संपादकीय : जसपाल राणा यांच्या जाण्याने …

जसपाल राणा

आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेते आणि  सुप्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा यांचे ४९ व्या वर्षी निधन झाले. जागतिक स्तरावर पिस्तूल नेमबाजीत आयोजित विविध स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवून भारताची मान उंचावलीच; मात्र त्याहून अधिक ‘नेमबाज प्रशिक्षक’ म्हणून हरहुन्नरी नेमबाजांना घडवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अधिक उल्लेखनीय आहे. क्रीडा संस्कृतीचा अभाव असलेल्या आणि त्याहून अधिक पिस्तूल नेमबाजीविषयी कुणाला पुष्कळशी माहिती नसलेल्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. बर्‍याचदा क्रीडापटू त्यांची कारकीर्द संपल्यावर या क्षेत्रापासून लांब जात वेगळा मार्ग चोखाळतात; मात्र जसपाल राणा यांनी याच क्षेत्रात स्वतःसारखे चिंकी यादव, अनिष भनवाला, सौरभ चौधरी असे अनेक नेमबाज घडवून जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते; मात्र ऑलिंपिक पदकाने त्यांना हुलकावणी दिली. त्यांचे हे स्वप्न वर्ष २०२४ मध्ये त्यांच्या तालमीत सिद्ध झालेली नेमबाज मनु भाकर हिने ऑलिंपिक स्पर्धेत २ कांस्यपदके जिंकून पूर्ण केले. अशा या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन भविष्यात आपल्या होतकरू नेमबाजांना मिळणार नाही. भारतीय पिस्तूल नेमबाज सातत्याने चांगली कामगिरी करत असतांना त्यांनी नेमबाजांना कधीही अल्पसंतुष्ट राहू दिले नाही; कारण ‘भारतियांसमोर खरे आव्हान हे चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इटली आदी बलाढ्य देशांच्या नेमबाजांचे आहे’, या वास्तवाचे भान त्यांनी भारतीय नेमबाजांना कधीही विसरू दिले नाही. नेमबाजांमधील गुणांची वृद्धी करून सातत्याने सरस कामगिरी करण्यासाठी नेमबाजांना सिद्ध करण्यावर त्यांचा भर असायचा. वर्ष २०२८ मध्ये ऑलिंपिक स्पर्धा आहेत. या स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न आणि सिद्धता चालवली होती. त्यांच्या जाण्याने या प्रयत्नांना खीळ बसली आहे. त्यांच्यासारखा चांगला प्रशिक्षक नसण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कशी भरून काढायची ?

एक चिरंतन वारसा 

प्रशिक्षण देतांना राणा यांचा कल नेमबाजाला कणखर बनवण्याकडे होता. ते सांगत की, खेळाडूचा खरा सराव हा पराभवानंतरच चालू होतो. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवले की, एखादा ‘शॉट’ चुकला, तरी पुन्हा सावरून एकाग्र होऊन दुसरा ‘शॉट’ खेळण्यासाठी सिद्ध होणे, हे एक कौशल्य आहे. त्याचा सराव नेमबाजीच्या तंत्राइतकेच गांभीर्याने करणे आवश्यक आहे. खेळाडूंना अपयश पचवणे कठीण जाते. ‘ते कसे पचवायचे ? आणि त्यातून शिकून उसळी मारून पुन्हा कसे यशस्वी व्हायचे ?’, हे त्यांनी शिकवले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनु भाकर हिची पॅरिस येथील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये उंचावलेली कामगिरी होय. हे यश मिळवणे तिच्यासाठी पुष्कळ कठीण होते. वर्ष २०२० मध्ये टोकियो ऑलिंपिकमध्ये मनु भाकर हिच्या पिस्तुलामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिला स्पर्धेची अंतिम फेरीही गाठता आली नव्हती. जिथे पदकाची अपेक्षा होती, तिथे या अकल्पित परिस्थितीमुळे तिच्या कामगिरीवर पूर्णपणे पाणी फिरले होते. यामुळे तिला कठोर टीकेलाही सामोरे जावे लागले. पॅरिस ऑलिंपिकपूर्वी जेव्हा ती डेहराडूनमधील राणा यांच्या अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी पुन्हा आली, तेव्हा राणा यांनी तिच्या प्रशिक्षणाचा एक अनिवार्य भाग म्हणून सामन्याच्या वेळी स्वतःचे पिस्तूल पूर्णपणे उघडून ते दुरुस्त करायला शिकवले. या तांत्रिक स्वावलंबनामुळे उपकरणांत होणार्‍या अनपेक्षित बिघाडाची भीती तिने झटकून टाकली, ज्याचा थेट लाभ तिच्या मानसिक कणखरतेमध्ये झाला.

राणा यांच्या मते तरुणांना प्रशिक्षण देणे, ही सर्वांत कठीण गोष्ट ! मात्र राणा यांनी तरुण नेमबाजांना लीलया हाताळले. त्यांच्यावर ओरडून किंवा चिडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा करण्याऐवजी शांतपणे त्यांना हाताळून ते तरुण नेमबाजांमध्ये पालट घडवून आणत असत. राणा यांनी केवळ नेमबाजीच्या तंत्रांचेच प्रशिक्षण दिले नाही, तर त्यांनी नेमबाजांचे चारित्र्य घडवण्याचे कामही केले. शिस्तीचा आग्रह धरून, आत्मसंतुष्टतेला थारा न देता आणि मानसिक दृढतेला तंत्राचाच एक भाग मानून त्यांनी भारतीय नेमबाजीला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंवर त्यांचा जो प्रभाव पडला आहे, तो पिढ्यान्पिढ्या कायम राहील. ते केवळ एक मार्गदर्शक नव्हते, तर एक असे शिल्पकार होते, ज्यांनी नवीन पिढीच्या नेमबाजांना केवळ लक्ष्याचाच नव्हे, तर स्वतःच्या मनाचाही ताबा कसा घ्यावा, हे शिकवले.

देशाला प्राधान्य

तत्कालीन राष्ट्रपती के. आर . नारायणन यांच्या हस्ते ‘पद्म श्री’ पुरस्कार स्वीकारातांना श्री जसपाल राणा

त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी कुणाचीही भीडभाड न बाळगता सरकारी यंत्रणांच्या क्रीडा धोरणांवर टीका केली. ‘भारताला ऑलिंपिकमध्ये पदके जिंकायची आहेत; मात्र आपल्याकडे या खेळाच्या आधी ६ महिने आणि खेळानंतर २ महिने ऑलिंपिकवर चर्चा होते अन् नंतर ती विरून जाते. अशाने भारतात खेळाचा दर्जा कसा उंचावणार ?’, असा रास्त प्रश्‍न ते विचारत असत.

टोकियो ऑलिंपिकनंतर राणा आणि मनु भाकर यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. त्यानंतर भाकर यांनी राणा यांच्याकडे प्रशिक्षण घेणे थांबवले. दोघांमधील संबंध इतके ताणले गेले होते की, ते पुन्हा एकत्र येतील, अशी शक्यता अल्प होती. काही काळाने ‘स्वतःची कामगिरी उंचवायची असेल, तर प्रशिक्षक राणा यांच्याविना पर्याय नाही’, हे जाणून तिने पुन्हा राणा यांना संपर्क साधला. त्या वेळी राणा यांनीही स्वतःचा अहंकार बाजूला सारून मनु भाकर हिला पॅरिस ऑलिंपिकसाठी सर्वांगाने सिद्ध केले. ‘मनु हिने पहिले पाऊल उचलले. तिच्या जागी मी असतो, तर मी एवढा मनाचा मोठेपणा दाखवू शकलो नसतो’, हेही त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले. त्यानंतर या जोडगोळीने इतिहास घडवला, तो सर्वश्रुत आहे. स्वहिताला प्राधान्य न देता रुसवे-फुगवे, मतभेद, हेवेदावे विसरून त्यांनी देशहिताला प्राधान्य दिले, हे त्यांच्यातील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ते प्रशिक्षक असले, तरी अडीअडचणींच्या काळात ते खेळाडूंच्या मागे ठामपणे उभे रहात, तसेच त्यांच्यावर अन्याय झाल्यास ते सरकारी यंत्रणांशी दोन हात करण्यास मागे पुढे पहात नसत. मनु भाकर आदी खेळाडूंना ‘खेल रत्न’ पुरस्कारापासून वंचित ठेवल्यावर त्यांनी पुरस्कार समितीला ‘त्यांच्या या निर्णयामुळे खेळाडूच्या मनोबलावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो’, हे परखडपणे सांगितले. अशा अनेक पैलूंमुळे नेमबाजांसाठी ते पित्यासमान होते.

भारतात अनेक ‘रत्न’ खेळाडू आहेत; मात्र राणा यांच्यासारखे ‘रत्नपारखी’ पुष्कळ अल्प आहेत. त्यांच्या जाण्याने खेळाडूंना हेरून त्यांच्यात विजिगीषू वृत्ती जागवणारा रत्नपारखी आपण गमावला आहे. अशा ‘रत्नपारखी’ जसपाल राणा यांना ‘सनातन प्रभात’च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !