सध्या चालू असलेल्या ‘आषाढी वारी’च्या निमित्ताने…

१. चंदनाप्रमाणे कार्यकर्त्याने घडणे महत्त्वाचे !
संत तुकाराम महाराज येथे २ प्रभावी दृष्टांत देतात चंदन आणि परीस. या दोन्हींचा मूलभूत संदेश असा आहे की, खरा सज्जन स्वतःच्या गुणांनी जग समृद्ध करतो. त्याला स्वतःचे विज्ञापन करावे लागत नाही, त्याचे अस्तित्वच परिवर्तन घडवते.

चंदन स्वतः सुगंधित असते. ते लावले की, सर्व परिसर सुगंधित होतो; म्हणून देवपूजेत नैसर्गिक सुगंधी चंदनाचा टिळा देवांना लावतात. पूजा झाली की, भक्त स्वतःला चंदन टिळा लावतो. चंदनाचा सौम्य सुगंध, पावित्र्य आणि प्रसन्नता सर्वत्र पसरते, तसेच सज्जन व्यक्तीचे गुण सांगावे लागत नाहीत. त्यांच्या संपर्कात आले वा त्यांच्याशी संवाद साधला की, आपोआप आपल्याला सद्विचारांचा लाभ होतो. समाजातील कार्यकर्त्याने आपल्या शुद्ध देशभक्तीचा सुवास पसरवून समाजात सौदार्ह द्यावे आणि समरसतेची गंगा निर्माण करावी.
चंदनाप्रमाणे संत, सज्जन, नेता आणि कार्यकर्ता आत बाहेर सुगंधीच असतात. ते स्वतः चंदनाप्रमाणे झिजून संपतात; पण समाजाला ज्ञान, करुणा आणि प्रेम देऊन संघटित ठेवतात. चंदनाचा वृक्ष सुगंध देण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही. सुगंध हा त्याचा सहजस्वभाव आहे. त्याचप्रमाणे सज्जन व्यक्तीच्या अंगी दया, करुणा, सत्य, प्रेम, समता आणि परोपकार हे गुण सहज नांदत असतात. त्याला कृत्रिमपणे चांगूलपणाचे प्रदर्शन करावे लागत नाही. असे चंदनासारखे कार्यकर्ते आपण स्वतः होऊ आणि नवीन कार्यकर्ते घडवूया.
२. सत्संग : आत्मोन्नतीचा सर्वांत प्रभावी मार्ग
‘वेधलिया धन्य जाती’ या ओळीत संत सांगतात की, चंदनाच्या सान्निध्यात येणारे इतर वृक्षही सुगंधित होतात. हा केवळ वनस्पतीशास्त्राचा दृष्टांत नसून सत्संगाचे शाश्वत तत्त्व आहे. माणूस ज्या संगतीत रहातो, त्याचे विचार, संस्कार, वर्तन आणि जीवन तशाच प्रकारे घडत जाते; म्हणूनच भारतीय संस्कृतीत सत्संग हा आत्मोन्नतीचा सर्वांत प्रभावी मार्ग मानला गेला आहे. धार्मिक वैचारिक बैठक, सेवाभावी संस्थेचे सदस्यत्व, राष्ट्रीय राजकीय ध्येयनिष्ठा आणि निर्व्यसनी मित्र परिवार ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. ते आपण स्वप्रयत्नाने साधावे.

चंदन तो चंदनपणें । सहज गुणेसंपन्न ॥ १॥
वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ ध्रु.॥
परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥ २॥
तुका म्हणे कैंची खंती । सुजाती ते टाकणी ॥ ३ ॥ – तुकाराम गाथा, अभंग १४५४
३. संतांप्रमाणे स्वतःसह इतरांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचा निश्चय करावा !
दुसरा दृष्टांत आहे परीसाचा. परीस लोखंडाचे सोने करतो; पण स्वतःचे परीसपण कधीच गमावत नाही. खरे संत, खरे शिक्षक, खरे समाजपुरुष किंवा खरे राष्ट्रपुरुष यांचेही असेच असते. ते स्वतःचे तेज न्यून न करता इतरांच्या जीवनात मूल्यांची श्रीमंती निर्माण करतात. स्वतः प्रसिद्धी, सत्ता, सन्मान यांपासून दूर राहून एक एक व्यक्ती घडवून त्यांच्या आयुष्याचे सोने करतात. आपण आयुष्यात किमान एक व्यक्ती आणि एक उपेक्षित परिवार यांना आधार देऊन त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचा निश्चय करूया.
४. संत तुकाराम महाराज यांचा समाजातील भेदाभेद मोडून काढण्याविषयीचा उपदेश
‘सुजाती ते टाकणी’ या ओळीत संत तुकाराम महाराज सांगतात की, ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचे चारित्र्य निर्मळ आहे, त्याला कोणत्याही प्रकारच्या कसोटीची भीती नसते. सोने जसे अग्नीत अधिक तेजस्वी होते, तसेच सज्जन संकटांत अधिक उजळून निघतात. संकटे आली, तर घाबरून समस्येपासून पळून जाऊ नये. त्या समस्येला धिराने तोंड दिले, तर आपण इतिहास घडवू शकतो.
या अभंगात संत तुकाराम महाराज समाजातील भेदाभेद मोडून काढतात. चंदन त्याच्या सुगंधात कोणताही भेद करत नाही. त्याच्या जवळ येणार्या प्रत्येकाला तो सुगंध देतो. त्याचप्रमाणे संतांची दृष्टी जात, पंथ, भाषा, संपत्ती किंवा पद यांवर नसून मानवतेवर असते. समाजामध्ये शिक्षण, देवदर्शन, उपासनापद्धत, अन्न, वस्त्र, निवारा यांमध्ये भेद होऊ देऊ नये, यासाठी आपण संघटित प्रयत्न करून देशात समरसता आणूया, असे संत सांगतात.
५. संतांचा राष्ट्रवाद
समरस समाज निर्माण करण्यासाठी कायदे पुरेसे नसतात, त्यासाठी सद्गुणी माणसे सरकारमध्ये असणे आवश्यक असते. असे सरकार निवडणे, हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. असे राजकीय समंजसपणाचे आपण दर्शन देऊया. ज्या समाजात सज्जनांची संख्या वाढते, त्या समाजात परस्पर विश्वास, प्रेम, सहकार्य आणि बंधूभाव वाढतो. तेथे संघर्षाऐवजी सहजीवन निर्माण होते.
संतांचा राष्ट्रवाद हा कुणाविषयी किंवा परधर्मीय यांच्याविषयी द्वेष निर्माण करणारा नाही, तर तो सद्गुणांवर आधारित राष्ट्रनिर्मितीचा आहे. जे स्वतःला राष्ट्रभक्त मानतात, ते राष्ट्रीय नागरिक आहेत, मग ते कोणत्याही धर्म, पंथ, जात यांचे असोत. राष्ट्र मोठे होते ते केवळ संपत्ती, सैन्य किंवा तंत्रज्ञान यांमुळे नाही, तर चारित्र्यसंपन्न नागरिकांमुळे ! प्रत्येक नागरिक जर चंदनाप्रमाणे सुगंधी स्वभावाचा आणि परीसाप्रमाणे इतरांना उन्नत करणारा झाला, तर संपूर्ण राष्ट्र नैतिक शक्तीने समृद्ध होईल.
संतांच्या दृष्टीने राष्ट्रसेवा, म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनात सद्गुण, परस्पर आदर, प्रामाणिकपणा, कर्तव्यभाव आणि सेवा यांची जोपासना करणे. अशा व्यक्ती कुटुंब घडवतात, कुटुंब समाज घडवते आणि समाज राष्ट्र घडवतो.
६. सत्संग : मुक्तीचा राजमार्ग
सत्संग, म्हणजे केवळ भजन-कीर्तन नव्हे; तर सत्य, सदाचार, ज्ञान आणि ईश्वरनिष्ठ जीवन जगणार्या व्यक्तींचा सहवास. सत्संगाचे परिणाम असे दिसतात, ‘सत्संग म्हणजे सज्जन व्यक्ती, मित्र आणि मार्गदर्शक भेटणे. त्यांच्या संगतीने विचार शुद्ध होतात आणि अहंकार न्यून होतो. सदाचाराची प्रेरणा मिळते, समाजसेवेची भावना जागृत होते, राष्ट्रहित वैयक्तिक स्वार्थापेक्षा मोठे वाटू लागते, जीवनात विवेक आणि करुणा वाढते, तर याउलट वाईट संगती माणसाला अधःपतनाकडे नेते, तर सत्संग त्याचे व्यक्तीमत्त्व सुवर्णमय करतो; म्हणून संतांनी सत्संगाला मुक्तीचा राजमार्ग म्हटले आहे.’
७. सशक्त भारताच्या निर्मितीसाठी…
आज समाजात तणाव, द्वेष, स्वार्थ, भ्रष्टाचार आणि परस्पर अविश्वास वाढतांना दिसतो. अशा काळात या अभंगाचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. आज प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा, ‘मी चंदनासारखा सुगंध देतो कि दुर्गंध पसरवतो ? मी परीसाप्रमाणे इतरांचे जीवन उन्नत करतो कि त्यांना खालच्या पातळीवर नेतो ? जर प्रत्येक नागरिक स्वतःच्या आचरणातून सत्य, प्रामाणिकपणा, प्रेम, समता आणि सेवा या मूल्यांचे पालन करील, तर सामाजिक समरसता अन् सशक्त भारताची निर्मिती आपोआप घडेल.
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सांगतो की, समाज पालटण्याचा सर्वात प्रभावी मार्ग , म्हणजे स्वतःमध्ये सद्गुण विकसित करणे. चंदन स्वतः सुगंधित असल्यामुळे इतरांना सुगंध देतो, तर परीस स्वतः परीस असल्यामुळे लोखंडाचे सोने करतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य स्वतः चारित्र्यसंपन्न, प्रेमळ आणि निःस्वार्थ असतो, तोच समाजात समरसता निर्माण करू शकतो अन् राष्ट्राला नैतिक सामर्थ्य देऊ शकतो; म्हणून राष्ट्रनिर्मितीचा प्रारंभ प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणातील ‘चंदनत्व’ आणि ‘परीस’ जागवण्यापासून होतो.
– श्री. विवेक प्रभाकर सिन्नरकर, वास्तूविशारद आणि ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ लेखक, पुणे. (२०.७.२०२६)
समान नागरी कायदा हवा !
श्री विठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षण !
दिंडी चालली, दिंडी चालली ।
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र