‘आमच्याकडे गोठ्यात एक गाय आहे आणि तिची दोन वासरे होती. त्या वासरांपैकी एका खोंडाचा मृत्यू झाला आहे.

१. गायीचा खोंड आजारी असतांना त्याची सर्वतोपरी काळजी घेणे
आमच्या गायीच्या खोंडाला (पोळाला) ‘लंपी’ (जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग) आजार झाल्यावर काही दिवसांतच त्याला जागेवरून उठताही येत नव्हते. आम्ही त्याला पातळ पदार्थ, जसे जलसंजीवनी (‘ओआरएस’चे पाणी), आंबील, जनावरांचे शक्तीवर्धक (टॉनिक), कडूनिंबाचा पाला, शेवग्याच्या पानांचा रस इत्यादी बाटलीने पाजत होतो. आम्ही गोठ्यात कडूनिंबाची धुरीही देत होतो. माझी आईही (सौ. सुरेखा देसाई) सकाळ-संध्याकाळ खोंडाच्या खाली घातलेली चादर पालटणे, औषध सिद्ध करून खोंडाच्या शरिरावरील फोडांना ३ वेळा लावणे, तसेच त्याला वैरण खाऊ घालणे, अशा सेवा करत असे.
२. खोंडाची आध्यात्मिक स्तरावर घेतलेली काळजी आणि त्याने दिलेला प्रतिसाद
आम्ही खोंडाजवळ भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवत होतो आणि त्याच्यासाठी नामजप करत होतो. आम्ही त्याच्या शेजारी सात्त्विक उदबत्ती लावत होतो आणि श्रीरामाचे चित्र ठेवत होतो. एक दिवस आम्ही त्याला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील गुरुदेवांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा तो ५ मिनिटे गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहात होता. तो प्रभु श्रीरामाच्याही चित्राकडे पहात असे. आम्ही ‘जय गुरुदेव’ असे म्हटल्यावर तो हुंकार देत असे.
३. ‘आमच्याशी असलेला देवाण-घेवाण हिशोब फेडण्यासाठी हा जीव आमच्या घरी आला आहे. आपण मनापासून या जिवाची सेवा करायची’, असे मी आणि माझ्या आईने ठरवले होते.
४. नंतर १५ दिवसांनी त्याने शांतपणे देहत्याग केला.
५. घराशेजारी रहाणार्या व्यक्ती आणि खोंडावर उपचार करणारे आधुनिक पशूवैद्य यांना साधिका खोंडाची एवढी सेवा करत असल्याबद्दल आश्चर्य वाटणे
अ. आमच्या शेजारी रहाणार्या व्यक्ती आणि खोंडावर उपचार करणारे आधुनिक पशूवैद्य आम्हाला विचारत असत, ‘‘समाजातील व्यक्ती त्यांच्या घरातील रुग्णाईत व्यक्तीचीही एवढी सेवा करत नाहीत. तुम्ही जनावरांची एवढी सेवा कशी करता ?’’ त्या वेळी आम्ही आमच्या शेजारी रहाणार्या व्यक्ती आणि पशूवैद्य यांना साधनेचे महत्त्व सांगितले.
आ. तेव्हा आमच्या शेजारी रहाणार्या व्यक्तींचा आमच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. आधुनिक पशूवैद्यांनी आम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण दिले.
गुरुदेव, तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. पूनम देसाई, सांगली (२३.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |