‘भारतातील मुख्य प्रांतीय भाषा, उदा. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्याळम् इत्यादी आणि विदेशी भाषा, उदा. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, उर्दू इत्यादी यांच्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या काय भेद आहे ? या सर्वांची उत्पत्ती कोणत्या काळात, कशी अन् का झाली ?’, यांसंदर्भात मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. (भाग २)
या लेखातील भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/870348.html
४. ‘तमिळ’ भाषेची निर्मिती
‘इ.स. ० ते १०० या कालावधीत तमिळ भाषेची निर्मिती झाली. त्या काळात रजोगुण आणखी वाढला. त्यामुळे काही ज्ञानी जिवांना नवीन भाषा निर्माण करण्याची प्रेरणा झाली. त्या ज्ञानी उपासकांनी ‘कात्यायनी’ या रज-रजोगुणी (टीप) देवीला प्रसन्न करून घेतले. तेव्हा कात्यायनीदेवीने ‘भिरू’ या नरदेवाला पृथ्वीवर जन्म दिला. (टीप : कात्यायनीदेवीला ‘रज-रजोगुणी’, असे का म्हटले आहे ? : काही देवी सत्त्वगुणी, काही देवी रजोगुणी आणि काही देवी या तमोगुणी असतात. कात्यायनीदेवी ही मुळात रजोगुणी आहे. तिने जेव्हा तमिळ भाषेच्या निर्मितीच्या प्रेरणेचे कार्य केले, तेव्हा तिच्यातील रजोगुण अधिक कार्यरत झाला. त्यामुळे तिला ‘रज-रजोगुणी’, असे म्हटले आहे.)
४ अ. ‘भिरू’ या शब्दाचा अर्थ : ‘भि’ म्हणजे भ्रमण, ‘रू’ म्हणजे प्रसार. विविध ठिकाणी भ्रमणाद्वारे भाषेचा प्रसार करतो तो भिरू.
४ आ. ‘भिरू’ला ‘नरदेव’, असे का म्हटले आहे ? : कात्यायनीदेवीच्या आशीर्वादाने जन्माला आलेल्या भिरूमध्ये अर्धे मनुष्यत्व आणि अर्धे देवत्व आहे. त्यामुळे त्याला ‘नरदेव’, असे म्हटले आहे.
४ इ. ‘भिरू’चे कार्य : ‘भिरू’मध्ये रजोगुण अधिक असल्याने तो एका ठिकाणी न रहाता विविध ठिकाणी सतत भ्रमंती करायचा. त्याच्या मुखातून तमिळ भाषा सहजतेने प्रगट होत होती. त्यातून गावागावांमध्ये तमिळ भाषेचा प्रसार झाला. गावातील लोकांच्या सहज बोलीतून तमिळ भाषा प्रचलित होऊ लागली; परंतु ‘ही एक प्रगत भाषा असून तिला नियमांचे बंधन असावे’, असे काही ज्ञानी जिवांना वाटले आणि त्या ज्ञानी जिवांनी तमिळ बोलीला भाषेचे स्वरूप दिले. त्यानंतर त्या भाषेचा प्रसार समाजात हळूहळू होऊ लागला.

५. ‘तेलुगु’ भाषेची निर्मिती
इ.स. २०० मध्ये लोक ‘सुब्रमण्यम्’, म्हणजे कार्तिकेयदेवाची उपासना करत होते. त्या काळी काही ज्ञानी पंडितांना कन्नड भाषा कठीण वाटू लागली. त्यांनी कार्तिकेयदेवाची उपासना करून नवीन भाषेच्या निर्मितीसाठी त्याला विनवणी केली. तेव्हा तो प्रसन्न झाला. कार्तिकेयदेवाचा ‘भिरूपाक्ष’ नावाचा एक गण होता. त्याने ‘तेलुगु’ या भाषेची निर्मिती केली.
५ अ. ‘भिरूपाक्ष’ या शब्दाचा अर्थ : ‘भिरू’, म्हणजे भ्रमंती आणि ‘पाक्ष’, म्हणजे स्वभाव. ‘भ्रमण करणे’, हा ज्याचा स्वभाव आहे, तो ‘भिरूपाक्ष’ होय. या उपशक्तीला ‘रजोत्कर्ष’, असे म्हणतात. भिरूपाक्षने तमिळ भाषेतील रजोगुण वाढवून नवीन भाषेची निर्मिती केली. त्याने तेलुगु भाषेची निर्मिती केली.
५ आ. ‘भिरूपाक्ष’चे कार्य : भिरूपाक्षने तमिळ भाषेला नूतन स्वरूप देऊन तेलुगु भाषेची निर्मिती आणि तिचा प्रसार केला. ही भाषा व्यावहारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे; परंतु आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ नाही. तमिळ भाषेत वेद, पुराणे, देवता आणि गुरु यांविषयीचे भाववाचक शब्द अधिक आहेत. त्या तुलनेत तेलुगु भाषेत हे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे तमिळ भाषेच्या तुलनेत तेलुगु भाषेची प्रगल्भता अल्प आहे.
६. ‘मल्याळम्’ भाषेची निर्मिती
इ.स. १००० मध्ये ‘गौरांग’ नावाचे एक ऋषि होऊन गेले. त्यांचे विविध भाषांवर प्रभुत्व होते. त्यांना जगावरील संस्कृत भाषेचा प्रभाव मान्य नव्हता, तसेच संस्कृतचा कन्नड आणि तमिळ या भाषांवरील पगडा रुचत नव्हता. त्यामुळे गौरांगऋषींच्या मनात संस्कृत भाषेला विरोध करण्यासाठी नवीन भाषा निर्माण करण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी भगवान शिवाची ३० वर्षे खडतर आराधना केली. तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाला. भगवान शिवाचा ‘वसुध’ नावाचा रज-तमप्रधान गण होता. शिवाने गौरांगऋषींना नवीन भाषेच्या निर्मितीसाठी ‘वसुध’ या गणाचे साहाय्य दिले. तेव्हा गौरांगऋषींनी ‘वसुध’ या गणाच्या माध्यमातून संस्कृतचा अत्यल्प प्रभाव असलेल्या ‘मल्याळम्’ या भाषेची निर्मिती केली.
६ अ. ‘वसुध’ या शब्दाचा अर्थ : ‘वस’ म्हणजे वास असलेला आणि ‘ध’ म्हणजे धरिणी. पृथ्वीवर वास करणार्या भगवान शिवाच्या गणाला ‘वसुध’, असे म्हणतात.
६ आ. ‘वसुध’ने मल्याळम् भाषेची निर्मिती कशी केली ? : गौरांगऋषींना स्वतः निर्माण करणार असलेल्या नवीन भाषेत संस्कृत भाषा नको होती. त्यांची ही इच्छा त्यांनी ‘वसुध’ या गणाला सांगितली. ‘वसुध’ या गणाने प्रथम सरस्वतीची आराधना करून तिच्याकडून संस्कृत भाषा आत्मसात् केली. त्याने संस्कृत भाषेतील व्याकरणाचे नियम समजून घेतले. त्यानंतर त्याने भगवान शिवाची उपासना करून त्याच्याकडून ‘त्रिरोधा, त्रिअवरोधा, त्रिमधा किंवा त्रिकर्णा’, ही नावे असलेली एक सिद्धि प्राप्त केली. गौरांगऋषींच्या मार्गदर्शनानुसार ‘वसुध’ या गणाने त्या सिद्धीच्या साहाय्याने मल्याळम् भाषेची निर्मिती केली. वसुधने त्या सिद्धीला आदेश दिला की, नवीन भाषेत संस्कृत भाषा नको आणि असल्यास ती अत्यल्प असावी. त्या सिद्धीनेही मल्याळम् भाषेची निर्मिती करतांना ‘तिच्यावर संस्कृतचा फारसा प्रभाव पडणार नाही’, याची काळजी घेतली, तरीही संस्कृतचा काही अंश मल्याळम् भाषेत राहिला.
६ इ. भगवान शिवाच्या एका सिद्धीची नावे ‘त्रिरोधा, त्रिअवरोधा, त्रिमधा किंवा त्रिकर्णा’, अशी का आहेत ?
६ इ १. ‘त्रिरोधा’ वा ‘त्रिअवरोधा’ : या सिद्धीत नवीन भाषा निर्माण करण्याची क्षमता असते. ती संस्कृतमधील शब्द, व्याकरण आणि तिचा उच्चार या ३ घटकांना विरोध करून नवीन भाषेची निर्मिती करू शकते; म्हणून तिला ‘त्रिरोधा किंवा त्रिअवरोधा’, असे म्हणतात.
६ इ २. त्रिमधा : येथे ‘मध’ या शब्दाचा अर्थ ‘रस’, असा आहे. या सिद्धीमध्ये भाषेत ‘छंद’, ‘मीमांसा’ आणि ‘कारण’, यांचे सार अंतर्भूत करण्याची क्षमता आहे. यालाच ‘त्रिरस’ किंवा ‘त्रिसार’, असे म्हणतात. त्यामुळे त्या सिद्धीला ‘त्रिमधा’, असे म्हणतात. ‘छंद’ म्हणजे पद्यातील विशिष्ट लयबद्ध रचना, ‘मीमांसा’ म्हणजे तर्कशुद्ध विचार आणि ‘कारण’ म्हणजे विषयाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण. त्रिमधाला या तिन्हींचे उत्कृष्ट ज्ञान आहे.
६ इ ३. त्रिकर्णा : या सिद्धीला तीन कर्ण आहेत. त्यामुळे तिला ‘त्रिकर्णा’, असे म्हणतात. ही सिद्धि मनुष्याप्रमाणे दोन्ही कानांनी सभोवतालचे सर्व आवाज ऐकते आणि तिच्या तिसर्या कानाने, म्हणजे तिच्यातील सूक्ष्म क्षमतेने ब्रह्मांडातील कुठलाही नाद ऐकते. ज्याप्रमाणे भगवान शिवाचे दोन स्थूल आणि तिसरे सूक्ष्म नेत्र आहे, त्याप्रमाणे वरील सर्व प्रक्रियेचे वर्णन केले आहे.
७. ‘पंजाबी’ भाषेची निर्मिती
इ.स. १२०० मध्ये हिंदी भाषेचा पुष्कळ प्रसार होऊ लागला. तेव्हा संस्कृत भाषेचा हिंदी भाषेवरील पगडा अधिक होता. त्याला छेद देण्यासाठी पंजाबी भाषेची निर्मिती झाली. समाजात पंजाबी भाषेचे बीज इ.स. १२०० मध्ये निर्माण झाले; परंतु तिचा विस्तार इ.स. १५०० मध्ये झाला.
७ अ. ‘रामधीर’ नावाच्या पंडितांनी भगवान शिवाच्या ‘गहनी’ या भैरवाद्वारे पंजाबी भाषेची निर्मिती करणे : इ.स. १२०० मध्ये ‘रामधीर’ नावाच्या एका पंडितांना हिंदी भाषेतील सात्त्विकता, तिचे वर्चस्व आणि समाजावरील प्रभाव मान्य नव्हता. त्यामुळे त्यांच्या मनात नवीन भाषा निर्माण करण्याची इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी भगवान शिवाची उपासना केली. तेव्हा भगवान शिव प्रसन्न झाला आणि शिवाने रामधीर पंडितांना नवीन भाषेच्या निर्मितीत साहाय्य करण्यासाठी ‘गहनी’ नावाचा एका भैरव दिला. ‘गहनी’ या भैरवाने पंजाबी भाषेची निर्मिती केली.
७ आ. ‘गहनी’ या शब्दाचा अर्थ आणि कार्य : ज्याला भाषेचे गहन ज्ञान आहे, तो गहनी. ‘गहनी’ रज-तमप्रधान असून विद्वान आहे. त्याने रामधीर पंडितांच्या इच्छेनुसार हिंदी भाषेला छेद देणार्या पंजाबी भाषेच्या निर्मितीला आरंभ केला. गहनीने रामधीर पंडितांना नवीन शब्द, त्यांचे उच्चार आणि विशिष्ट नियम यांचे ज्ञान सूक्ष्मातून दिले.
रामधीर पंडितांनी त्या ज्ञानाचे लिखाण करून ते समाजात प्रचलित करण्याचा प्रयत्न केला. त्या भाषेला पुढे ‘पंजाबी’, असे नाव पडले. इ.स. १२०० मध्ये ‘रामधीर’ आणि ‘गहनी भैरव’ यांचे पंजाबी भाषेच्या निर्मितीचे कार्य बीजस्वरूपात होते. या कार्याला इ.स. १५०० मध्ये यश येऊन समाजात पंजाबी भाषेचा प्रसार वेगाने होऊ लागला.
८. ‘गुजराती’ भाषेची निर्मिती
इ.स. १४०० मध्ये समाजात गुजराती भाषेची बिजे रोवली गेली. तिचा विस्तार इ.स. १८०० मध्ये झाला. इ.स. १४०० मध्ये एका पर्वतावर रहाणार्या एका पंडितांना संस्कृत, मराठी, हिंदी या भाषांचा अंश असलेली; परंतु एक नवीन भाषा निर्माण करण्याची इच्छा झाली. त्या पंडितांची सूर्याची उपासना होती. त्यांनी उपासनेद्वारे सूर्याला प्रसन्न केले आणि नवीन भाषेच्या निर्मितीसाठी त्याला विनवणी केली. तेव्हा सूर्याच्या रजोगुणातून ‘आध्या’ नावाच्या कन्येची निर्मिती झाली. तिच्या प्रेरणेने त्या पंडितांनी गुजराती भाषेची निर्मिती केली.
८ अ. ‘आध्या’ या शब्दाचा अर्थ : ‘आ’ या शब्दाचा अर्थ ‘व्यापलेला’ आणि ‘ध्या’ या शब्दाचा अर्थ ‘एकत्रीकरण’, असा आहे. विविध भाषांचे एकत्रीकरण करून नवीन भाषा निर्माण करण्याची क्षमता असलेली शक्ती, म्हणजे ‘आध्या’ हाेय. तिची निर्मिती सूर्यापासून झाली असल्याने तिला ‘सूर्यकन्या’, असे म्हणतात. आध्याला ‘शिवकन्या’, असेही म्हणतात.
८ आ. ‘आध्या’ला ‘शिवकन्या’, असे का म्हणतात ? : भगवान शिवाकडे असंख्य गण आणि भैरव आहेत. त्या सर्वांमधील ज्ञानशक्तीमध्ये सूर्यापासून निर्माण झालेल्या ‘आध्या’ची अंशतः शक्ती आहे; म्हणून ‘आध्या’ला ‘शिवकन्या’, असेही म्हणतात.
८ आ १. आध्याने सूर्याच्या आज्ञेने गुजराती भाषेची निर्मिती केली. या भाषेत रजोगुण असून ‘रसिकता’ हे तिचे मुख्य वैशिष्ट्य आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२३) (क्रमशः)
|