गडावर स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे शिवप्रेमींना आवाहन
मणियार यांनी गडाच्या मालकी अधिकाराविषयीही केला खुलासा

गुहागर – तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगडावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गडाच्या भूसंपादनाविषयीही माहिती दिली. ‘हा गड शासनाचा असून सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळे गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांनी कोणतीही अफवा किंवा भूलथापा यांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नका. काही शंका असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या वेळी गडाच्या मालकी अधिकाराविषयी आय्याज मणियार यांनीही खुलासा केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे म्हणाले की,
१. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील प्रमुख असलेल्या गोपाळगडावर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
२. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपिठाने दिलेल्या आदेशानुसार, पुरातत्व विभागाला गोपाळगडाच्या जागेचे भूसंपादन करून एका वर्षाच्या आत ताबा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांनी गट क्रमांक ८२ आणि ८३ च्या ७.५ एकर जागेच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकार्यांशी पत्रव्यवहार केला असून शासकीय दरानुसार लागणारी रक्कम कळवण्यास सांगितले आहे.
३. गोपाळगडाच्या अंतर्गत असलेली ७.५ एकर जागा (जिथे सध्या आंब्याची बाग आहे.) वर्ष १९६० मध्ये आय्याज मणियार यांच्या आजोबांनी विकत घेतली होती. त्यानंतर वर्ष २०१६ मध्ये राज्यशासनाने हा गड ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला.
प्रशासनाला आमचे पूर्ण सहकार्य असेल ! – आय्याज मणियार यांचा खुलासा
जागेचे मालक आय्याज मणियार यांनी स्पष्ट केले की, गडाच्या अंतर्गत भागातील जागेवर आमची मालकी असली, तरी भूसंपादनाची न्यायिक प्रक्रिया पूर्ण होताच आम्ही ही जागा स्वखुशीने पुरातत्व विभागाकडे सुपुर्द करण्यास सिद्ध आहेत. यासाठी आमचे प्रशासनाला पूर्ण सहकार्य असेल.
काय आहे प्रकरण ?
गोपाळगड हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला ऐतिहासिक गड आहे. यापूर्वी शासकीय त्रुटींमुळे गडाच्या मालकी अधिकाराविषयी वाद निर्माण झाला होता; मात्र न्यायालयीन लढ्यानंतर गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला. असे असतांना पर्यटकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बागेतील २ आंबे उचलल्याच्या कारणावरून पर्यटकांना रोखून धरण्यात आल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. सागर पवार यांच्या कुटुंबाला गडाचे मालक म्हणून दावा करणारा मणियार याने रोखून ठेवले होते. हा गड आमच्या मालकीचा असल्याचे मणियार यांनी म्हटले होते. यावर शिवरायांचा गड खासगी मालमत्ता कशी असू शकते ?, असा प्रश्न दुर्गप्रेमींनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ‘शिवतेज फाऊंडेशन’चे अध्यक्ष अधिवक्ता संकेत साळवी यांनी केली होती.
गोपाळगडाच्या मालकी अधिकाराच्या कायदेशीर स्थितीविषयी सविस्तर अहवाल सादर करा !सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचे रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना निर्देश गोपाळगड हा मराठा कालखंडातील आणि आंग्रे यांच्या आरमारी व्यवस्थेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. ऐतिहासिक गोपाळगडाच्या मालकी अधिकाराची कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिककार्य मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. मंत्रालयात आयोजित एका विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सांस्कृतिककार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी , पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्ग यांच्यासह महसूल आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. |
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani