Mehbooba Mufti On Kashmir : (म्हणे) ‘काश्मीरमध्ये जर सगळे ठीक असेल, तर पाकिस्तानसमवेतचे सर्व मार्ग मोकळे करा !’

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांचे राष्ट्रघातकी वक्तव्य

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा म्हणतात की, जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे. जर सगळे ठीक असेल, तर पाकिस्तानसमवेतचे सर्व मार्ग मोकळे करा. जेणेकरून ते इथे येऊन आपण कसे रहातो आणि येथे काय आहे, ते पाहू शकतील, अशी मागणी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. (त्यासाठी प्रत्यक्ष काश्मीरमध्ये येण्याची काहीच आवश्यकता नाही. व्हिडिओ बनवूनही पाकिस्तानींना दाखवता येईल. यासाठी मेहबूबा मुफ्ती यांनीच पुढाकार घ्यावा ! वास्तविक पाकिस्तानींना काश्मीरची सध्याची स्थिती ठाऊक झाल्यानेच ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकच्या विरोधात आंदोलन करू लागले आहेत ! – संपादक)

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरचे सूत्र जिवंत ठेवून भाजप देशभरातून मते मिळवू इच्छित आहे. पाकिस्तानमधील सैन्यालाही काश्मीरचा प्रश्‍न जिवंत ठेवायचा आहे. कदाचित् भाजपलाही हे समजले असेल की, कुठेतरी स्फोट झाला पाहिजे, कुणीतरी हुतात्मा झाला पाहिजे, जेणेकरून ते देशात हिंदू-मुसलमान फूट पाडू शकतील. जम्मू-काश्मीरची समस्या तोपर्यंत सुटू शकत नाही, जोपर्यंत आपण एकाच टेबलावर येत नाही.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानींचे सर्व मार्ग बंद केल्यामुळेच काही प्रमाणात काश्मीर शांत झाला आहे. आता ते उघडून पुन्हा काश्मीर अशांत करण्याचा मेहबूबा यांचा डाव आहे, हे स्पष्टपणे दिसते. अशी मागणी केल्यावरूनच मेहबूबा यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !