पू. संदीप आळशी यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसंदर्भात साधिकेला केलेले अनमोल मार्गदर्शन !

एकदा मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील भोजनकक्षात दुपारचा महाप्रसाद पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांच्या समवेत घेत होते. तेव्हा त्यांनी माझ्या चेहर्‍याकडे पाहिले आणि त्यानंतर त्यांचे माझ्याशी पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

पू. संदीप आळशी

१. ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण शुद्ध होऊनच बाहेर पडायचे आहे !’ – पू. संदीप आळशी

पू. संदीप आळशी : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा तुम्हाला ताण आला आहे का ?

सुश्री (कु.) सुगुणा गुज्जेट्टी : हो. पू. दादा, मध्ये मध्ये मला ताण येतो. उत्साह वाटत नाही.

पू. संदीप आळशी : या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण शुद्ध होऊनच बाहेर पडायचे आहे. ‘एखाद्या दोषामुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला नको; म्हणून आपल्याला पूर्ण शुद्ध व्हायचे आहे’, हे मनावर बिंबवायचे आहे.

२. शारीरिक त्रास असल्यास दायित्व असलेल्या साधकाला सांगून विश्रांती घ्यावी !

कु. सुगुणा गुज्जेटी

सुश्री (कु.) सुगुणा गुज्जेट्टी : वयानुसार शारीरिक वेदना, थकवा असतो, तेव्हा ही प्रक्रिया नको, असे वाटते.

पू. संदीप आळशी : शारीरिक वेदना किंवा थकवा असेल, तेव्हा तुम्ही तुमचे दायित्व असलेल्या पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर, सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत) यांना सांगून विश्रांती घ्यायला हवी. त्यानंतर सेवा चालू करू शकतो, औषधेही घ्यायला हवीत.

३. प्रत्येकामध्ये स्वभावदोष आणि अहं असल्यामुळे ते नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत !

सुश्री (कु.) सुगुणा गुज्जेट्टी : मला स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे. ‘माझी आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे’, असा विचार माझ्या मनात सतत येतो.

पू. संदीप आळशी : आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली, म्हणजे ईश्वरप्राप्ती झाली, असे नाही. ईश्वरप्राप्ती पुष्कळ दूर आहे. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकांमध्येही स्वभावदोष अन् अहं असतात. ते नष्ट करण्यासाठी आपणा सर्वांनाच सतत प्रयत्न करावे लागतात.

४. व्यष्टी साधनेवर पूर्ण लक्ष देऊन शांतपणे आणि एकाग्रतेने ही प्रक्रिया करायला पाहिजे !

पू. संदीप आळशी : जेव्हा समष्टी साधना चालू होईल, तेव्हा व्यष्टी साधना करायला अत्यल्प वेळ मिळेल. आताच (प्रक्रियेत असतांनाच) संधी आहे. तेव्हा व्यष्टी साधनेवर पूर्ण लक्ष देऊन शांतपणे आणि एकाग्रतेने ही प्रक्रिया करायला पाहिजे.

माझी स्थिती लक्षात घेऊन पू. संदीप आळशी यांनी मला मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपा आहे. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती अल्पच आहे. ‘हे गुरुदेव, आपणच आम्हाला अशी सहजपणे मार्गदर्शन करणारी अनमोल संतरत्ने दिली आहेत’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सुश्री (कु.) सुगुणा गुज्जेट्टी (वय ५४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२४)