कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव समाजासमोर आणणारे आणि हिंदुत्वाचे निःस्वार्थ भावाने कार्य करणारे अधिवक्ता रोहन जमादार माळवदकर !

श्री. रोहन जमादार माळवदकर हे पुणे येथे वास्तव्यास असून ते पुणे न्यायालयात ‘अधिवक्ता’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी न्याय आणि विधी शाखेत पदवी घेतलेली असून ‘इतिहास’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी ‘१ जानेवारी कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकाचे लिखाण केले आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांत उपलब्ध आहे. त्यांचे सामाजिक माध्यमांवर २२ सहस्र ‘फॉलोअर्स’ (अनुयायी) आहेत. आज आपण त्यांच्या कार्याविषयी त्यांच्याच शब्दांत समजून घेऊया.

श्री. रोहन जमादार माळवदकर

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. घराण्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा

माळवदकर कुटुंब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात निष्ठावान, उत्तरदायी आणि पराक्रमी होते. जेजुरीचे सूर्याजी पाटील माळवदकर यांनी त्यांच्या भावाला जामीन राहून उत्तरदायित्व घेतले. भावाने कर न भरता पळ काढल्याने सूर्याजी पाटील यांनी स्वतःचे वतन गहाण ठेवून सरकारात ३०० होन (त्या वेळचे चलन) भरले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि संकटातही कर्तव्य पार पाडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना साहाय्य केले. अर्धवट वतन जप्त करून त्यांच्या नावावर केले आणि त्याचा खर्च परत मिळवून दिला.

हा प्रसंग माळवदकर कुटुंबाच्या निष्ठेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायप्रियतेचा उत्तम नमुना आहे. माळवदकर हे स्वराज्याचे सच्चे सेवक होते. त्यानंतर खंडोजी माळवदकर हे ब्रिटीश सैन्यात होते आणि दौंड, जेजुरी, कडेपठार येथील वतनदार पाटीलही होते. त्यांचा १ जानेवारी १८१८ या दिवशी झालेल्या कोरेगाव भीमा येथील लढाईमध्ये सहभाग होता. वर्ष १८२४ मध्ये ब्रिटीश सरकारने त्यांना ‘जयस्तंभ इनचार्ज (प्रमुख)’ म्हणून नियुक्त केले.  अधिवक्ता रोहन जमादार माळवदकर यांचे वडील श्री. बाळासाहेब जमादार माळवदकर हे भारतीय सैन्यात सुभेदार मेजर या पदावर कार्यरत होते.

२. हिंदुत्वाचे कार्य करण्याची प्रेरणा

घरातून आणि रक्तातच देशसेवेचे बाळकडू अधिवक्ता रोहन यांना मिळाले. वर्ष २०१३ मध्ये त्यांनी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराविरुद्ध ईश्वरी कृपेने जोरावर झुंज दिली आणि यशस्वीरित्या त्यावर मातही केली. माळवदकर यांच्या वडिलांनी निवृत्त झाल्यावर कोरेगाव भीमा या प्रकरणाविषयी सखोल अभ्यास केला आणि त्यासाठी न्यायालयीन लढा चालू केला. त्याच कालावधीत त्यांच्यावर आक्रमणही झाले. एका माजी सैनिकी अधिकार्‍याला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, हे पाहून अधिवक्ता रोहन जमादार माळवदकर यांनी वडिलांसह या लढाईत सहभाग घेतला. त्यात त्यांना पोलीस, प्रशासन, माजी सैन्याधिकारी, अधिवक्ते, हिंदुत्वनिष्ठ संघटना, मित्र परिवार इत्यादींचे सहकार्यही लाभले आणि तेथूनच त्यांच्या हिंदुत्वाच्या कार्याचा आरंभ झाला.

३. ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद आणि कोरेगाव भीमाचा इतिहास

कोरेगाव भीमाची लढाई ही कुठल्या जाती-धर्माविरुद्ध नसून इंग्रज विरुद्ध मराठा सैन्य अशी होती आणि ही लढाई अचानक झाली होती. अशाच प्रकारच्या काही लढाया त्याच कालखंडामध्ये खडकी, येरवडा, आष्टी येथे झाल्या. कोरेगावच्या लढाईमध्ये मराठ्यांच्या बाजूने अरब, गोसावी अशा ३००० सैनिकांच्या तुकडीविरुद्ध इंग्रजांचे ८३४ सैनिक लढले. या ८३४ सैनिकांच्या ३ तुकड्या होत्या. पहिली तुकडी ‘The 2nd Battalion of the 1st Bombay Regiment’ अशी होती, त्यात ५०० पायदळ होते, यात ब्राह्मण, मराठा, गुर्जर, शीख,  मुसलमान, अहिर आणि महार असे सैनिक होते. दुसरी तुकडी ‘The Poona Auxiliary Horse’ ही होती, यामध्ये २५० घोडेस्वार होते आणि तिसरी तुकडी ‘The Madras Artillery’, ज्यामध्ये केवळ युरोपियन होते. याप्रकारे सैनिकी यंत्रणा होती; परंतु आता काही लोक ही लढाई ‘५०० महारांविरुद्ध २८ सहस्र पेशवा’, अशी होती, असे सांगत आहेत. यामागचा उद्देश ‘महार’ समाजाला हिंदूंपासून दूर करणे’, असा आहे.

हिंदु तरुणांना संदेश !

‘धर्माच्या मार्गावर चालत असतांना अनेक लोकांकडून तो मार्ग सोडून देण्यासाठी प्रलोभने येतील; पण त्यात अडकू नका; कारण येणारा इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. हिंदूंनी संघटित होऊन एक मनाने कार्य करणे आणि कार्य करणार्‍याच्या मागे उभे रहाणे आवश्यक आहे ! ’

– अधिवक्ता माळवदकर

४. खोटा इतिहास समाजात पसरवणार्‍यांविरुद्ध वैचारिक लढाई

महार समाज हा ‘हिंदूच’ आहे. भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या ‘महार बटालियन’चा जयघोष ‘बोलो हिंदुस्थान की जय’ असा आहे. असे असतांना ‘त्यांना हिंदु समाजापासून दूर करणे, हिंदूंच्या जातीजातींमध्ये विष पसरवणे, त्यांच्यामध्ये भांडण लावणे’, या उद्देशाने अनेक फुटीरतावादी संघटना आणि अर्बन नक्षलवादी हे खोटे विचार अन् त्याचा अपप्रचार शाळा, महाविद्यालये यांच्यामधून करत आहेत. ‘जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय’ हे त्याचे उदाहरण आहे. ही वैचारिक लढाई चीनकडून मार्क्सवादाच्या माध्यमातून आपल्यावर थोपवण्यात आली. खरा इतिहास लोकांसमोर जावा, यासाठी अधिवक्ता रोहन जमादार माळवदकर यांचे इतिहास संशोधनाच्या माध्यमातून कार्य चालू आहे. लिखाणाच्या माध्यमातून, तसेच न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून काम चालू आहे. नुकतेच त्यांच्या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीचे प्रकाशन देहली येथे प्रा. गुरुप्रकाश पासवान, प्रा. उमेश कदम यांच्या हस्ते झाले.

५. ‘प्रबोधना’च्या कार्याला ‘साधने’चे अधिष्ठान

घरातील वातावरण धार्मिक असल्याने लहानपणापासून त्यांचे सहजतेने धर्माचरण होत आले आहे. अधिवक्ता माळवदकर यांनी स्वतःच्या नोंदवहीचा दाखला देत सांगितले की, कुठल्याही कामाचा प्रारंभ करतांना देवाला कर्तेपणा अर्पण करणे, म्हणजे ‘श्री’ लिहून आणि सर्व काम झाल्यावर आपल्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता, म्हणजेच ‘जय शंकर’ लिहून अर्पण करणे. त्यांची पुणे येथील सद्गुरु श्री शंकरबाबा महाराज यांच्यावर श्रद्धा आहे. त्यासह ते साधनेचे प्रयत्न म्हणून ध्यानधारणा करतात, तसेच ‘देवाला आळवल्याविना आणि शरण गेल्याविना पर्याय नाही’, असेही ते सांगतात.

६. हिंदुत्वासाठी निःस्वार्थ कार्य

करिअरकडे दुर्लक्ष, तसेच आर्थिक झळ सोसूनही एक अत्यंत अल्पवयाचा युवक खरा इतिहास समोर यावा; म्हणून धडपड करत आहे आणि अनेक हिंदूंना प्रेरणा देण्याचे काम करत आहे. हिंदुत्वनिष्ठांना न्यायालयीन प्रक्रियेसहित सर्व प्रकारचे साहाय्य करण्याची सिद्धता अधिवक्ता रोहन जमादार माळवदकर यांनी दाखवली आहे, ही त्यांची देव, देश आणि धर्म यांविषयी असलेली निःस्वार्थ भक्तीच दर्शवते !

‘१ जानेवारी कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ पुस्तक

हिंदुत्वनिष्ठ सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. चव्हाणके यांना ग्रंथ भेट देतांना अधिवक्ता माळवदकर

अधिवक्ता रोहन जमादार माळवदकर यांच्या शेताच्या जागेत असलेल्या ‘जयस्तंभ’ येथे प्रतिवर्षी सोहळे होतात. सरकारी कागदपत्रांत लिहिले आहे की, ‘या जयस्तंभच्या संदर्भात कुठलाही धार्मिक उत्सव करण्यास मनाई आहे.’ असे असतांना या सोहळ्यांच्या माध्यमातून जातीजातींमध्ये फूट पाडणारा खोटा इतिहास लोकांसमोर सांगितला जात आहे. तेव्हा त्यांनी तथ्यांच्या आधारे तसेच विविध सरकारी कागदपत्रांचा आधार घेऊन ‘१ जानेवारी १८१८ – कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ हे पुस्तक लिहिले आणि त्या आधारे जनजागृतीला प्रारंभ केला.

या पुस्तकाचे प्रकाशन वर्ष २०२२ मध्ये नागपूरकर भोसले, श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते पुणे येथे झाले. प्रतिपक्षातील लोकांनाही भेटून पुस्तकाची आवृत्ती भेट देणे !

१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव | अ‍ॅड रोहन बा जमादार माळवदकर#SangamTalks_Marathi

(सौजन्य : Sangam Talks Marathi – संगम टॉक्स मराठी)

स्वत: केलेल्या संशोधनावर, तसेच लिखाणावर आत्मविश्वास असल्यामुळे, तसेच सत्याच्या मार्गावर चालत असल्यामुळे या पुस्तकाची प्रत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांना देतांना अधिवक्ता रोहन यांना कुठलाच संकोच वाटला नाही किंवा काही अवघड वाटले नाही.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷