B’desh Army Chief General Statement : आम्ही शेजारी देशांच्या विरोधात काही करणार नाही आणि त्यांनीही आमच्या विरोधात काही करू नये !

बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वकार-उझ-झमान यांचे विधान

बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वकार-उझ-झमान

ढाका (बांगलादेश) – आम्ही आमच्या शेजारी देशांसमवेत असे काहीही करणार नाही जे त्यांच्या सामरिक हिताच्या विरोधात असेल. त्याच वेळी आम्ही आशा करू की, आमचा शेजारी आमच्या हिताच्या विरुद्ध असेल, असे काहीही करणार नाही. जेव्हा आपण त्यांच्या हिताची काळजी घेतो, तेव्हा तेही तितकेच आपल्या हिताची काळजी घेतात, असे विधान बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वकार-उझ-झमान यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले. बांगलादेशात झालेल्या सत्तापालटामध्ये तेथील सैन्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जात होते. सत्तापालटानंतर भारतासमवेतचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. या पार्श्‍वभूमीवर वकार झमान यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी वरील उत्तर दिले.

जनरल वकार यांनी गेल्या वर्षीचे जनआंदोलन ऐतिहासिक असल्याचे सांगितले. निवडणुकांबाबत विचारले असता ते म्हणाले की, जनतेला आता देशात निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका हव्या आहेत अन् अंतरिम सरकारचाही हा मुख्य उद्देश आहे. निवडणूक आराखडा कार्यान्वित करण्यासाठी सैन्य अंतरिम सरकारला पूर्ण सहकार्य करेल, असे ते म्हणाले.

‘भारत आपल्यावर वर्चस्व गाजवत आहे’, असे बांगलादेशींना वाटू नये !

भारतासमवेतच्या संबंधांवर जनरल वकार म्हणाले की, भारत एक महत्त्वाचा शेजारी आहे. आम्ही अनेक प्रकारे भारतावर अवलंबून आहोत. भारतालाही आमच्याकडून सुविधा मिळत आहेत. येथून अनेक लोक उपचारासाठी भारतात जातात. आम्ही त्यांच्याकडून भरपूर वस्तू खरेदी करतो. त्यामुळे बांगलादेशाच्या स्थैर्यामध्ये भारताला खूप रस आहे. हे देणे आणि घेणे संबंध आहे. ते निष्पक्षतेवर आधारित असावे. समानतेच्या आधारावर चांगले संबंध ठेवावे लागतील; मात्र भारत आपल्यावर वर्चस्व गाजवत आहे, असे आपल्या लोकांना वाटू नये, हेही लक्षात घेतले पाहिजे.

आमचे सर्वांशी मैत्रीचे आणि कुणाशीही द्वेष न करण्याचे धोरण

म्यानमारमध्ये चालू असलेल्या गृहयुद्धामुळे सीमेवर निर्माण झालेल्या अशांततेविषयीही बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख वकार यांनी विधान केले. ते म्हणाले की, म्यानमार सीमेवरील स्थिरता बिघडणार नाही. ते आमच्या लोकांना सीमेवर मारणार नाहीत. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळेल. यामध्ये कोणतीही अडचण नाही. संबंध समान पातळीवर असावेत. आमचे सर्वांशी मैत्रीचे आणि कुणाशीही द्वेष न करण्याचे उत्कृष्ट परराष्ट्र धोरण आहे.

संपादकीय भूमिका

केवळ देशांच्या विरोधात नाही, तर स्वतःच्या देशांतील हिंदूंच्या विरोधात काही करू नये, अशी अपेक्षा भारताची असणार आहे. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण का केले जात नाही ?, हे जनरल वकार यांनी सांगितले पाहिजे !