
‘परमार्थ उठाठेवी करिता। लाभचि आहे तत्त्वतां ।’ उठाठेव म्हणजे धडपड, खटपट. समर्थ म्हणतात, ‘परमार्थात धडपड, खटपट कराल, तर त्याचा लाभच आहे’; पण आपण सगळी उठाठेव प्रपंचात करतो. जी जिद्द आपल्याला संसारात असते, ती जिद्द परमार्थात असत नाही. प्रपंचात जरा थोडे न्यूनाधिक झाले, तरी माणसे आकाश-पाताळ एक करून पुन्हा ते तसे व्यवस्थित होईल, याची काळजी घेतात. आधीपासून त्याची सिद्धता करतात. हे सर्व चांगलेच आहे; पण हाच आग्रह परमार्थाच्या विषयात का रहात नाही. ‘अमुक एक वस्तू नसेल, तर मला चालत नाही; तर अमुक एक गोष्ट समजल्याविना चालणार नाही’, असा आग्रह धरावा, असे का वाटत नाही ? ‘दासबोधा’त असे का लिहिले आहे ?, ‘ज्ञानेश्वरी’त असे का म्हटले आहे ? हे मला समजत नाही, हे समजले पाहिजे’, अशी जिद्द करून दिवसेंदिवस महिनोन्महिना त्याच ओवीचा विचार का केला जात नाही ? त्याचे कारण एकच तिथे उठाठेव नसते.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘श्रीआत्माराम’ ग्रंथातून)