‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !

भारतीय संस्कृतीने गुरु-शिष्य परंपरा, धर्मशिक्षण आणि सुसंस्कार यांच्या बळावर सहस्रो वर्षे स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले. आजच्या पालटत्या काळात या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येक भारतियाचे दायित्व आहे. धर्मरक्षण आणि संस्कारसंवर्धन या अनुषंगाने श्री. बालसुब्रह्मण्यम् यांनी शाळेच्या माध्यमातून केलेले प्रयत्न येथे दिले आहेत. सर्वांनीच त्यातून प्रेरणा घ्यावी !

१. तपोभूमी भारत टिकवून ठेवण्यासाठी धर्मरक्षण होणे आवश्यक !

‘भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीन आहे. भारतीय संस्कृतीचा कालावधी पहायला गेलो, तर ‘रामायणा’ला अनुमाने ९ लाख वर्षे होऊन गेली आहेत. भगवद्गीतेला ५ सहस्र ५५५ हून अधिक वर्षे झाली आहेत. वेदांना तर ‘अपौरुषेय’ म्हटले गेले आहे; कारण ते पुरुषनिर्मित नसून साक्षात् भगवंताची देण आहेत. सहस्रो वर्षांनंतरही ‘वाल्मीकि रामायण’, ‘भगवद्गीता’ यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये एक शब्दही पालटला गेला नाही. भाषांमध्ये प्रतिदिन पालट होण्याच्या काळात ही आश्चर्याची गोष्ट आहे. यामागे आपली ‘गुरु-शिष्य परंपरा’ हे एकमेव कारण आहे. त्यामुळे आपण ‘गुरु-शिष्य’ परंपरेचा आदर केला पाहिजे. हा अनमोल खजिना आपल्यापर्यंत पोचवणार्‍या पूर्वजांप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. या अनमोल गोष्टी आपल्याकडून पुढील पिढ्यांकडे चांगल्या स्थितीत पोचवणे, हे आपले दायित्व आहे. ज्या तपोभूमीत आपला जन्म झाला, तिचे जतन करणे, हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक पिढीत अनेक संतांनी कठोर तप करून ही तपोभूमी निर्माण केली. त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली, तरच ही तपोभूमी ‘पुण्यभूमी’ म्हणून टिकून राहील. त्यासाठी धर्मरक्षण करणे आवश्यक आहे.

पूर्वी गावांमध्ये भारतीय संस्कृती वृद्धींगत होती. गावागावांमध्ये मंदिरे आणि गुरुकुल होते. त्या माध्यमातून गुरु-शिष्य परंपरा अस्तित्वात होती. तेथे वेदांचे ज्ञान दिले जात होते. इंग्रजांनी गुरुकुलपद्धत समूळ नष्ट केली. त्यांनी भारतीय शिक्षणपद्धतीत इंग्रजीचा अंतर्भाव करून विदेशी संस्कार रुजवले आणि भारतीय संस्कारांचा समूळ नाश केला. त्यामुळे गावे संस्कारहीन होऊन उजाड झाली. ही सर्व गावे परत सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.


श्री. बालसुब्रह्मण्यम् यांचा परिचय


चेन्नई (तमिळनाडू) येथील श्री. बालसुब्रह्मण्यम् हे ‘ब्रुक फील्ड इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक आणि प्रवर्तक आहेत. ते ‘बंगलोर स्टॉक ऑफ एक्सचेंजस’चे सदस्य आहेत. ते ‘पार्थसारथी’ महासभेचे उपाध्यक्ष आहेत. ते ‘अर्धनारेश्वर ट्रस्ट आणि सरस्वती शैक्षणिक न्यासा’चे विश्वस्त आहेत. यासमवेतच ते ‘एकल अभियान’चे दक्षिण फ्रान्सचे अध्यक्ष आहेत.

२. देशभरात १ लाखांहून अधिक ‘एकल शाळां’ची स्थापना

झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात गरीब आणि अज्ञानी हिंदूंचे ख्रिस्ती पंथात धर्मांतर होत होते. हिंदु धर्माविषयी जागृती केल्यानंतर ते थांबले. झारखंड, बिहार आणि आसाम येथील वनवासी गावांमध्ये ‘वनबंधू परिषद’ नावाने न्यायसंस्था चालू केल्या. त्यांना ‘फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी’ असे म्हटले जाते. स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते, ‘जर मुले शाळेत जाऊ शकत नसतील, तर शाळाच मुलांपर्यंत पोचली पाहिजे.’ त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन गावांमध्ये ‘एकल शाळा’ चालू केल्या. या अनौपचारिक शाळांमध्ये पहिली ते तिसरीपर्यंत शिकवले जाते अन् भारतीय संस्कारांवर जोर दिला जातो. त्या झाडाखाली किंवा मंदिरांत घेतल्या जातात. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधीत चालणार्‍या शाळेत एकच शिक्षक असतो. त्यामुळे त्यांना ‘एकल शाळा’ म्हटले जाते. शाळेत देवी सरस्वती, भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांची चित्रे लावलेली असतात. प्रत्येक शाळेत ‘ॐ’, गायत्री मंत्र आणि श्लोक शिकवले जातात. शाळेत शिकलेल्या युवांना प्रशिक्षण देऊन सक्षम केले जाते. त्यांच्याकडे ती शाळा सोपवण्यात येते. अशा प्रकारे एकल शाळा वाढत जाऊन त्या १ लाख गावांमध्ये उघडण्यात आल्या आहेत.

३. गावांना धार्मिक ऊर्जितावस्था देण्यासाठी ‘हरि सत्संग समिती’ची स्थापना

गावातील लोकांवर चांगले संस्कार होण्यासाठी ‘हरि सत्संग समिती’च्या नावाने वेगळी संस्था स्थापन केली आहे. आम्ही हरिकथेची आवड असणार्‍या तरुणाला ‘रामचरितमानस’ आणि ‘भागवत कथा’ यांचे प्रशिक्षण देतो. ३ मासांनंतर त्यांच्याकडे गावाचे दायित्व सोपवतो. जवळपासच्या ३० गावांमध्ये जाऊन हरिकथा करून अधिकाधिक लोकांना सुसंस्कारित करावे, असे ध्येय त्यांना दिले जाते.

अशाच प्रकारचे प्रयत्न दक्षिण भारतातही चालू आहेत. दक्षिण भारतात कुंभकोणम् या गावाजवळ आणि कर्नाटकमधील गंगावती येथे आमची प्रशिक्षण केंद्रे चालू आहेत. दक्षिण भारतातील लोकांना हरिकथांची सवय नाही. त्यामुळे तेथे स्थानिक श्लोक आणि कथा इत्यादींच्या माध्यमांतून धर्मशिक्षण दिले जाते. गावातील प्रत्येक कुटुंबाला ‘हनुमान परिवार’ बनवले आहे. त्यात प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या घरी ‘हनुमानचालिसा’ म्हणण्यासह गटाच्या सत्संगातही हनुमानचालिसा म्हणणे अभिप्रेत असते. या उपक्रमासाठी त्यांना काही मानधनही दिले जाते. ‘आरोग्य विभाग’ चालू केला असून त्या माध्यमातून आरोग्याविषयी जागृती करण्यात येते.

– श्री. बालसुब्रह्मण्यम्, दक्षिण फ्रान्स अध्यक्ष, ‘एकल अभियान’