महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !

फोंडा (गोवा) – पुणे येथील किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांच्यासह बेळगाव येथील ज्येष्ठ हार्माेनियम वादक पंडित डॉ. सुधांशु कुलकर्णी यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या येथील संशोधन केंद्राला १६ आणि १७ जुलै २०२६ या कालावधीत भेट दिली. त्यांच्या समवेत तबला वादक श्री. पराग हिरवे आणि पखवाज वादक श्री. माऊली फाटक हेही उपस्थित होते. या भेटीच्या कालावधीत या सर्वांनी गायन-वादन सेवाही सादर केली. या दोन दिवसांच्या कालावधीत सर्व कलाकारांनी विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. या वेळी विश्वविद्यालयाच्या समन्वयक सुश्री तेजल पात्रीकर यांनी त्यांना संगीत संशोधनाचे केलेले विविध प्रयोग दाखवून या कार्याची माहिती सांगितली.

डावीकडून तबला वादन करतांना श्री. पराग हिरवे, पखवाज वादन करतांना श्री. माऊली फाटक, गायनसेवा सादर करतांना पंडित डॉ. संजय गरूड, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. जयवंत रसाळ आणि हार्माेनियम (संवादिनी) वादन करतांना पंडित डॉ. सुधांशु कुलकर्णी

पंडित डॉ. संजय गरूड यांच्या संगीत कार्यक्रमाचा वृत्तांत

२५ जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंडित डॉ. संजय गरूड यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रामध्ये गायनाची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या ‘शास्त्रीय गायन आणि संतवाणी’चा कार्यक्रम १७ जुलै २०२६ या दिवशी संशोधन केंद्रामध्ये सादर झाला. कार्यक्रमाच्या आरंभी पंडित डॉ. गरूड यांनी राग ‘तोडी’ सादर केला. त्यानंतर त्यांनी ‘पंढरी निवासा’, ‘बाजे मुरलियां बाजे’, ही भजने प्रस्तुत करून प्रेक्षकांना भावमय स्थितीत नेले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचे राग ‘भैरवी’तील ‘जो भजे हरि को सदा’, हे भजन ऐकून उपस्थित प्रेक्षक भावसागरात डुंबून गेले. काहींची भजने ऐकतांना भावजागृतीही झाली. या भैरवीनेच गायनसेवेची सांगता झाली.

पंडित डॉ. संजय गरूड

पंडित डॉ. गरूड यांच्या आवाजात किराणा घराण्याचा भारदस्तपणा, सूरांवर असलेली पकड आणि दमदार ताना ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये सहजपणे जाणवत होती. त्यांचा आवाज ऐकतांना ‘पंडित भीमसेन जोशी यांनाच ऐकत आहोत’, असे उपस्थितांना जाणवले. या गायनसेवेच्या वेळी हार्माेनियमवर (संवादिनीवर) साथसंगत करतांना पंडित डॉ. कुलकर्णी यांचे वादनही अप्रतिम ठरले, तसेच श्री. पराग हिरवे यांचे तबला वादन आणि श्री. माऊली फाटक यांचे पखवाज वादन यांच्या साथीमुळे प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमानंतर पंडित डॉ. गरूड, पंडित डॉ. कुलकर्णी यांच्यासह अन्य कलाकारांचा सत्कार महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला.


१. पंडित डॉ. संजय गरूड
हे पुणे येथील शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी ‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य, तसेच सवाई गंधर्व यांचे नातू कै. पंडित श्रीकांत देशपांडे यांच्याकडे सलग १४ वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. पंडित डॉ. गरूड हे किराणा घराण्यातील असून त्यांची ही ५ वी पिढी आहे. त्यांनी ‘ख्याल’, ‘ठुमरी’ आणि ‘भजन’ या गायन प्रकारांवर प्रभुत्व मिळवले आहे. त्यांना जर्मनीतील हेसन येथील विद्यापिठातून ‘डॉक्टरेट’ पदवी मिळाली आहे.

२. पंडित डॉ. सुधांशू कुलकर्णी

हे मूळचे बेळगाव येथील संवादिनी (पेटी) वादक आहेत. त्यांनी ‘हार्माेनियम’ या विषयांत ‘संगीत प्रवीण’ ही पदवी प्राप्त केली आहे. ही पदवी प्राप्त करणारे ते देशातील पहिले संगीततज्ञ आहेत. ते सध्या ‘गोवा म्युझिक कॉलेज’मध्ये कार्यरत असून विद्यार्थ्यांना हार्माेनियमचे शिक्षण देत आहेत.

पंडित डॉ. संजय गरूड यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सनातनचा आश्रम आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केल्याने थकवा दूर होणे : आमचा गेल्या १० दिवसांपासून केरळपासून दौरा चालू असल्याने आम्ही संशोधन केंद्रात आल्यावर पुष्कळ थकलेले होतो. त्यामुळे मला वाटले की, उद्या गायनासाठी आवाज लागेल कि नाही ? तेव्हा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मनातून आत्मनिवेदन केले. मी त्यांना म्हणालो, ‘‘मी तुमच्यासाठी एवढ्या लांबून आलो आहे. तुम्हीच ही सेवा करवून घ्या.’’ दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मला मी स्वर्गात असल्यासारखे वाटून माझा थकवा गायब झाला होता. या जागेमध्ये साक्षात् भगवंत आहे. येथील दैवी शक्तीमुळेच मी गायन करू शकलो. संशोधन केंद्रात गायनसेवा केल्यावर साधक प्रेक्षकांच्या रूपाने माझे गाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत पोचले, याची मला खात्री आहे.’’

आ. सनातनच्या आश्रमातील साधकांचे चेहरे साधनेमुळे तेजस्वी ! : सनातन संस्थेचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम बघितला. त्या वेळी साधकांची जी लगबग चालू होती, ती बघून ‘ही शक्ती आपल्याला कोण देतो ? भगवंतच देतो’, हेच अनुभवायला आले. तो भगवंत जरी दिसत नसला, तरी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपाने तो तुमच्यात (साधकांमध्ये) दिसतो. सर्वांचे तेजस्वी चेहरे बघितले की, हे तेज साधनेचे आहे, हे लक्षात येते. ज्या कलाकारांना ‘मी कुणीतरी वेगळा आहे’, असे वाटते. त्यांनी सनातनच्या आश्रमात यावे आणि आश्रमात येऊन शरणागती, झोकून देणे (‘सरेंडर’ भावना) शिकावे. ‘मी’पणा विसरायला लावणारी ही जागा आहे ! ‘मी’ आणि ‘माझे’ नाही, तर भगवंता सर्व ‘तुझे’ आहे, याची जाणीव वाढते.

इ. अनुभूती : माझ्यासाठी येथे काही सेवा असेल, तर मी नक्की येईन. आमचा समूह येईल. गोव्यात मी अनेक कार्यक्रम केले; मात्र संशोधन केंद्रात आलेला अनुभव माझ्यासाठी वेगळा होता. हा आनंद मला प्रेरणा देणारा ठरला आहे. मी तुम्हाला काहीतरी देऊन जाण्याऐवजी मी येथून काहीतरी घेऊन जात आहे. ‘मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आणि साधकांचा आशीर्वाद घेऊन चाललो आहे’, असे मला जाणवते. ते (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आताही येथे आहेतच आणि तेच करवून घेतात, याची मला अनुभूती आली आहे.

ई. प्रार्थना : कला प्रस्तुतीकरणाच्या गादीवर बसतांना आम्ही ‘ती नारदांची गादी आहे’, हे जाणून त्याला नमस्कार करून बसतो. ‘ही जागा तुमची आहे. तुमच्या प्रेरणेने मी सेवा करण्यासाठी येथे बसलो आहे, तर हे ‘सा, रे, ग, म…’ या सुरांनो तुम्ही गायनसेवेला या आणि माझ्याकडून गाऊन घ्या’, अशी प्रार्थना होते. भगवान शिवाने ही सृष्ट निर्माण केली. त्या शिवापेक्षा आपण मोठे असू शकतो का ? आमच्यासारख्या कलाकाराने ‘ग’ अर्थात् ‘गर्व’ करू नये. ‘मी’ (संजय गरूड यांनी) गायले नाही, तर त्यांच्याकडून गायन करवून घेणारी शक्ती इथे (संशोधन केंद्रात) आहे. ‘आमच्याकडूनही साधना करून घेऊन तुमच्यासारखे तेज आमच्या चेहर्‍यावरही येऊ दे’, हीच मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.

– पंडित डॉ. संजय गरूड