‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’च्या भक्तनिवासात असमाधानकारक सुविधा !

मे. शुभम सर्व्हिसेसचे कंत्राट रहित

पंढरपूर – मंदिर समितीच्या वतीने भाविकांना ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’, ‘वेदांता’ आणि ‘व्हिडिओकॉन’ या भक्तनिवासांच्या माध्यमातून निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भक्तनिवासांचे व्यवस्थापन पहाण्याचे कंत्राट शुभम सर्व्हिसेस, पुणे यांना देण्यात आले होते; मात्र सदर सेवा समाधानकारक नसल्याने त्यांचे कंत्राट रहित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

या कंत्राटानुसार शुभम सर्व्हिसेस यांनी तीनही भक्तनिवासांची देखभाल, दुरुस्ती आणि कामकाज पहाणे अपेक्षित होते. भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून न देणे, स्वच्छता न ठेवणे, दुरुस्तीची कामे न करणे, दिलेल्या सूचनांचे पालन न करणे अशा अनेक तक्रारी समितीकडे आल्या होत्या. याबाबत त्यांना अनेकदा लेखी आणि मौखिक सूचना करूनही कोणत्याही प्रकारची सुधारणा केली नाही.

मंदिर समितीने या संस्थेविरुद्ध अनेक वेळा ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून आणि समज देऊनही सुधारणा होत नसल्याने शुभम सर्व्हिसेस, पुणे यांच्याशी असलेला करार रहित करण्यात आल्याचे मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी या वेळी सांगितले.