कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !

१ विषयासाठी ६ सहस्र रुपये दिल्यास दिले जात होते पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र !

श्री कृष्णदेवराय विद्यापिठ

बळ्ळारी (कर्नाटक) – येथील प्रतिष्ठित श्री कृष्णदेवराय विद्यापिठात पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणारी मोठी टोळी (रॅकेट) कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. विद्यापिठात गेल्या अनेक वर्षांपासून हा ‘पास करण्याचा धंदा’ अत्यंत पद्धतशीरपणे चालत असल्याचे समोर आले आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून एका विषयासाठी ६ सहस्र रुपये वसूल करून त्यांना अवैधरित्या उत्तीर्ण केले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

‘युनिव्हर्सिटी कम्युटर मेन्टेनन्स सेल’ (यू.सी.एम्.सी.) या विभागाचे कर्मचारीच या ‘रॅकेट’चे मुख्य सूत्रधार आहेत. या विभागातील रियाज आणि व्यंकटेश या कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांशी पैशांच्या व्यवहाराविषयी केलेल्या संभाषणाचे ध्वीमुद्रण (ऑडिओ क्लिप) उघड झली आहे.

अभाविपकडून निदर्शने !

विद्यापिठातील या भ्रष्टाचाराचा निषेध करत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापिठाच्या परिसरात निदर्शने केली.

संपादकीय भूमिका

  • विद्यापिठातील शिक्षक असो किंवा इतर कर्मचारी हे उच्चशिक्षित असतात, त्यांना भरपूर वेतन मिळत असते, तरीही ते भ्रष्टाचाराच्या मार्ग अवलंबतात. हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
  • अशा शिक्षितांना त्याच्या विद्यार्थीदशेत धर्मशिक्षण आणि नीतीमूल्ये न शिकवल्याचा हा परिणाम आहे !