प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : किं नु हित्वा न शोचति ?
अर्थ : कशाचा त्याग केला असता शोक करण्याचा प्रसंग येत नाही ?
उत्तर : क्रोधं हित्वा न शोचति ।
अर्थ : क्रोधाचा त्याग केला असतांना शोक करण्याचा प्रसंग येत नाही.
मनाविरुद्ध घडले किंवा कुणी आपण सांगतो तसे केले नाही, कुणाचे वागणे आवडले नाही की, मनुष्याचा संताप होतो. खरेतर परिस्थितीवर किंवा दुसर्याच्या वागण्या बोलण्यावर आपल्या इच्छेप्रमाणे नियंत्रण असणे, ही गोष्ट बहुधा अशक्य आहे. तेव्हा जे आपल्या हातातील नाही, त्याकरता स्वतःचा संताप करून घेण्यात काय अर्थ आहे ?
दुसर्याचे बरे वाईट करण्याची काही विशेष सत्ता आपल्या हातात असली, तरच रागावण्याने काही लाभ झाल्यासारखा दिसतो; पण तो तेवढ्यापुरताच, वरवरचा आणि तोंडदेखला असतो. स्वतः कितीही सुधारता येते; पण दुसर्यात थोडीही सुधारणा घडवून आणणे, हे महाकठीण कर्म आहे. संतापी व्यक्तीची त्याच्या पाठीमागे बहुधा निंदाच होत असते. संतापामुळे त्याला डोके दुखणे, रक्तदाब, निद्रानाश, असे विकार सोसण्याचा प्रसंग येतो. क्रोधामुळे उत्पन्न होणारा हा परिणाम इष्ट नाही.
क्रोध येण्याच्या मुळाशी स्वतःविषयीच्या अहंकारी कल्पना असतात; म्हणून दुःख टाळण्यासाठी क्रोधापासून जितके दूर रहाता येईल, तितके चांगले !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)