गोवा सरकारच्या ६२ संकेतस्थळांवर सायबर आक्रमण !

महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संकेतस्थळावरील सायबर आक्रमण प्रसारमाध्यमांनी ठळकपणे दाखवणे हे खेदजनक ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

पणजी, १५ मे (वार्ता.) – शासनाच्या मान्यताप्राप्त संकेतस्थळांच्या ‘होस्ट सर्व्हर’वर (संगणकीय प्रणाली) सायबर आक्रमण झाले आहे. यामुळे गोवा सरकारची ६२ शासकीय विभागांची संकेतस्थळे बाधित झाली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी १५ मे या दिवशी दिली.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘या सायबर आक्रमणामुळे महिला आणि बाल कल्याण विभागाचे संकेतस्थळ, तसेच अन्य शासकीय संकेतस्थळे यांवर ‘कॅसिनो’ची विज्ञापने अन् अशोभनीय लिखाण दिसू लागले आहे. विशेष म्हणजे काही प्रसारमाध्यमांनी महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संकेतस्थळावरील सायबर आक्रमण ठळकपणे दाखवले, जे खेदजनक आहे. यामुळे संपूर्ण परिस्थितीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला आणि सायबर सुरक्षेच्या व्यापक सूत्राकडे दुर्लक्ष झाले. महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संकेतस्थळावरील सायबर आक्रमणाविषयी प्रथम दर्शनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि संबंधित अधिकारी या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत. ही घटना शासकीय ‘डिजिटल’ सेवांच्या विश्वासार्हतेवर आघात करणारी आहे.’’

८ मासांपूर्वीच गोवा सरकारच्या संकेतस्थळांवर झाले होते सायबर आक्रमण

विशेष म्हणजे ८ मासांपूर्वीही अशाच प्रकारे गोवा सरकारच्या काही संकेतस्थळांवर सायबर आक्रमण झाले होते. सद्यस्थितीत भारतभरातील अनेक शासकीय संकेतस्थळांवर सायबर गुन्हेगारांकडून आक्रमणे होण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर आक्रमणाद्वारे शिष्यवृत्ती योजनांशी संबंधित मार्गिकांना (‘लिंक्स’ना) लक्ष्य करून त्यावर ‘ऑनलाईन’ जुगाराची विज्ञापने अपलोड केली जात आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावरही अलीकडेच सायबर आक्रमण झाले होते.