‘ऑपरेशन सिंदूर’चा युद्धविराम : अपसमज आणि कारणमीमांसा !

‘ऑपरेशन सिंदूर’विषयी जाणून घेण्यापूर्वी गेल्या १० वर्षांत घडलेल्या घटना लक्षात घेऊन सरकारच्या युद्धविराम करण्याच्या निर्णयामागचा हेतू जाणून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. १६ मे २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गेल्या १० वर्षांत भारतामध्ये होत चाललेला पालट, अमेरिका, पाश्चात्त्य राष्ट्रे (नाटो) आणि चीन यांचे भारताविरुद्धचे षड्यंत्र अन् भारताची युद्धविरामाची घोषणा देशातील नागरिकांना मिळालेला मोठा धक्का’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/914054.html

‘ऑपरशन सिंदूर’ अंतर्गत केलेली कारवाई !

४. युद्धविरामाच्या मागची कारणे

भारत सरकार आणि भारतीय सैनिक यांनी पाकिस्तानसह चाललेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संदर्भात घेतलेल्या युद्धविरामाच्या मागची कारणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

अ. रणनीती विराम : भारताच्या गुप्तचर यंत्रणेने या युद्धविरामाच्या संदर्भात ‘टॅक्टिकल पॉज’ असा शब्दप्रयोग केला आहे. याचा अर्थ रणनीती विराम ! हा विराम जाणीवपूर्वक घेतला आहे. त्यामागचा हेतू आपण आतापर्यंत केलेल्या कार्याचे मूल्यमापन करणे, पुनर्गठन करणे, रणनीतीत पालट करणे यादृष्टीने विचार करण्यासाठी घेतलेला विराम आहे, असे गुप्तचर यंत्रणेला सांगायचे आहे.

आ. नियमांचे उभयतांनी काटेकोरपणे पालन करणे : सैन्याने युद्धविरामासाठी वापरलेला शब्द आहे ‘म्युचुअल अंडरस्टँडिंग’! याचा अर्थ युद्धप्रसंगाच्या दृष्टीने काय होतो, ते पाहिले पाहिजे. व्यावहारिक दृष्टीने याचा अर्थ घेतला, तर युद्धाच्या अनुषंगाने गडबड होईल. युद्धकाळात आपण परस्परांविरुद्ध ज्या शस्त्रास्त्रांचा वापर करतो, त्याचा वापर करतांना दोन्ही बाजूंकडून ताळतंत्र पाळले गेले पाहिजे; म्हणून न्यूनतम संहारक असलेल्या शस्त्रांचा वापर करणे परस्परांकडून अपेक्षित आहे. सर्वसामान्य जनतेची प्राणहानी या युद्धात होणार नाही, याची काळजी दोघांनी घ्यायची आहे. आण्विक अस्त्रांचा उपयोग आपल्याला अजिबात करायचा नाही. हे जे सर्वसामान्य नियम आहेत, त्या नियमांचे उभयतांनी काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे.

इ. अणूबाँब स्फोट चाचणीमुळे भूकंपाची शक्यता : ३० एप्रिल २०२५ या दिवशी भारतीय वेळेप्रमाणे रात्री १० वाजता पाकिस्तानमध्ये ४.४ रिक्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामागचे कारण पाकिस्तानने अणूबाँब स्फोटाची केलेली चाचणी हे असावे. त्यानंतरही पुन्हा १-२ भूकंप पाकिस्तानात झाले आहेत.

श्री. दुर्गेश परुळकर

ई. पाकच्या पोकळ धमक्या : २२ एप्रिल २०२५ या दिवशी काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हत्याकांडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आतंकवाद्यांना ते जिथे असतील, तिथे शोधून मारले जाईल’, असे घोषित केले होते. ‘मोदी सांगितल्याप्रमाणे वागणार’, याची निश्चिती पाकिस्तानला होती. भारताने त्याप्रमाणे जर लष्करी कारवाई केली, तर भारताला या कारवाईपासून पराभूत करण्यासाठी अणूबाँबचा उपयोग करायचा, हे पाकिस्तानने ठरवले होते. पाकमधील नेते आणि सैन्याधिकार यांनी ‘आमच्याकडे अणूबाँब आहे. आम्ही त्याचा उपयोग करू’, असे सांगितले होते. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.

उ. मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करतांना त्यांच्या भाषणात कधीही असे म्हटले नाही, ‘भारत पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेईल.’ जनतेनेच मनातून ठरवले की, आता पाकव्याप्त काश्मीर आपण घेणार.

ऊ. भारताची ‘लष्करीदृष्ट्या समर्थ असलेला देश’ म्हणून ओळख : पाकिस्तानने जेवढे ड्रोन पाठवले, ते सर्वच्या सर्व ड्रोन आपल्या सैन्यदलाने निष्प्रभ करून पाडले. भारतीय सैन्याने हा जागतिक विक्रम केला आहे. ‘एस्-४००’च्या  साहाय्याने भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा किती प्रभावी, अचूक आणि बलशाली आहे, हे भारताने सिद्ध केले. ‘एस्-४००’ची अचूकता १०० टक्के आहे, हे प्रत्यक्ष रणांगणावर सिद्ध करण्यात भारताने यश संपादन केले आहे. यामुळे संपूर्ण जगाला सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे भारत हा जगातील ‘लष्करीदृष्ट्या समर्थ असलेला देश’ म्हणून ओळखला जाईल. त्यासह लष्करी सामर्थ्य असूनही भारताने त्याचा संयम आणि निर्बंध यांची चौकट मोडली नाही, हे वैशिष्ट्यसुद्धा जगाच्या लक्षात आले आहे. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही.

ए. भारताची आरोग्यविषयक आपत्कालीन सिद्धता : पाकिस्तान अण्वस्त्राचा उपयोग भारताविरुद्ध करण्याच्या सिद्धतेत असल्याची कुणकुण भारत सरकार आणि भारतीय सैन्य यांना लागली. त्यामुळे लगेचच ‘एम्स’ रुग्णालय यांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय साहाय्यासाठी सज्ज रहाण्यास सांगण्यात आले. वास्तविक भारताकडून पाकिस्तानची सर्व आक्रमणे निष्प्रभ करण्यात येत होती. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची किंवा मोठ्या प्रमाणात जनता घायाळ होण्याची शक्यता नव्हती. तरीही ‘एम्स’ रुग्णालयांना सज्ज रहाण्यासाठी सांगण्यात आले. याचा अर्थ पाकिस्तान देहलीवर अणुबाँब टाकण्याच्या सिद्धतेत होता, हा तर्क योग्य ठरतो.

ऐ. भारताने पाकच्या ‘एअर बेस’ची केली धूळधाण ! : भारताने क्षेपणास्त्राच्या साहाय्याने पाकच्या विमानांना पाडण्याचा प्रयत्न करू नये; म्हणून प्रवासी विमानांच्या आड राहून पाकिस्तान मोठी कारवाई करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचा हा प्रयत्न मोडून काढण्यासाठी भारतीय सैन्याने पाकच्या १२ ‘एअर बेस’ची (लष्करी लढाऊ विमानतळांची) धूळधाण केली. सैन्य तळ आणि संपूर्ण टेहळणी यंत्रणाही पूर्णपणे निकामी केली. त्याचा परिणाम असा झाला की, भारतावर अणूबाँब टाकण्याच्या पाकिस्तानच्या उद्दिष्टालाच भारतीय सैनिकांनी मातीत मिसळले. पाकिस्तानकडे अणूबाँब आहेत. ते भारतावर टाकण्यासाठी लागणारे विमानही आहे; पण ती विमाने आकाशात झेप घेण्यासाठी लागणारी उपयुक्त धावपट्टीच अस्तित्वात नाही. अशी पाकिस्तानची अवस्था झाल्यामुळे आता जे उद्दिष्ट साध्य करायचे त्यासाठी लागणारी साधने उपलब्ध नसल्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव मांडला गेला.

ओ. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचेही लक्ष होते. ‘पाकिस्तान भारताविरुद्ध अणूबाँबचा उपयोग करील’, अशी शक्यता त्यांनाही वाटली; म्हणून त्यांनी ‘परस्परांनी युद्ध थांबावे’, असे आवाहन केले. असे असले, तरी कदाचित् याहीपेक्षा वर उल्लेख केल्याप्रमाणे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या मुलाखतीत ‘पाकिस्तानच्या हातून आतंकवादी घाणेरडे कृत्य गेली ३० वर्षांपेक्षा अिधक काळ चालू आहे’, असे सांगत याचा दोष त्यांनी अमेरिका आणि पाश्चात्त्य राष्ट्रांना दिला आहे. यामुळे जगात अमेरिकेची प्रतिमा काळवंडली गेली. परिणामी ती सावरण्यासाठी ‘भारत-पाक यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी केली’, असे ट्रम्प सांगण्याचा प्रयत्न करत असावेत’, असे वाटते; कारण भारताने ‘डॉनल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यावर आम्ही हा निर्णय घेतला’, असे म्हटलेले नाही. त्यात ‘पाकिस्ताननेच आता युद्ध नको’, असा पवित्रा घेतला होता.

पाकिस्तानच्या ‘डी.जी.एम्.ओ.’ने (‘डायरेक्ट जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ – सैनिकी कारवायांचे महासंचालक) भारताच्या ‘डी.जी.एम्.ओ.’ला ‘आता युद्ध नको’, अशी काकुळतीला येऊन विनंती केली. ‘पाक युद्ध करण्यास आता निष्प्रभ झाला’, असा संकेत यातून मिळाला. त्यामुळे भारताकडून युद्धाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती देतांना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ चालूच रहाणार’, असे सांगितले, तसेच ‘सिंधु जल कराराविषयी घेतलेला निर्णय भारताने पालटलेला नाही आणि पालटणार नाही’, असे ठणकावून सांगितले आहे. ‘पाकिस्तानकडून होणारे कोणतेही आतंकवादी कृत्य, म्हणजे युद्ध असा अर्थ लावला जाईल’, हेही भारताने स्पष्ट केले. त्याला तर जागतिक मान्यताच आहे. त्याचप्रमाणे ‘आतंकवादी आक्रमणे आणि पाकव्याप्त काश्मीर या दोन विषयांवरच भारत चर्चा करील’, हेसुद्धा पाकिस्तानला आणि जगाला भारताने स्पष्ट करून सांगितले. याचा अर्थ ‘भारताने माघार घेतली’, असा अर्थ होत नाही.

५. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे साध्य झालेल्या गोष्टी

अ. पाकिस्तानचे १२ ‘एअर बेस’ आणि सैन्य तळे नष्ट केली.

आ. संपूर्ण टेहळणी यंत्रणा नष्ट केली.

इ. चीनची लढाऊ विमाने आणि ड्रोन कुचकामी आहेत, हे सिद्ध करून चीनला उघडे पाडले.

ई. मुळातच पाकिस्तानची युद्ध क्षमता अत्यंत कमकुवत होती. भारताने ती अजून निम्म्याने अधिक कमकुवत केली.

उ. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे साडेसात मिलियन डॉलर्सचे कर्ज मागितले होते; पण त्यांनी १ मिलियन डॉलर्स एवढे कर्ज देण्याचे मान्य केले. इतकी रक्कम पाकिस्तानला त्यांचे नवीन ‘एअर बेस’ सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाही.

ऊ. हा युद्धविराम घेऊन अणूयुद्धाच्या दिशेने  जाणार्‍या पाकिस्तानच्या वाटचालीला भारताने थांबवले. जीवित आणि पर्यावरण यांची हानी थांबवण्यात यश संपादन केले.

ए. भारताने लष्करी सामर्थ्य सिद्ध केले. भारताने निर्माण केलेल्या ‘ब्रह्मोस’ची प्रत्यक्ष चाचणी युद्धात करून त्याची शतप्रतिशत उपयुक्तता जगाच्या निदर्शनास आणून दिली.

ऐ. शस्त्रास्त्र निर्मितीत भारत उत्तम प्रकारे प्रगती करत असून भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे अव्वल दर्जाची आहेत, हे सिद्ध झाले.

ओ. भारतीय सैन्याची युद्ध कुशलता, धैर्य, शौर्य, संयम यांसह अनेक गुणांचे दर्शन जगाला घडले. यासह भारताचे पालटलेले युद्धशास्त्र आणि युद्धतंत्र यांचेही दर्शन घडले.

औ. ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू असतांना भारतातील बाजारभाव घसरला नाही. ही घटना विशेषत्वाने नोंद करण्यासारखी आहे.

६. नागरिकांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने कृतीत आणावयाची सूत्रे

आता नागरिक म्हणून आपल्याला काही गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणायच्या आहेत, त्याची सूची मोठी आहे; पण न्यूनतम पुढील गोष्टी आपण कृतीत आणणे नितांत आवश्यक आहे.

अ. भारताला पक्षीय राजकारणातून बाहेर पडून राष्ट्रहिताचा विचार करावा लागेल.

आ. राष्ट्राच्या आर्थिक विकासासह सर्व प्रकारचा विकास, सामर्थ्य, सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, सामाजिक ऐक्य, शांतता सुव्यवस्था यांना बाधा उत्पन्न करणार्‍या कोणत्याही गोष्टीला देशातील कोणत्याही नागरिकाने आणि राजकीय पक्षांनी थारा देऊ नये.

इ. आतंकवादी, जिहादी हे देशाचे शत्रू आहेत. त्यांच्याविषयी दयाभाव मनात जागृत होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. राष्ट्रवादच देशाला तारणारा आहे; म्हणून देशातील प्रत्येक नागरिक हा राष्ट्रवादाने प्रेरित झालेला असला पाहिजे. ‘कोणताही पक्ष हा राष्ट्रापेक्षा मोठा नाही’, याची जाणीव नागरिकाने ठेवली पाहिजे.

ई. कोणतेही युद्ध केवळ युद्ध सामुग्रीवर लढता येत नाही. त्याला आर्थिक बळाची जोड असावी लागते; म्हणून देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक बळकट असणे महत्त्वाचे आहे. शत्रूला पराभूत करण्यासाठी शत्रूच्या लढण्याच्या इच्छाशक्तीला छेद देणे महत्त्वाचे आहे. शत्रूची युद्धाची क्षमता कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सरकारच्या पाठीशी सर्व जनतेने ठामपणे उभे राहिले पाहिजे.

उ. ‘जातीभेद आणि पंथभेद विसरून आपण या देशाचे नागरिक आहोत’, ही भावना लक्षात ठेवून संघटितपणे राष्ट्रीय सहजीवन जगण्याचा संकल्प प्रत्येकाने करणे नितांत आवश्यक आहे.

ऊ. भ्रष्टाचार, घुसखोरी या आणि अशा राष्ट्रघातक प्रवृत्तींना विरोध करून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी डोळ्यांत तेल घालून आपल्यालाच देशात वावरायचे आहे. हे दायित्व देशाचे नागरिक म्हणून स्वीकारले पाहिजे.

(समाप्त)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते, डोंबिवली. (११.५.२०२५)