गंगामातेच्या रक्षणासाठी नि:स्वार्थपणे कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता !

‘कोटी कोटी जिवांना मोक्ष प्रदान करणार्‍या गंगा नदीचे हिंदूंच्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे, तसेच ती ३० कोटी लोकांची जीवनदायिनी आहे. गेल्या काही दशकांमध्ये या गंगा नदीमधील जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे प्रदूषण थांबवून तिचे पावित्र्य रक्षण करणे, हे अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी त्यांचे जीवनकार्य बनवले आहे. गंगा नदीचे प्रदूषण थांबवणे, गंगा नदीच्या काठावर औद्योगिक प्रदूषणकारी प्रकल्पांना प्रतिबंध करणे आणि गंगाजलावर संशोधन करणे यांसाठी ते गेल्या २० वर्षांपासून निष्काम कर्मयोग्याप्रमाणे कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांची साधना होऊन आध्यात्मिक उन्नतीही होत असून त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. गंगा नदीच्या ‘न्यायमित्र’ पदावर नेमणूक

गेल्या अनेक वर्षांपासून ७१ वर्षीय अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता गंगानदीच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची नोंद घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना गंगा नदीचे ‘न्यायमित्र’ या पदावर नेमले आहे. त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालय, उत्तराखंड उच्च न्यायालय, तसेच सर्वाेच्च न्यायालय यांच्याकडे गंगा नदीच्या संदर्भातील आलेली सर्व प्रकरणे अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता पहातात.

२. गंगानदीच्या रक्षणासाठी केलेले विशेष कार्य

अ. गंगा नदीवरील मोठे जलविद्युत् प्रकल्प स्थगित करणे : गंगानदी निरोगी रहाण्यासाठी ती अविरल आणि निर्मल असणे आवश्यक आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात उत्तरांचलमध्ये जलविद्युत् प्रकल्पांसाठी गंगा नदीवर लहान-मोठे २६४ बांध बांधण्यात येणार होते. त्यात ३ मोठ्या प्रकल्पांसाठी नदीमध्ये मोठे बोगदे खणण्यात येणार होते. त्यामुळे नैसर्गिक प्रकोप होण्याची भीती होती. हे लक्षात घेऊन अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी उच्च न्यायालयात याचिका केली, तसेच शंकराचार्य, प.पू. गोविंदाचार्यजी महाराज, जलपुरुष राजेंद्र प्रसाद यांच्यासह तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन विषय उपस्थित केला. त्यामुळे हे मोठे प्रकल्प स्थगित झाले.

गंगा संरक्षणासाठी दशकांपासून काम करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयातील अ‍ॅड. अरुण कुमार गुप्ता यांच्यासोबत विशेष संवाद !
Vodcast with Adv. Arun Kumar Gupta, Allahabad HC, who has worked for Ganga protection for decades

आ. अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे तक्रार : गंगा नदीच्या क्षेत्रातील सांडपाणी नदीच्या पात्रात सोडण्यात येत होते. प्रक्रियाविरहित सांडपाणी नदीच्या पात्रात सोडल्यामुळे जलप्रदूषण थांबणे अशक्य आहे, ही गोष्ट अधिवक्ता गुप्ता यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने काशी, प्रयागराज आणि कानपूर या प्रमुख ठिकाणी ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ राबविण्यात आले.

इ. गंगा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपतींचे साहाय्य घेणे : तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद उत्तरप्रदेशमध्ये आले असता अधिवक्ता गुप्ता यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना गंगा नदीच्या शुद्धीकरणाविषयी उपाययोजना सुचवल्या. माजी राष्ट्रपतींनी ती सर्व माहिती भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारला पाठवली. त्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारने त्या सर्व उपाययोजना कार्यवाहीत आणल्या.

ई. शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन गंगा नदीच्या वैज्ञानिक आणि शास्त्रीय माहितीचा प्रसार : अधिवक्ता गुप्ता हे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना गंगा नदीचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय महत्त्व सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गंगानदीविषयी जागरूकता निर्माण होते.

उ. गंगा नदीवरील कायद्याचा मसुदा बनवण्यामध्ये सहभाग : ‘राष्ट्रीय नदी गंगा (कायाकल्प, संरक्षण आणि व्यवस्थापन), २०१७’ या विधेयकासाठी मसुदा सिद्ध करण्यात आला आहे. त्यात अधिवक्ता गुप्ता यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. हा कायदा कधीही संसदेत सादर होऊ शकतो.

३. ‘कोरोना’ महामारी थांबवू शकणार्‍या गंगाजलाद्वारे ‘नॅझल स्प्रे’ची निर्मिती

गंगा नदीच्या पाण्यापासून ‘बॅक्टेरिओफेज’ असलेला ‘नॅझल स्प्रे’

वर्ष २०१९ मध्ये देशात कोरोना महामारीने मृत्यूचे थैमान घातले होते. तेव्हा गंगा नदीच्या काठावरील शहरांतील कोविडच्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक होते, असे अधिवक्ता गुप्ता यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गंगाजलावर आधारित प्रबंध लिहून तो तत्कालीन राष्ट्रपतींकडे पाठवला, तसेच काशी विश्व विद्यालयातील तज्ञांची भेट घेऊन त्यांनाही गंगाजलामध्ये कोरोनामारक ‘बॅक्टेरिओफेज’ असल्याची माहिती दिली. यासंदर्भात विशेष प्रक्रिया पार पाडल्यानंतर काशी हिंदु विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी गंगा नदीच्या पाण्यापासून ‘बॅक्टेरिओफेज’ असलेला ‘नॅझल स्प्रे’ सिद्ध केला.

४. संत आणि मान्यवर यांच्याकडून कार्याचा गौरव

अ. अधिवक्ता अरुण गुप्ता यांच्या गंगानदी रक्षणाच्या कार्याने प्रसन्न होऊन कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी विशेष ‘गंगासभा’ कार्यक्रमात त्यांना ‘गंगारत्न’ ही पदवी बहाल केली आणि आशीर्वाद दिले.

आ. उत्तरप्रदेशमध्ये एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये माजी निवडणूक आयुक्त कृष्णमूर्ती आणि उत्तरप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष हृदयनारायण दीक्षित यांच्या हस्ते ‘उत्तरप्रदेश रत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.

इ. योगऋषी रामदेवबाबा यांनी गंगारक्षणाच्या कार्याचे कौतुक केले.

ई. तत्कालीन केंद्रीय जलशक्ती मंत्री उमा भारती यांनी अधिवक्ता अरुण गुप्ता यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना गंगारक्षणाचे कार्य करण्याची वेळोवेळी प्रेरणा दिली.

५. गंगा नदी रक्षणाच्या माध्यमातून अधिवक्ता अरुण गुप्ता यांची मोक्षाकडे वाटचाल !

गंगा नदीच्या रक्षणासाठी निरपेक्ष भावाने अथक परिश्रम करत असल्याने अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे. २६ सप्टेंबर २०२३ या दिवशी अधिवक्ता गुप्ता यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.

६. गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये मार्गदर्शन

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता उपस्थित होते. तेथे त्यांनी ‘गंगेची वैज्ञानिकता आणि गंगेच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न’या विषयावर उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शन केले.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷