Ladki Bahin Yojana : ५ लाख सरकारी कर्मचारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अपलाभ घेत असल्याचे उघड !

  • ‘ईकेवायसी’ केल्यानंतर ८१ लाख बोगस लाभार्थ्यांची नावे रहित !

  • संबंधितांकडून पैशांची वसुली करण्याचा आदेश !

(‘ईकेवायसी’ म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ओळख पटवणे)

मुंबई, २ जून (वार्ता.) – ‘ई-केवायसी’नंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा ५ लाख सरकारी कर्मचारी अपलाभ घेत असल्याचे आढळून आले. या सरकारी कर्मचार्‍यांची नावे योजनेतून काढण्यात आली आहेत. या कर्मचार्‍यांनी सरकारची फसवणूक करून जे पैसे लाटले, त्याची वसुली करण्याचे दायित्व संबंधित शासकीय विभागांकडे सोपवण्यात आले आहेत. यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने या कर्मचार्‍यांची नावे संबंधित विभागांकडे पाठवली आहेत.

सरकारी कर्मचार्‍यांसह अन्य ८१ लाख जणांनी या योजनेचा अपलाभ घेतला. जुलै २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना चालू झाल्यापासून सर्वाधिक २ कोटी ४७ लाख जणांनी योजनेचा लाभ घेतला. या योजनेचा अपलाभ काही सरकारी कर्मचार्‍यांनी घेतल्याचे, तसेच अन्यही काही अपात्र या योजनेचा अपलाभ घेत असल्याचे लक्षात आल्यावर लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’ पडताळणी चालू करण्यात आली. ‘ई-केवायसी’ केल्यानंतर सध्या जून २०२६ पर्यंत १ कोटी ६६ लाख जण योजनेचा लाभ घेत आहेत.

खोटी माहिती देऊन १ सहस्र २०० कोटी रुपये लाटले !

सरकारी आणि अन्य जणांनी खोटी माहिती देऊन या योजनेतून सरकारचे १ सहस्र २०० कोटी रुपयांहून अधिक रुपये लाटले. ३० मे पर्यंत ‘ई-केवायसी’ पडताळण्याचा कालावधी होता; परंतु या नंतरही खोटी माहिती देऊन लाभ घेणार्‍यांचा शोध चालू रहाणार आहे, असे महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

योजनेचा अपलाभ घेणार्‍या पुरुषांकडून पैसे वसूल करणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील ९ मासांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्‍या लाखो जणांनी अद्यापही ‘ई-केवायसी’ केलेली नाही. निकष पूर्ण करत नसल्यामुळेच ते ‘ई-केवायसी’ करणे टाळत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे पैसे रोखले जातील.

अपात्र लाभार्थी महिलांकडून दिलेले पैसे पुन्हा वसूल केले जाणार नाहीत; मात्र ज्या १ सहस्र ४०० पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

योजनेचा पैसा लाटणार्‍या पुरुषांवर कारवाईची शिफारस करणार ! – महिला आणि बाल कल्याण विभाग

‘महिला’ असल्याची खोटी माहिती देऊन राज्यातील तब्बल १४ सहस्र पुरुषांनी ‘लाडकी बहीण योजने’चा अपलाभ घेतला आहे. अशा प्रकारे फसवणूक करणार्‍या पुरुषांकडून पैसे वसूल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना दिली; परंतु कारवाई करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेले नाही. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने याविषयी महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या प्रकरणी कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१४ सहस्र पुरुषांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून लाटलेला पैसा ३० कोटी रुपयांहून अधिक होत आहे. त्यांच्याकडून पैसा वसूल करण्यात येणार असला, तरी त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:ची ओळख ‘महिला’ असल्याचे दाखवून उघडपणे सरकारची फसवणूक केली. त्यामुळे याविषयी सरकारकडून खरेतर कारवाई होणे अपेक्षित आहे. यामध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाकडून कारवाईसाठी पत्र पाठवण्यात येणार असेल, तरी यावर निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे.

संपादकीय भूमिका

खोटी माहिती देऊन पैसे लाटणार्‍या महिलांवर सरकार कारवाई करणार नाही, त्यावर महिला आणि बाल कल्याण विभाग गप्प का ? गुन्हेगारांमध्ये महिला आणि पुरुष भेद होत असेल, तर ती ‘समानता’ कशी येणार ?