आपल्याला इस्रायलसारखे व्हायचे आहे ना ?

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर लष्करी कारवाईच्या संचालकांनी (‘डी.जी.एम्.ओ.’ने) नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व पुरावे देऊन भारताने निर्विवादपणे दाखवून दिले की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये एकच विजेता आहे आणि तो म्हणजे भारत. भारतीय सैन्याने ३ दिवसांच्या युद्धामध्ये आपण पहिल्या दिवशी पाकिस्तानमधील आतंकवादी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले, तर शेवटच्या दिवशी केवळ ९० मिनिटांमध्ये आपण पाकिस्तानमधील ११ ‘एअर फोर्स बेसेस’वर (हवाई दलाच्या तळांवर) यशस्वी आक्रमणे केली आणि त्यातल्या एका बेसवर पाकिस्तानच्या अणुयुद्धाचे ‘कमांड सेंटर’ (नियंत्रण केंद्र) होते. साधारण त्याच वेळेला पाकिस्तानच्या त्या भागात ४.३ रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का नोंदवला गेला. भारताने जाणूनबुजून किंवा नकळत पाकिस्तानच्या अणुकेंद्रावर आक्रमण केले का ? माहिती नाही; पण या कैरनाच्या ‘एअर बेस’वर आक्रमण झाल्यानंतरच अतिशय जलद गतीने चक्रे फिरली. यानंतरच पाकिस्तानने अमेरिकेचे साहाय्य मागितले आणि अमेरिकेने मध्यस्थी करून पाकच्या ‘डी.जी.एम्.ओ.’ला भारताला दूरभाष करायला लावला आणि युद्धविराम घोषित झाला.

१. विजय भारताचाच; पण भारतियांची अपेक्षा !

ज्या दिवशी युद्धविराम घोषित केला, त्या दिवशी कोट्यवधी राष्ट्रवादी भारतियांप्रमाणे मीही थोडीशी खट्टू झाले होते. ‘आपण निर्विवादपणे जिंकत होतो, पाकिस्तान बॅकफूटवर (पिछाडीवर) होता’, अशा वेळी हे पाऊल का उचलले गेले ?, हे इतर अनेक राष्ट्रवादी नागरिकांप्रमाणे मलाही समजत नव्हते; पण त्याचे उत्तर कालच्या पत्रकार परिषदेत मिळाले. आपले ध्येय आतातरी पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचे नव्हते, तर त्यांचे आतंकवादी तळ उद्ध्वस्त करणे, भारतीय सैन्याची शक्ती त्यांना दाखवून देणे आणि मनात आणले, तर पाकच्या कुठल्याही शहरावर, कुठल्याही बंदरावर, कुठल्याही विमानतळावर, कुठल्याही सैन्य तळांवर भारत आक्रमण करू शकतो, हे भारताने पाकिस्तानला सप्रमाण दाखवून दिले. हा फार मोठा विजय आहे.

असे असले, तरीही आपल्यातील बर्‍याच लोकांना अजूनही वाटत आहे की, इतके तडकाफडकी युद्ध थांबवायला नको होते. आपण इस्रायलसारखे लढायला पाहिजे होते. इस्रायलने ज्याप्रमाणे गाझा उद्ध्वस्त केले, तसे आपण पाकिस्तानशी करायला पाहिजे होते. अपेक्षा रास्तच आहे; पण आपण इस्रायल नाहीत. आपण भारत आहोत आणि आपल्या देशात अंतर्गत वाळवी पुष्कळ आहे.

२. इस्रायल-हमास यांच्या युद्धाच्या वेळी इस्रायलमधील प्रगल्भ स्थिती

लेखिका सौ. शेफाली वैद्य

गेल्याच वर्षी जानेवारीमध्ये मी इस्रायलमध्ये होते एका माध्यम शिष्टमंडळाचा भाग म्हणून. गाझा सीमेवर जोरदार युद्ध चालू होते; पण जेरुसलेम शहर जगातील कुठल्याही मोठ्या शहरासारखे भासत होते. नागरिकांचे प्रतिदिनचे व्यवहार नेहमीसारखे चालू होते. कॅफेमध्ये लोक घोळक्या-घोळक्याने बसून गप्पा मारत होते, शाळेत जाणारी मुले स्कूल बसमध्ये खिदळत होती; शाळा, महाविद्यालये, मॉल, दुकाने, रेस्टॉरंट्स सर्व व्यवस्थित चालू होते. जेरुसलेमच्या जुन्या, ऐतिहासिक भागात लोक ‘सेल्फी’ (स्वतःच स्वतःचे छायाचित्र) घेत होते. वरवर पाहिले, तर कुठेच वाटत नव्हते की, जेरुसलेमपासून केवळ ४ घंट्यांच्या अंतरावरील भागात युद्ध चालू आहे; पण त्या शांत, तरंग नसलेल्या पृष्ठभागाखाली अस्वस्थतेचा खळाळता भोवरा होता. मधूनच आकाशात गरजत जाणारे लढाऊ विमाने, अधूनमधून वाजणारे सायरन्स (धोक्याची घंटा), रेस्टॉरंटमध्ये बसून फसफसणार्‍या बिअरसह तरुणांच्या गर्दीत सैनिकी गणवेशातील तरुणही होते, जे कमरेला ‘एके ४७’ बंदूक लावून बिअरचा आस्वाद घेत होते. आम्ही उतरलो होतो ते जेरुसलेममधील हॉटेल गाझा सीमेवरून आलेल्या विस्थापितांनी भरले होते. ८ ते १० जणांची मोठी कुटुंबे एका खोलीत रहात होती; पण तिथेही त्यांचे प्रतिदिनचे व्यवहार चालू होते.

वरवर पाहिले, तर सगळीकडे शांतता होती; पण ही शांतता युद्ध स्वीकारून आलेली प्रगल्भ शांतता होती. कुठेही अराजक नव्हते. कुणीही ‘युद्ध थांबवा’, असे म्हणून मेणबत्ती मोर्चा काढत नव्हते. इस्रायलचे अनेक लोक हमासने ओलीस ठेवले होते. त्यांची छायाचित्रे सर्व सार्वजनिक ठिकाणी दिसायचे; पण कुणीही दिवसरात्र ‘डी-एस्केलेट’ (तणाव न्यून करा) म्हणत रडत नव्हते. इन्स्टाग्रामवर ‘व्हायोलन्स इज नेव्हर द अन्सर’ (हिंसाचार हा कधीच उपाय नाही), असे म्हणत कुणी महिला पुष्कळ मेकअप (रंगभूषा) करून ‘रिल्स’ (छोटी ध्वनीचित्रफीत) प्रसारित करत नव्हती.

इस्रायलने हमासला शिकवला धडा

३. इस्रायलमधील घराघरांत पोचलेला युद्धाचा संस्कार

युद्धाची झळ इस्रायलच्या घराघरांत पोचली होती. आम्हाला भेटलेल्या प्रत्येक नागरिकाच्या घरची, प्रेमाची कुणीतरी व्यक्ती गणवेशात होती. कुणाचा २१ वर्षांचा लेक सीमेवर लढत होता, कुणाची मुलगी वायूदलामध्ये होती, कुणाचा भाऊ रणगाडा पथकात होता, कुणाचा नवरा बाँबनाशक पथकात काम करत होता, तर कुणाची तरी आई गाझाजवळ ‘फिल्ड हॉस्पिटल’ (युद्धाच्या ठिकाणी चालवण्यात येणारे रुग्णालय) चालवत होती. सर्वांचेच काहीतरी मौल्यवान पणाला लागले होते. युद्धाची किंमत प्रत्येक इस्रायली चुकवत होता आणि म्हणूनच शांतीचे मूल्य त्यांना माहिती होते.

मी त्या दौर्‍यात ज्या ज्या इस्रायली लोकांना भेटले, त्यापैकी कुणीही ‘युद्ध हवे’, असे एका शब्दानेही कधी म्हटले नाही; पण एकाही व्यक्तीने ‘हे युद्ध आवश्यक नव्हते. हे युद्ध टाळता आले असते’, असेही कधी म्हटले नाही; कारण प्रत्येक इस्रायली व्यक्तीला हे अगदी लहानपणापासून माहिती असते की, जेव्हा तुमच्या अस्तित्वालाच धोका असतो, तेव्हा युद्ध ही निवड नसते, ती एक अपरिहार्यता असते.

४. इस्रायलमध्ये राजकीय मतभेद असले, तरी दिसलेले राष्ट्रप्रेम !

हमासने इस्रायलमध्ये जी क्रौर्याची परिसीमा गाठली, चिमुकल्या बाळांचे शिर छाटणे, महिलांवर बलात्कार, नागरिकांना जिवंत जाळणे याविरुद्ध इस्रायलचे लोक संघटितपणे उभे राहिले होते. भारतासारखाच इस्रायल हा अंतर्गत राजकीय मतभेदांनी भरलेला देश आहे; पण जेव्हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होतो, तेव्हा तेथील उजवे, साम्यवादी, धार्मिक ज्यू आणि नास्तिक ज्यू, अशा सर्वांनी एकच सूर लावला होता, ‘इस्रायली लोकांचे सांडलेले रक्त वाया जाता कामा नये. हमासला धडा शिकवलाच पाहिजे, त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर !’

५. ‘आपला देश अधर्माशी युद्ध करणार्‍या श्रीकृष्णाचा आहे’, हेच विसरलो !

जेव्हा मी भारताकडे पहाते, तेव्हा मी स्वतःलाच विचारते, ‘आपल्याला हे समजण्यासाठी आणखी किती रक्तपात, आणखी किती उरी, किती पहलगाम घडावे लागतील ? ‘हा देश बुद्धाचा आहे, युद्धाचा नाही’, असे म्हणत बेंबटणारे लोक हे का विसरतात की, बुद्धाच्याही आधी हा श्रीकृष्णाचा देश आहे. जो सांगतो की, ‘अधर्माशी युद्ध करणे’, हा खरा धर्म आहे. आपण झुरळासारखे लपून बसून मिळवलेली शांती नाही, तर ती बळावर आधारलेली शांती असावी. कधी कधी मला वाटते की, आपण भारतीय पुष्कळ मऊ आणि लिबलिबीत झालेलो आहोत. निष्क्रीय, आळशी, आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टींचेही रक्षण करण्यास अनिच्छुक आहोत. सोयीसुविधांच्या उबदार गादीवर  झोपतांना बलीदानाचा खडबडीत स्पर्श विसरलेले झालो आहोत.

इस्रायल जेव्हा हमासवर युद्ध लादतो, तेव्हा तेथील प्रत्येक नागरिक मग त्याचे राजकीय, धार्मिक विचार काहीही असू देत, आपल्या देशाच्या सरकारमागे ठामपणे उभा रहातो. तो देश एकजुटीने लढतो. महत्त्वाचे म्हणजे त्या लढाईची पुरेपूर किंमत तेथील प्रत्येक नागरिक मोजतो.

६. भारताची दयनीय स्थिती आणि शत्रूबोध होण्याची आवश्यकता

आता आपल्या देशात बघा. काही दिवसांपूर्वी जे लोक ‘डिसएस्कलेशन’चा (तणाव न्यून करा) राग आलापत होते, नेमके तेच लोक आज मोदींवर ‘युद्धविराम’ मान्य केल्याकारणाने तोंडसुख घेत आहेत ! कालपर्यंत ज्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय केवळ सैन्याला देऊन त्यामागे असलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा अपमान केला, तेच लोक आज वर्ष १९७१ च्या युद्धात इंदिरा गांधी कशा जिंकल्या, याचे कौतुक करत आहेत, जणू काही इंदिरा गांधींनी एकटीने पाकिस्तानचा पराभव केला होता !

‘ऑपरेशन सिंदूर’ विजय भारताचाच

हो, वर्ष १९७१ मध्ये भारताचा विजय झाला; पण त्यासाठी आपण किती किंमत मोजली, याची कल्पना आहे का ? जवळजवळ ४ सहस्र भारतीय सैनिक त्या युद्धात हुतात्मा, ६ सहस्रांहून अधिक सैनिक गंभीर घायाळ झाले. वर्ष १९७१ मध्ये आपण युद्ध जिंकलो; कारण त्या वेळी संपूर्ण देश एकत्र होता. राजकीय नेतृत्व, विरोधी पक्ष, सैन्य आणि सामान्य जनता या सर्वांनी मिळून तो विजय मिळवला होता.

आज परिस्थिती काय आहे ? पाकिस्तानसारख्या बाहेरच्या शत्रूशी लढून विजय मिळवणे फार सोपे आहे; पण भारतात राहून पाकिस्तानचे नागरिक असल्यासारखे वागणारे लाखो लोक आहेत या देशात. त्यांचे काय करायचे ? लक्षात ठेवा, ‘आपण इस्रायलसारखे बनूच शकत नाही, जोपर्यंत आपले नैतिक बळ इन्स्टाग्राम फिल्टरसारखे खोटे आणि आभासी आहे. आपल्यातील देशद्रोही वाळवीचा कुरूप चेहेरा आधी ओळखायला शिका आणि जिथे दिसतील, तिथे त्यांचा प्रतिकार करा.

७. भारत इस्रायलसारखा होण्यासाठी… !

‘ऑपरेशन सिंदूर’ची बाजी भारत निर्विवादपणे जिंकला आहे. सैन्याने पत्रकार परिषदेत इतके उघड पुरावे देऊनही जर तुमच्या ओळखीतील कुणी हे मान्य करू इच्छित नाही, तर जाणून घ्या की, ते देशद्रोही आहेत. इस्रायलसारखे होण्यासाठी भारताच्या पाठीमागे उभे रहावे लागते, ठाम भूमिका घ्यावी लागते. तुम्हाला जर खरच इस्रायलसारखा भारत हवा असेल, तर आधी भारतासाठी उभे रहा, आपल्या नेतृत्वामागे ठामपणे उभे रहा, देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांच्या पाठिशी ठाम उभे रहा. कधी कधी शांततेकडे नेणारा एकमेव मार्ग, म्हणजे युद्धच असते आणि इतिहास नेहमीच लढणार्‍या राष्ट्रांचीच आठवण ठेवतो, हरणार्‍यांची नाही.

– सौ. शेफाली वैद्य, पुणे.

संपादकीय भूमिका

भारताने बाहेरील शत्रूंसमवेत देशांतर्गत असणार्‍या देशद्रोही शत्रूंना शोधून त्यांचा प्रतिकार करणे आवश्यक आहे !