प्रयागराज कुंभपर्व २०२५
भव्य मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंट आणि रथ यांवर साधुसंत होते स्वार !
प्रयागराज : येथे श्री पंचायती महानिर्वाण आखाड्याची मिरवणूक मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीत १ सहस्राहून अधिक साधुसंत हाती, घोडे, उंट यांवर स्वार झाले होते. या मिरवणुकीत नागा संन्यासी, महंत, श्री महंत, मंडलेश्वर आणि महामंडलेश्वर सहभागी झाले होते. महाकुंभच्या ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून संतांचे स्वागत करण्यात आले. बाघंबरी गद्दीच्या समोर असलेल्या महानिर्वाणी आखाड्याच्या भवनापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीत सर्वांत पुढे साधु-संत होते. त्या वेळी त्यांच्या हातात धर्मध्वज होता. रथावर कपील मुनि यांची मूर्ती आरूढ होती. रथावर स्वार झालेल्या साधुसंतांनी भाविकांवर फुलांची उधळण केली. उंटावर स्वार झालेल्या नागा संन्याशांनी हातात त्रिशूळ घेतले होते. नागा संन्याशांनी तलवारींची प्रात्यक्षिके दाखवली. या वेळी ‘हर हर महादेव’ असा जयघोष करण्यात आला. नागा संन्यासी हातात डमरू घेऊन ते वाजवत होते, त्यांनी वाद्ययंत्र वाजवून भक्तीभावाने मिरवणूक काढली. साधु संतांमध्ये काही जणांनी तलवार, भाला आणि गदा हातात घेतली होती.