साधकाला आध्यात्मिक त्रासाशी लढायला शिकवून साधनेत पुढे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक याग होता. त्या दिवशी मला थकवा होता आणि माझी प्राणशक्ती न्यून झाली होती. त्यामुळे मी यागाला उपस्थित नव्हतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ शारीरिक थकवा असूनही ते यागाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यांनी तेथील एका साधकाला विचारले, ‘‘राम, यागाला आला नाही का ?’’ त्या वेळी साधकाने मी यागाला न येण्याची वरील कारणे त्यांना सांगितली. हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘अन्य साधकांनाही आध्यात्मिक त्रास होतात; पण ते यागाला उपस्थित रहातात ना !’’

श्री. राम होनप

नंतर त्या साधकाने वरील संभाषण मला सांगितले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘यागाद्वारे माझ्यावर आध्यात्मिक  स्तरावरील उपाय होऊ नयेत’, यासाठी अनिष्ट शक्ती मला यागाला उपस्थित रहाण्यापासून परावृत्त करतात. हे सूत्र परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या लक्षात आणून दिले आहे.’ त्यानंतर मी आश्रमातील प्रत्येक यागाला उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करू लागलो. यागाच्या वेळी तेथे उपस्थित राहिल्याने ‘आध्यात्मिक त्रास न्यून होतो आणि साधना चांगल्या तर्‍हेने होण्यास साहाय्य होते’, हे लाभ माझ्या लक्षात आले.

या प्रसंगावरून ‘गुरूंचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे’, हे मला शिकायला मिळाले आणि माझी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक