सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

  • महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन

  • सर्व तलावांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश ! 

  • विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना !

उदय सामंत, उद्योगमंत्री

मुंबई, २७ जून (वार्ता.) – सिडको (नवी मुंबई) परिसरातील तलावांमधील पाणी प्रदूषणाच्या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे, तसेच ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’द्वारे या परिसरातील सर्व तलावांचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले जातील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २५ जून या दिवशी विधानपरिषदेत केली.

विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील यांनी सिडको परिसरातील तलावांच्या दुरवस्था आणि प्रदूषण याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे आणि प्रसाद लाड यांनीही सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘एम्.पी.सी.बी’द्वारे सिडको परिसरातील सर्व तलावांचे तात्काळ नव्याने सर्वेक्षण करून घेतले जाईल. या सर्वेक्षणाद्वारे पाणी प्रदूषणाची नेमकी कारणे शोधून त्याचा एक स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात येतील. या चौकशी अहवालामध्ये जे कोणी दोषी आढळतील, मग त्या व्यक्ती असोत किंवा संबंधित शासकीय यंत्रणा, त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.