महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या दैवी सत्संगात सर्व साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

उद्या २६.२.२०२५ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने…

‘१८.२.२०२३ या दिवशी महाशिवरात्र होती. त्या आधी १२ दिवस दैवी सत्संगात १२ ज्योर्तिलिंगांची वैशिष्ट्ये आणि साधकांमध्ये महादेवाप्रती भावभक्ती निर्माण होण्यासाठी भगवान शिवाविषयीची सूत्रे सांगत होतो. त्या वेळी काही सत्संगांमध्ये लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. 

१. भावजागृतीचा प्रयोग १ 

भगवान शिवाला ‘मंदार’पुष्प प्रिय असल्याने ‘आपण करत असलेली १२ स्वयंसूचना सत्रे भगवान शिवाच्या चरणी मंदारपुष्पाच्या रूपात अर्पण होत आहेत’, असा भाव ठेवणे

१ अ. कु. वैदेही सावंत (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १५ वर्षे) : ‘प्रत्येक स्वयंसूचना सत्र हे प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या चरणी मंदारपुष्पाच्या रूपात अर्पण होत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग केल्यामुळे मला १२ ज्योतिर्लिंगांच्या चरणी १२ सत्रे अर्पण करता आली.’

कु. अपाला औंधकर

१ आ. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) : ‘मंदारपुष्प पांढरे शुभ्र आहे. त्यावर मातीचा एखादा डाग असला, तरीही मला ते पुष्प शिवाच्या चरणी वहाता येणार नाही. त्याचप्रमाणे मला माझे मनही असेच निर्मळ करायचे आहे’, असे वाटले. ‘मला आर्ततेने स्वयंसूचना सत्रे पूर्ण करायची आहेत’, असे वाटून माझी सत्र संख्या पूर्ण झाली.’

२. ‘केवळ ‘कैलास पर्वत’ असे नाव उच्चारल्यावर आपल्या मनाला काय जाणवते ?’, असा भावजागृतीचा प्रयोग करणे

२ अ. कु. देवांशी घिसे (आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय १० वर्षे) : ‘पूर्वी एकदा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मला त्यांच्या हातांचा सुगंध घेण्यास सांगितला होता. त्या वेळी जसा सुगंध आला होता, तसाच सुगंध मला या भावजागृती प्रयोगाच्या वेळी आला.’

२ आ. कु. वैदेही सावंत : ‘कैलास पर्वत’, असे नाव उच्चारल्यावर माझे मन शांत आणि स्थिर झाले. माझ्या मनातील सर्व विचार एका क्षणात निघून गेले आणि मला सूक्ष्मातून ‘ॐ’कार ऐकू आला.’

२ इ. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) : साधकांनी हा सूक्ष्मातील प्रयोग करण्यास आरंभ केल्यावर वातावरणात शीतलता जाणवू लागली. सत्संगात ‘शिवतत्त्व वाढले आहे’, असे मला जाणवले. मला सर्वत्र दैवी प्रकाश दिसला आणि ‘चांदण्यांचा जणू वर्षावच होत आहे’, असे दृश्य दिसले. त्यानंतर मला सर्वप्रथम विभूती आणि त्यानंतर मातीचा सुगंध आला.

३. कु. अपाला औंधकर हिने कैलास पर्वताचे भक्तीभावाने केलेले वर्णन ! 

अ. कैलास पर्वताचा भगवान शिवाप्रती प्रचंड भाव आहे; कारण ते साक्षात् भगवान शिवाचे नित्यधाम आहे. ते शिवाचे घर आहे. या पर्वताची निर्मळता आणि पावित्र्य यांमुळे साक्षात् भगवान शिव तेथे नित्य वास करतात. आपले हृदयमंदिरही ‘कैलास पर्वत’ बनवूया. त्यानंतर या हृदयमंदिरात साक्षात् भगवान शिव वास करू लागतील.

आ. कैलास पर्वत अत्यंत शीतल आणि आल्हाददायी आहे. ‘आपल्या मनात इतरांविषयी पूर्वग्रह असेल आणि प्रतिक्रिया येत असतील, तर आपण तो थंडावा कसा अनुभवणार ?’, यासाठी आपण स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केले पाहिजे.

इ. कैलास पर्वतामुळे आपल्याला निर्विचार स्थिती अनुभवता येईल. आपले हृदयमंदिर हे कैलास पर्वत असेल, तर साक्षात् शिवस्वरूप गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तेथे नित्य वास करतील.

‘शिवस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले, आपल्याच अनंत कृपेमुळे या सत्संगात आम्हाला शिवतत्त्व अनुभवता आले’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

परात्पर गुरुदेवांची,

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (८.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक