श्री क्षेत्र ओझर येथे गणेश जयंती सोहळ्‍यास सहस्रो भाविकांची उपस्‍थिती !

(डावीकडून दुसरे) ओझरचे अध्‍यक्ष बाळकृष्‍ण कवडे यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर

पुणे – अष्‍टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर येथे माघ शुक्‍ल चतुर्थीनिमित्त गणेश जयंती सोहळ्‍यास सहस्रो भाविकांच्‍या उपस्‍थितीत फुलांचा वर्षाव करून भक्‍तीमय वातावरणात श्री विघ्‍नहराचा जन्‍मोत्‍सव सोहळा साजरा करण्‍यात आला. पहाटे ४.३० वाजता मंदिर उघडून श्री विघ्‍नहर गणपति देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष बाळकृष्‍ण कवडे, उपाध्‍यक्ष तुषार कवडे, संतोष कवडे, सौ. शिल्‍पा जगदाळे आणि ग्रामस्‍थ यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी उघडले. त्‍यानंतर महाआरती करण्‍यात आली. पालखी सोहळ्‍यात श्री क्षेत्र ओझर येथील श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल प्रसादिक भजन मंडळ सहभागी झाले होते.

१. श्री विघ्‍नहराच्‍या पालखीचे स्‍वागत फुलांची उधळण करून स्‍थानिक ग्रामस्‍थांनी केले.

२. सकाळी १०.३० वाजता श्री विघ्‍नहराच्‍या पालखीचे प्रस्‍थान अंबेराई मंदिरात झाले. मंदिरामध्‍ये गेल्‍यानंतर धार्मिक विधी करून ११ वाजता श्री क्षेत्र ओझरच्‍या दिशेने पालखीचे प्रस्‍थान झाले.

३. ११.४५ वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाले. मंदिरात मोरया गोसावींच्‍या पदांचे गायन होऊन कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी यांचे देवजन्‍माचे कीर्तन झाले.

४. विघ्‍नहर्त्‍या गणरायाचे मंदिर, गाभारा, आवार आणि मंदिराच्‍या बाहेरील परिसर गणेशभक्‍तांच्‍या प्रचंड गर्दीने अन् श्रींच्‍या नामघोषामुळे परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते.

५. गणेशभक्‍तांनी ‘गणपति बाप्‍पा मोरया’च्‍या नामघोषात दुपारी १२.३० वाजता श्रींचा जन्‍मोत्‍सव सोहळा पार पाडला. त्‍यानंतर आरती घेण्‍यात आली.