श्री विठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षण !

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ।
युद्ध करावयाचेच असते ।
ब्राह्मतेज-क्षात्रतेज जागृत करून ।
हाच कर्मयोग ।
हीच भक्ती श्री विठ्ठलाची ।
भक्त हो, अखंड सावधान ।

१. श्री विठ्ठलाच्या आवडीचा विषय, म्हणजे उपासक भक्त ! 

जो आपल्या कल्याणकारी, श्रेयस ध्येयापासून, उद्दिष्टापासून आणि ते साध्य करण्यासाठी अत्यावश्यक असणार्‍या साधनांपासून स्वतःला वेगळा समजत नाही अन् त्या मान्यतेप्रमाणे आचरण करण्यासाठी अखंड सावधान असतो, तो उपासक भक्त श्री विठ्ठलाच्या आवडीचा विषय असतो. या भक्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी साधने, म्हणजे त्या निर्गुण परब्रह्माचे सगुण-साकार रूप होय. हे सगुण-साकार रूप, म्हणजे माझा विठ्ठल, माझा पांडुरंग, माझी इष्ट देवता ! भक्तासाठी श्रीविठ्ठल परब्रह्माने सगुण-साकार रूप धारण करून दोन्ही हात कमरेवर ठेवून समाधानाने साक्षीरूपाने उभे राहिला.

२. भक्ताचा कर्मयोग 

जो भक्त आई-वडिलांची, म्हणजेच आपल्या साधनक्षेत्राची आणि तीर्थक्षेत्रांची सेवा एकनिष्ठेने, एकाग्र चित्ताने, कोणतीही अपेक्षा न ठेवता करतो, त्याची ही निष्काम सेवा, म्हणजे परब्रह्माने सगुण-साकार अवतारकार्यामध्ये सांगितलेला कर्मयोग होय. या श्रेष्ठ भक्ताचा ‘बोले तैसा चाले’ हा कर्मयोग पाहून श्रीविठ्ठल प्रसन्न मुद्रेने कर्मयोगी भक्ताने आसन म्हणून दिलेल्या विटेवर कमरेवर दोन्ही हात ठेवून युगानुयुगे उभा आहे.

३. विठ्ठलाची मूर्ती भक्तांना काय सांगते ? 

श्रीविठ्ठलाची सगुण-साकार मूर्ती ब्राह्मतेज-क्षात्रतेजयुक्त कर्मयोगाचे प्रतीकरूप आहे. युगानुयुगे ती मनुष्याला कर्मयोगाचे महत्त्व सतत स्मरण करून देते. ती जणू आपल्या भक्तांना सांगत आहे, ‘तू भिऊ नकोस. तू केवळ या कर्मयोगाचे आचरण कर. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुझा योगक्षेम वहात आहे.’

४. पिता-पुत्र परंपरेतून आलेला आणि सद्गुरु-शिष्य परंपरेने चालू राहिलेला कर्मयोग श्री विठ्ठलाने भक्तांना सांगणे

जो कर्मयोग सृष्टीच्या प्रारंभी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला, मनूने इक्ष्वाकूला सांगितला, असा पिता-पुत्र परंपरेतून आलेला आणि पुढे सद्गुरु-शिष्य परंपरेने चालू राहिलेला हा कर्मयोग श्रीविठ्ठल आजही आपल्या भक्तांना सांगत आहेत. याची अनुभूती येण्यासाठी हे रूप पहाण्याची दृष्टी आणि ते श्रवण करण्याची शक्ती उपासक भक्तामध्ये असणे आवश्यक आहे.

५. तीर्थक्षेत्रे पवित्र आणि सुरक्षित ठेवणे, हे उपासक भक्तांचे उत्तरदायित्व !  

कर्म भक्तानेच करायचे आहे. भक्त करत असलेले कर्म श्रीविठ्ठल साक्षीभावाने कमरेवर दोन्ही हात ठेवून पहात आहे. ‘यथार्थ निष्काम सेवा आणि निष्काम कर्मामध्येच परब्रह्म आहे’, असा आत्मविश्वास उपासक भक्ताला देत श्रीविठ्ठल उभा आहे’, अशी श्रद्धा उपासक भक्ताची आहे. कर्मयोग साध्य करण्यासाठी जसा सुदृढ देह आवश्यक आहे, तशीच आवश्यकता कर्मयोगाचे दुसरे साधन असणार्‍या तीर्थक्षेत्रांची आहे. तीर्थक्षेत्रे ही कर्मयोग-भक्ती करण्याची साधने आहेत. ही साधने (क्षेत्र देह)सुद्धा उपासक भक्तांचा देहच आहे; म्हणून आपल्या देहाप्रमाणे ही तीर्थक्षेत्रे पवित्र आणि सुरक्षित ठेवणे हे सर्वांचे, विशेषतः उपासक भक्तांचे उत्तरदायित्व आहे.

६. कर्मयोग आचरणे, हीच विठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती ! 

उपासक भक्त आपले धर्मकर्तव्य करत आहे कि नाही, हे कर्मयोगाची महती सांगणारे विठ्ठलाचे सगुण-साकार रूप विटेवर उभे राहून, कमरेवर दोन्ही हात ठेवून, अखंड साक्षीभावाने पहात आहे. हा कर्मयोग आचरणे, हीच सगुण-साकार श्रीविठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती आहे.

– श्री. अनिल सावंत, मुलुंड, मुंबई.