South Asian University Violence : देहलीतील साऊथ एशियन विद्यापिठाच्या भोजनकक्षामध्ये महाशिवरात्रीला मांसाहारी जेवण दिल्याने हाणामारी

नवी देहली – येथील साऊथ एशियन विद्यापिठाच्या भोजनकक्षामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मांसाहारी जेवण दिल्यावरून विद्यार्थ्यांच्या २ गटांमध्ये हाणामारी झाली. यानंतर काँग्रेसप्रणीत ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि भाजपप्रणीत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या विद्यार्थी संघटनांनी एकमेकांवर विद्यापिठात हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, तर पोलिसांनी म्हटले की, त्यांच्याकडे या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही.

१. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापिठात दोन भोजनकक्ष आहेत. त्यांपैकी एका ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीला मांसाहारी जेवण दिले जात होते. अभाविपशी संबंधित काही विद्यार्थ्यांनी भोजनकक्षामध्ये घुसून जेवण हिसकावण्याचा प्रयत्न केला. जेव्हा भोजनकक्षाशी संबंधित एका विद्यार्थिनीने याचा प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी तिच्यावर आक्रमण केले.

२. याविषयी अभाविपने म्हटले की, काही डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी उपवास मोडण्याचा प्रयत्न करत होते. महाशिवरात्रीसारख्या दिवशी मांसाहारी जेवण देणे, हा वैचारिक आतंकवाद आहे.

संपादकीय भूमिका

याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारागृहातच टाकले पाहिजे !