अनुमाने ४० वर्षांपूर्वी प्रश्नोत्तराच्या एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.

प्रश्न : सावरकर विज्ञाननिष्ठ होते; म्हणून ते नास्तिक होते काय ?

उत्तर : सावरकर विज्ञाननिष्ठ होते, हे खरे आहे. ते ‘सर्वांनी अद्ययावत् झाले पाहिजे’, असेही म्हणत; परंतु ते नास्तिक होते, हे खोटे आहे. सावरकर यांच्या कवितेत ‘अनादी मी अनंत मी’, असे म्हटले आहे. ‘मी कोण ? तो अनादि, अवध्य कसा ? ‘मला मारणारा कुणी जन्मला नाही’, असे जेव्हा सावरकर सांगतात, त्या वेळी ‘मला’, म्हणजे शरिराला नव्हे, तर या ठिकाणी ‘मला’चा अर्थ ‘आत्मा’ असाच घ्यावयाचा असतो. त्यामुळे सावरकर नास्तिक होते, हा प्रचार खोटा ठरतो. ते मूर्तीपूजक होते किंवा काय, याविषयी दुमत असू शकते. तो वादाचा विषयही होऊ शकतो; परंतु प्रतिदिन स्नानानंतर ते अर्धा ते पाऊण घंटा खोलीत दरवाजा बंद करून पूजा करत. सावरकर यांनी विज्ञाननिष्ठा थोड्या अतिरेकी प्रमाणात लोकांसमोर मांडली; परंतु आज आपणाला काय दिसून येते ? विज्ञान हाच विज्ञानाचा शत्रू झाला आहे. प्रत्येक नवीन संशोधनासह आपण नवीन प्रदूषणाला जन्म देत आहोत. आज जेवढी काही विविध प्रकारची प्रदूषणे निर्माण झाली आहेत, ती सर्व विज्ञानाने निर्माण केलेली आहेत, असे दिसून येते. ‘वैज्ञानिक क्रांती करणे, म्हणजे त्याने निर्माण केलेल्या संकटाकडे दुर्लक्ष करणे’, असा याचा अर्थ होत नाही. – प.पू. स्वामी वरदानंद भारती