ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी

छत्रपती संभाजी महाराज

नवी मुंबई, २७ जून (वार्ता.) – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम्.सी.) येथील धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शेकडो धर्मप्रेमी व्यापारी, माथाडी आणि ग्राहक उपस्थित होते. या वेळी धर्मवीर संभाजीराजे उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत झेंडे, अध्यक्ष गणेश पावगे, शशिकांत झेंडे, सतीश कोकणे आदी उपस्थित होते.

धर्मवीर संभाजीराजे उत्सव मंडळाच्या वतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची ३६९ वी संभाजीराजे जयंती उत्सव सोहळा आणि धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुलाचा ८ वा नामकरण वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला.

या वेळी धर्मवीर संभाजीराजे छत्रपती यांची चित्ररथासह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीपूर्वी शस्त्रपूजन करण्यात आले. ढोल पथक, लेझीम पथक, शिवकालीन मर्दानी खेळ, चित्ररथ असे स्वरूप असलेली ही मिरवणूक धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल आवक दारापासून चालू करून ती बाजारामधील चौकापर्यंत काढण्यात आली. या वेळी आतषबाजी करून ‘धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पारंपरिक वेशभूषा, भगवे फेटे आणि भगव्या टोप्या यांनी सर्व वातावरण भगवेमय झाले होते. मिरवणुकीच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला बाजारपेठेचे माजी संचालक शंकर पिंगळे, भाजीपाला घाऊक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे आदी उपस्थित होते.