Air India Plane Crash : कर्णावती येथे एअर इंडियाचे विमान कोसळले

  • गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २०४ जणांचा मृत्यू

  • विमानात १६९ भारतियांसह, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगीज, १ कॅनडाचा प्रवासी

  • अपघातामागील कारण अद्याप अस्पष्ट

कर्णावती (गुजरात) – येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे ‘बोईंग ७८७ ड्रीमलायनर’ हे विमान काही मिनिटांत ६३५ फुटांवरून विमानतळाच्या कुंपणापलीकडील इमारतीवर कोसळले. कोसळल्यानंतर या विमानाला प्रचंड मोठी आग लागली आणि त्यात विमान पूर्णपणे भस्मसात झाले. ज्या इमारतीवर हे विमान कोसळले, त्या इमारतीचीही मोठी हानी झाली आहे. विमानाचा काही भाग या इमारतीत अडकला आहे. या विमानात एकूण २३० प्रवासी, २ वैमानिक आणि १० कर्मचारी होते. त्यातही १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडाचा नागरिक प्रवास करत होता.

यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते विजय रूपाणी हेही प्रवास करत होते. या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातापूर्वी वैमानिकाने साहाय्यासाठी संदेश पाठवला होता; मात्र साहाय्य करण्यापूर्वीच विमान कोसळले. या अपघातात एकूण किती जणांचा मृत्यू झाला ? आणि किती जण आतापर्यंत जिवंत सापडले ?, याची कोणतीही अधिकृत संख्या सरकारकडून देण्यात आलेली नाही. हे विमान कर्णावतीहून लंडनला जाणार होते. हे विमान ज्या इमारतीवर कोसळले, ते सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतीगृहाचे भोजनालय होते. या डॉक्टरांपैकी किती जणांना दुखापत झाली ?, याची माहितीही अद्याप देण्यात आलेली नाही. अपघातस्थळावरून आतापर्यंत १०० हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घायाळांना रुग्णालयात नेण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ (आपत्कालीन मार्ग) सिद्ध करण्यात आला आहे. अपघातानंतर लगेचच राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्नीशमन दल यांनी साहाय्यता कार्य चालू केले. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तर नेमके कारण समजू शकलेले नाही.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते विजय रूपाणी

अंतिम क्षणी वैमानिकाने केला होता संपर्क !

या विमानाचे वैमानिक सुमित सभरवाल यांनी शेवटच्या क्षणी ‘मेडे’ संपर्क केला होता. हा एक आंतरराष्ट्रीय आपत्कालीन दूरभाष असतो, जो विमान गंभीर संकटात असतांना आणि आपत्कालीन साहाय्याची आवश्यकता असतांना वैमानिक नियंत्रण कक्षाला संदेश पाठवतो. ‘मेडे’ हा फ्रेंच शब्द असून याचा अर्थ ‘मला साहाय्य करा’ असा आहे. सबरवाल यांनी ३ वेळा ‘मेडे’ म्हटले.

वैमानिकाला होता ८ सहस्र २०० घंट्यांचा विमान उड्डाणाचा अनुभव

विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे होते, तर फ्लाईव्ह कुंदर हे सहवैमानिक होते.  सुमित सभरवाल यांना ८ सहस्र २०० घंटे उड्डाणाचा अनुभव होता. सहवैमानिक कुंदर यांना १ सहस्र १०० घंटे उड्डाणाचा अनुभव होता. अपघात झालेले विमान ११ वर्षे जुने होते.

एअर इंडियाकडून हेल्पलाईन क्रमांक प्रसारित

विमान अपघातानंतर एअर इंडियाने १८००-५६९१-४४४ हा हेल्पलाईन क्रमांक प्रसारित केला आहे. यावर संपर्क करून प्रवाशांचे नातेवाइक माहिती घेऊ शकतात.

विमानतळावरील कामकाज बंद

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्याने सांगितले की, या विमान अपघातामुळे विमानतळावरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

विमानात किती होते इंधन ?

कर्णावती येथून लंडन येथे जाण्यासाठी ७८ सहस्र लीटर इंधन भरले जाते. अपघात झालेल्या विमानात इतकेच इंधन भरण्यात आले होते. त्यामुळे ज्या वेळी हे विमान इमारतीवर कोसळले, तेव्हा इंधन टाकीचा स्फोट होऊन त्याला आग लागली. यात आगीचा प्रचंड लोळ आकाशात निर्माण झाला. या आगीमुळे विमान, इमारत आणि आजूबाजूचा काही भाग भक्ष्यस्थानी पडला. यामुळेच या विमानातील एकही प्रवासी आणि कर्मचारी जिवंत रहाण्याची शक्यता नाही, असे म्हटले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार विमान अपघाताचे भाकीत खरे ठरले !

ज्योतिषी श्री. सिद्धेश्वर मारटकर

प्रसिद्ध ज्योतिषी श्री. सिद्धेश्वर मारटकर यांनी गेल्या वर्षी केलेल्या भाकितामध्ये म्हटले होते की, जून महिन्यामध्ये मोठे विमान अपघात संभवतात.

यामागे शनी आणि मंगळ या ग्रहांचा षडाष्टक योग कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

हे दुखः शब्दात सांगता येणार नाही ! – पंतप्रधान मोदी

कर्णावती येथील दुर्घटनेमुळे मला धक्का बसला असून अतिव दुख: झाले आहे. हे दुखः शब्दात सांगता येणार नाही. या दु:खाच्या क्षणी या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकासमवेत माझ्या सहवेदना व्यक्त करतो. बाधितांना साहाय्य करण्यासाठी काम करत असलेले मंत्री आणि अधिकारी यांच्या मी संपर्कात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदी देहलीहून कर्णावती येथे जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सायंकाळी उशिरा कर्णावती येथे पोचले. त्यांनी त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी चर्चा केली.

विमान अपघात हृदयद्रावक ! – राहुल गांधी

कर्णावती येथील एअर इंडिया विमान अपघात हृदयद्रावक आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांच्या कुटुंबियांना होत असलेल्या वेदना अन् त्यांची चिंता, यांची कल्पना करता येणार नाही. प्रशासनाकडून त्वरित साहाय्य केले जाणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक जीव महत्त्वाचा असून प्रत्येक सेकंद महत्त्वपूर्ण आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना घटनास्थळी शक्य असेल ते साहाय्य करावे, असे आवाहन काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले.

पुतिन यांनी व्यक्त केले दुःख

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या अपघाताविषयी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या संदेशात दुःख व्यक्त केले आहे.

रशिया या दुःखात सहभाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.