्यामागील ईश्वरी नियोजनही वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येकाची शारीरिक रचना ही त्याच्या प्रारब्धानुसार आणि प्रकृतीनुसार ईश्वराने घडवलेली एक अद्वितीय कलाकृती आहे.
२ आ. ‘देह ही ईश्वराची अमूल्य देणगी आहे’, असा भाव ठेवा ! : नरदेह ही भगवंताने आपल्याला दिलेली एक देणगी आणि त्याची आपल्यावरील पुष्कळ मोठी कृपा आहे. भले आपले शरीर परिपूर्ण नसेलही; पण ते निश्चितच ‘अमूल्य’ आहे. स्वतःचा स्वीकार करणे, म्हणजे ईश्वराच्या निर्मितीचा आदर करणे. त्यामुळे स्वतःच्या देहाकडे केवळ देह म्हणून न पहाता ‘ती ईश्वराची अमूल्य देणगी, ईश्वराची निर्मिती आहे’, या कृतज्ञताभावाने पहावे.
२ इ. ‘देह ईश्वराच्या कार्यासाठी उपयोगात आणणे’, हीच देहरूपी मंदिराची खरी सेवा आहे ! : ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’, म्हणजे ‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे.’ देहाच्या माध्यमातूनच आपण परमार्थाची वाट चालू शकतो. त्यामुळे आपल्या शारीरिक त्रुटींकडे पाहून खचून जाण्यापेक्षा त्यातील चैतन्याचा शोध घ्यावा. अंतरात्म्याच्या रूपात वास करत असलेल्या भगवंताला अनुभवावे. ‘देह ईश्वराच्या कार्यासाठी उपयोगात आणणे’, हीच देहरूपी मंदिराची खरी सेवा आहे.
देह जरी नश्वर असला, तरी या देहाच्या साहाय्याने भक्तीचा मळा फुलवता येतो.
श्री गुरूंनी आपल्याला जी साधना शिकवली आहे, त्या साधनेने आपण नरदेहाचा उद्धार करून घेऊ शकतो. आपण नरदेहाचे खर्या अर्थाने सार्थक करू शकतो.
साधकांनो, ८४ लक्ष योनींनंतर आपल्याला हा नरदेह लाभला आहे. त्यातही या नरजन्मात योग्य मार्गदर्शन करणारे महान मोक्षगुरु आपल्याला लाभले आहेत. या जन्मातील ही संधी जर हुकली, तर ‘किती जन्मांनंतर आपल्याला पुन्हा नरदेह मिळेल ?’, हे आपल्याला ठाऊक नाही; म्हणून आताच्या या जन्मातच सर्व बंधनांतून मुक्त होण्यासाठी तळमळीने, कृतज्ञताभावाने आणि निष्ठेने प्रयत्नरत रहा. या नरदेहाचा उद्धार करून घेऊन श्री गुरूंची कृपा संपादन करा आणि लवकरात लवकर जन्म-मृत्यूच्या घोर चक्रांतून मुक्त व्हा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)
(१७.६.२०२६)
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !