उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !

मुंबई, २७ जून (वार्ता.) – तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी महामंडळाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. यामध्ये लांबच्या पल्ल्याच्या प्रवासामध्ये हॉटेलना एस्.टी.चे अधिकृत बसथांबे करण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. २४ जून या दिवशी विधानसभेमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस्.टी. महामंडळाचा तोटा न्यून करण्याविषयी कोणत्या उपाययोजना आखल्या जाणार आहेत ? याविषयी सदस्यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर परिवहन विभागाकडून लेखी उत्तर दिले आहे. या लेखी उत्तरामध्ये उत्पन्नवाढीसाठी राबवण्यात येणार्‍या विविध उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत.

एस्.टी.च्या गाड्या, तसेच बसस्थानके यांवर विज्ञापने प्रसारित करणे, राज्यातील एस्.टी. बसस्थानकांमधील जागा वाणिज्य आस्थापनांना भाडेतत्वावर देणे आदी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. महामंडळाचे उत्पन्न वाढीसाठी ‘तीर्थाटन’ योजनेसह अन्य काही योजना राबवण्यात येत आहेत, अशी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली आहे. वर्ष २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महामंडळाला ११ सहस्र १६० कोटी ४८ लाख रुपये इतका तोटा झाला आहे. वर्ष २०२५-२६ या अर्थिक वर्षात राज्यातील महामंडळाच्या ३१ पैकी केवळ ८ विभाग नफ्यात आहेत, तर उर्वरित २३ विभाग तोट्यात आहेत, अशी महामंडळाची आर्थिक दु:स्थिती आहे.