समर्थांची बलोपासना

‘समर्थ रामदासस्वामी यांच्या चरित्राचे आपण जर अवलोकन केले, तर आपणास प्रामुख्याने ‘चिंता करतो विश्वाची ।’ असे विचारपूर्वक बोलणारे बालपण, टाकळीत नारायणाचे रामदासात झालेले रूपांतर, पुरश्चरण, भारतभर पदभ्रमण आणि भ्रमण करत असतांना केलेली मठांची स्थापना अन् शिवरायांचे केलेले स्तवन, संभाजीराजांना केलेले मार्गदर्शन या त्यांच्या जीवनात बलोपासनेचे महत्त्व निरनिराळ्या पद्धतीने विवरण करून सांगितले आहे.

लेखक : श्री. शाम साखरे महाराज, मिरज, सांगली.

१. समर्थांचे बालपण आणि त्यांना वडिलांकडून मिळालेले सूर्यनमस्काराचे धडे

श्री. शाम साखरे महाराज

समर्थांचे वडील सूर्याजीपंत सूर्याचे उपासक होते, ते प्रतिदिन १२०० नमस्कार घालत असत. ‘समर्थ रामदासस्वामी यांच्यावर व्यायामाचा जो संस्कार झाला, तो सूर्याजीपंतामुळेच झाला’, असे म्हणावे लागेल. लहानपणी समर्थांचे ८ मित्र होते. ही आठही मुले पहिलवानासारखीच होती; म्हणून प.पू. गिरीधर स्वामी त्यांना ‘बलदंड मित्र’ असे म्हणत. समर्थ रामदासस्वामी यांनी (नारायणाने) त्यांच्या लहानपणापासूच वडिलांना सूर्यनमस्कार घालतांना पाहिले होते. त्यांनी सूर्यनमस्काराचा अभ्यास अचानक नाशिकला चालू केलेला नाही. लहानपणी जांब येथे असतांना शे-दीडशे सूर्यनमस्कार ते वडिलांच्या समवेत घालत असणारच. पोहणे, झाडावर सरसर चढणे, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणे, रानावनातून पशू-पक्ष्यांच्या मागे पळणे, फांद्याना लोंबकळणे, घराच्या छपरांवरून उड्या मारणे, हे सर्व समर्थांनी लहानपणी केल्यामुळे बलदंड शरीर, धाडसीवृत्ती आणि निसर्ग प्रेम अन् नेतृत्वाच्या गुणांनी ते युक्त झाले होते आणि यासाठी नारायणाला घरातून पूर्ण स्वातंत्र्य होते. आजच्या काळात काळजीपोटी आई-वडील मुलांवर बंधने घालून त्यांना दुबळे करतात, असे दिसून येते.

समर्थ कुशाग्र बुद्धीचे होते. त्यामुळे शालेय अभ्यास, तसेच संध्यावंदन, पाठपठण यांतही हुशार होते. ते मारुतिचे अवतार होते. हनुमंत हे शिवाचे अकरावे रुद्र म्हणजे सर्वांत बलशाली आहेत.

२. सहा वर्षांच्या नारायणाचे शारिरीक बल

समर्थ चरित्रात एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे, समर्थ ६ वर्षांचे म्हणजे लहान असतांना एकदा खेळण्यासाठी जवळच्या रानात गेले. तेथील शेतकर्‍यांनी धान्याची मळणी करून पोती भरून रांगेत उभी करून ठेवली होती. ती पाहून या ६ वर्षांच्या नारायणाने त्यातील एका शेतकर्‍यास विचारले ‘‘शेतकरीदादा, ही पोती केवढ्याला विकणार ?’’

नारायणाचा हा प्रश्न ऐकून शेतकरी कुचेष्टेने म्हणाला, ‘‘ए पोरा, उगीच चौकशा करू नको. तुला उचलून नेता येत असेल, तर फुकट घेवून जा.’’ नारायणाने क्षणाचाही विलंब लावला नाही. त्यातील भरलेले एक पोते सहज उचलले आणि पाठीवर टाकून घरी निघून गेला. शेतकरी बघतच राहिला. यावरून समर्थांच्या बळाची कल्पना येते. मुलांमध्ये मिसळावे, खेळावे, रानावनातून मनसोक्त  हिंडावे याची समर्थांना लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे ते बलसंपन्न होते.

३. समर्थांची साधना आणि तपश्चर्या

विवाहसमयी ‘सावधान’ म्हटल्यावर खरोखरच ते ‘सावध’ झाले आणि तेथून जे पळाले, ते मजल दरमजल करत नाशिकला आले. नाशिकमधील पंचवटीपासून दोन-अडीच मैलांवर असलेल्या टाकळी या गावी आले. तेथे गोदावरी आणि नंदिनी नद्यांचा संगम असून निसर्गरम्य असा परिसर होता. तेथे जवळच असलेल्या गुहेत समर्थांनी मुक्काम केला आणि तपश्चर्या चालू केली.

समर्थ ब्राह्ममुहुर्तावर म्हणजे पहाटे तीन-साडेतीन वाजता उठत. चार-साडेचार पर्यंत स्नानसंध्या आवरून गुहेजवळील मोठ्या मैदानात १२०० सूर्यनमस्कार प्रतिदिन घालत असत. समाजसेवेसाठी, देशसेवेसाठी शरीर चांगले सुदृढ, बलसंपन्न रहावे, याची काळजी घेण्यात समर्थ पुष्कळ दक्ष असत. टाकळीच्या दिनचर्येत त्यांचे व्यायाम, अभ्यास, जप-जाप्य या तीनही गोष्टीचे सुंदर संतुलन दिसून येते.

४. तत्कालीन स्थिती लक्षात घेऊन लोकांना बलसंपन्न करण्यासाठी केलेले प्रयत्न

तसे पाहिले, तर पारमार्थिक माणसाचा व्यायामाशी कधीच संबंध येत नाही, असे दिसून येते. पंडित किशोरजी व्यास यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे ‘दुर्बल रहाण्याचे पाप सज्जनांनी अगदी नियमितपणे केले आहे’; मात्र समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद ही २ थोर माणसे नियमित व्यायाम करत असत आणि त्यांनी त्यांच्या संप्रदायातील लोकांना, साधकांना परिस्थितीचे  भान ठेवून व्यायामाची गोडी लावली. ‘बलोपासना वाढवा, त्याविना तरणोपाय नाही’, हे पटवले किंवा दिक्षाच दिली. व्यायामास प्रवृत्त केले. समर्थ म्हणतात, ‘‘धटासी आणावा धट । उद्धटासी पाहिजे उद्धट ।।’’ त्या काळात समर्थ भारतभ्रमण करत असतांना भारतातील भारतियांची परिस्थिती त्यांनी पाहिली होती. अशा परिस्थितीत ‘एका गालात मारलेली दुसरा गाल पुढे करावा’, असे म्हणून चालणारे नव्हते, तर मारणार्‍याचा हात रोखून धरण्याची आणि हिसडा मारून खाली ओढण्याची सिद्धता असली पाहिजे, हे हेरून त्यासाठी समर्थांनी संप्रदाय बलवान, बलसंपन्न करण्याचा प्रयत्न केला.

आदरणीय सेतुमाधव पगडी यांनी त्यांच्या ‘समर्थ संप्रदाय’ या ग्रंथात बलवान आणि दिर्घायुषी शिष्यांची नावेच दिली आहेत. उदाहरणार्थ, समर्थांचे वय ७५ वर्षे, उद्धवस्वामी यांचे ८७ वर्षे, भीमस्वामी यांचे वय ९९ वर्षे, कल्याणस्वामी यांचे ८० वर्षे, अक्कास्वामी ८५ वर्षे, दिनकरस्वामी ८० वर्षे, हे सर्वजण अगदी चांगल्या तब्येतीने जगले आणि शेवटपर्यंत संप्रदायाचे कार्य करत होते.

५. दुर्जनांनी दिर्घायुषी रहाणे आणि सज्जनांनी अल्पायुषी असणे, हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी घातक !

दुर्जनांनी दिर्घायुषी रहाणे आणि सज्जनांनी समाजसेवा, राष्ट्रसेवा करणार्‍यांनी अल्पायुषी असणे, हे राष्ट्राची प्रगती आणि समाजहित यांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आध्यात्मिक, पारमार्थिक माणसाने साधनेच्या नावाखाली देहाची हेळसांड सतत केली आहे; मात्र समर्थ रामदासस्वामी आणि स्वामी विवेकानंद यास अपवाद आहेत.

‘दीर्घायुषी आणि बलसंपन्न शरीर असणारे साधक तयार करणे, ही समर्थांची भारतमातेला देणगी आहे’, असे म्हटले, तर वावगे होणार नाही. समर्थ रामदासस्वामी व्यायामामुळे मनगट, जपध्यानामुळे मन आणि ग्रंथ अध्ययन करून मेंदू बलवान करून समाज अन् राष्ट्र घडवत होते. हेच कार्य बंगालमध्ये स्वामी विवेकानंद करत होते. समर्थांनी बालवयापासून शेवटपर्यंत शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संर्वधनाला अतिशय महत्त्व दिले होते. तीनही गोष्टींची बलोपासना वाढवून स्वराज्यासाठी ते धडपडत होते. राष्ट्रसेवा, यवनांना हरवणे, ही त्यांची उद्दिष्टे होती.

६. गावागावांत मारुतिच्या मंदिरांची स्थापना करून समाजाला बलोपासनेचा केलेला उपदेश आणि संघटन

समर्थांचे दैवत हनुमान होते. मारुति हा अकरावा रुद्र होता. समर्थ रामदासस्वामी हे मारुतिचे अवतार मानले जातात, जे बलोपासनेचे दैवत आहे. त्यामुळे समर्थ रामदासांना इ.स. १६४५ ते १६४९ या काळात महाबळेश्वर, वाई, कराड, मसूर, चाफळ, कोल्हापूर, सांगली, चंद्रगिरी (उंब्रज) अशा ठिकाणी मारुति मंदिरे उभारली आणि शक्ती, बलोपासना वाढवण्याचा प्रयत्न केला. समाजाने हनुमंतासारखे बलशाली व्हावे, बलोपासना वाढवावी, तसेच बौद्धिक वैभवात वाढ करावी आणि संघटित होऊन परकीय जुलुमी सत्ता, तिचा होणारा त्रास, अन्याय, अत्याचार संपवून टाकून भारतमातेचे वैभव परत निर्माण करावे, हाच ध्यास होता. ‘गाव तिथे मारुति’ हे जणू समर्थाांच्या जीवनाचे अविभाज्य अंगच होऊन गेले होते. समर्थ गावागावांत मारुतिची मंदिरे बांधत होते. हनुमानाची ही मंदिरे म्हणजे त्या काळातील व्यायामशाळाच होत होत्या. अनेक तरुण मुले हनुमान मंदिरात येऊन बलोपासना करत.

समर्थ रामदासांनी वर्ष १६४५ ते १६५६ या १०-११ वर्षात सातारा जिल्ह्यात ७, सांगली जिल्ह्यात २ आणि कोल्हापूर जिल्ह्यात २ असे ११ मारुति स्थापन केले. आज ते ‘वारीचे मारुति’ म्हणून ओळखले जातात आणि त्याला पुष्कळ महत्त्व आहे. अशा पद्धतीने समर्थांचे महाराष्ट्रात कार्य आणि भ्रमण चालले असतांना श्री शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा दबदबा महाराष्ट्रात चांगलाच झाला होता. त्याचा लाभ घेत समर्थ समाज बलदंड करण्याचा प्रयत्न करत होते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकमेकांच्या सहकार्याने समाज उभारणीचे, राष्ट्र उभारणीचे पवित्र कार्य करत होते.

७. समाजाचे मनोधैर्य वाढवून त्याला बलदंड करून यवनांशी लढण्याची केलेली सिद्धता

समाजाची मानसिक सिद्धता करून, मनोधैर्य वाढवून समाज बलदंड केला आणि काही शिष्यांना समवेत घेऊन मसूरमध्ये पहिला रामोत्सव धुमधडाक्यात साजरा केला. हे करत असतांना मंदिरे पाडणार्‍या आणि मूर्ती फोडणार्‍या यवनांशी संघर्ष करण्याची पूर्ण सिद्धता त्यांनी केली होती. समर्थांची ही सिद्धता पाहून यवन सरदार घाबरून गेले आणि रामनवमीचा उत्सव आनंदाने पार पडला. लोकांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला. ‘आपण हे करू शकतो. केवळ आपण संघटित होऊन बलोपासना वाढवली पाहिजे’, अशा प्रकारे संघटनेच्या बळावर गावोगावी समर्थ यवनांवर धाक निर्माण करत होते. याचे एक उदाहरण म्हणजे सातार्‍यातील माहुलीला एक मुसलमान ठाणेदार होता. तो हिंदूंना पुष्कळ त्रास देई. २-३ सुफी फकीर गोळा करून हिंदूंना सक्तीने धाकदपटशहाने मुसलमान करत असे. समर्थांचे पहिले शिष्य उद्धवस्वामी माहुलीला संगमावर स्नानसंध्या करत असतांना त्या ठाणेदाराने त्यांना पकडले आणि सक्तीने मुसलमान होण्याची दिक्षा देण्याचा प्रयत्न करू लागला. उद्धवस्वामींनी  त्यास नकार दिला, विरोध केला. तेव्हा त्या ठाणेदाराने त्यांना कारागृहात डांबले. काही दिवसांत हे वृत्त समर्थांना कळले, तेव्हा समर्थ ६० ते ७० बलदंड शिष्यांना घेऊन माहुलीला पोचले आणि ठाणेदार अन् फकीर यांना बदडून काढले, तसेच उद्धवस्वामींना सोडवले. असे अनेक प्रसंग आपल्याला समर्थ चरित्रात मिळतील.

आज समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपेने आपण ‘हिंदु’ म्हणून जगत आहोत. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शाम साखरे महाराज, मिरज, सांगली.