‘व्हॉट्सॲप’वर लग्नपत्रिका पाठवून त्याद्वारे भ्रमणभाषमधील माहिती चोरली जाण्यापासून नागरिकांनी सावध रहावे !

सायबर पोलिसांचे आवाहन !

छायाचित्र सौजन्य : लोकसत्ता

वसई-विरार – लग्नाची पत्रिका असल्याचे भासवून नागरिकांच्या भ्रमणभाषमध्ये घातक धारिका पाठवून त्याद्वारे अधिकोषातील रक्कम चोरली जात आहेत. वसई-विरारमध्ये अनेक प्रतिष्ठित राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या ‘व्हॉट्सॲप’वर लग्नपत्रिका पाठवली जात असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. या माध्यमातून भ्रमणभाषमधील माहिती चोरण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

एका संदेशात म्हटले होते की, आमच्या घरी ७ जून या दिवशी लग्न आहे. कृपया कुटुंबासह उपस्थित रहा. मी लग्नाची पत्रिका पाठवली आहे, ती कशी आहे ते पाहून सांगा. या संदेशाच्या जोडीला ‘Invitation Card.apk’ ही धारिका जोडलेली असते. ती धारिका ‘डाऊनलोड’ किंवा ‘इन्स्टॉल’ केल्यास भ्रमणभाषमधील अधिकोषाची माहिती, पासवर्ड, तसेच वैयक्तिक माहिती सायबर चोरांच्या हाती जाऊ शकते. त्यामुळे ‘कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या अशा धारिका डाऊनलोड करू नयेत, तसेच लग्नाची पत्रिका, छायाचित्रे किंवा व्हिडिओच्या नावाखाली आलेल्या संशयास्पद धारिका उघडण्यापूर्वी त्यांची निश्चिती करावी’, असे आवाहन पोलिसांनी केले.

संपादकीय भूमिका

केवळ आवाहन न करता अशा प्रकारे फसवणूक करणार्‍यांना सायबर पोलीस अटक करून कठोर शिक्षा कधी करणार ?, हेही त्यांनी सांगावे !