बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येत आहे. आज बांगलादेशातील हिंदुविरोधी हिंसाचाराचा इतिहास सोडून दिला, तरी वर्तमानात घडणार्या हिंदूंच्या कत्तलींकडे वा हिंदुविरोधी हिंसाचाराकडे दुर्लक्ष कसे करता येईल ? ‘या कत्तली बांगलादेशाचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे म्हणून जगभरातील हिंदूंनी त्याकडे दुर्लक्ष करावे का ? जागृत हिंदु समाज असे दुर्लक्ष करू शकेल का ? हे आज कळीचे मुद्दे आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या आवरणाखाली बांगलादेशात गेली ५० वर्षे सातत्याने हिंदूंची कत्तल चालू आहे. त्या अनुषंगाने बांगलादेश हिंदुद्वेष्टा कसा आहे, याविषयीचे विवेचन या लेखात देत आहे.
१ डिसेंबर २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बांगलादेशात कोणत्याही कारणाने होणारा हिंसाचार हा नेहमीच हिंदुविरोधी, ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अटक करण्यामागील कारण आणि भारतासह बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याचे अमेरिकन ‘डीप स्टेट’चे षड्यंत्र’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(उत्तरार्ध)
या लेखाचा या पूर्वीचा भाग वाचण्याकरीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/868629.html
५. बांगलादेशाच्या विरोधात भारताने व्यापारी कोंडी करावी !
बांगलादेश आजही भारतीय औषध कंपन्यांवर अनेक महत्त्वाच्या औषधांसाठी अवलंबून आहे. भारताने अगदी काही ‘जीवनरक्षक’ औषधांचा पुरवठा थांबवला, तरीही बांगलादेशी सरकार आणि तेथील मुसलमान मूलतत्त्ववाद्यांना गुडघ्यांवर रांगावे लागेल, अशी आजची स्थिती आहे. पूर्वीची थकबाकी न मिळाल्याने या अस्थिर परिस्थितीत बांगूरदेशाचा वीजपुरवठा अर्ध्यावर आणून अदानी समूहाने या देशाला परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारने याआधी पाकिस्तान आणि मालदीव यांची यशस्वी व्यापारी कोंडी करून दाखवली आहे. जर भारत सरकारने जीवनावश्यक औषधांचा पुरवठा थांबवण्यासारखी पावले उचलली, तर जागतिक मानवाधिकार आणि इतर अमेरिका-युरोपमधील अनेक स्वयंसेवी संघटना ज्या आज हिंदूंवरील हिंसाचारावर मूग गिळून बसल्या आहेत, त्या शेपटीवर पाय पडल्यासारख्या भुंकायला लागतील, हेही निश्चित आहे; पण आपल्या कोणत्याही कृतीमुळे अमेरिकी ‘डीप स्टेट’ला आपल्या कारवाया भारतात चालू करता येणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे; कारण भारतातील विरोधी पक्षही याचीच वाट पहात आहे. त्यामुळे मोदी सरकार अत्यंत संयमाने या विषयाची हाताळणी करतांना दिसत आहे.
६. बांगलादेशी मुसलमानांचा स्वातंत्र्याच्या आधीपासूनचा हिंदुद्वेष
बांगलादेशी मुसलमानांचा हिंदुद्वेष तसा जुना आहे. स्वातंत्र्याआधी केलेला ‘डायरेक्ट ॲक्शन डे’ (थेट कृती दिवस), नोआखालीतील दंगे कुणीही विसरू शकणार नाही. बांगलादेशाला पश्चिम पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त करण्याच्या चळवळीतही तेथील हिंदू आघाडीवर होते. त्यामुळेच जनरल नियाझींच्या पंजाबी पाकिस्तानी सैन्याने तेव्हा वेचून वेचून हिंदूंवर अत्याचार केल्याचे दाखले आहेत. पुढे भारताच्याच साहाय्याने बांगलादेश स्वतंत्र देश बनला; पण म्हणून या बांगलादेशी मुसलमानांनी हिंदुद्वेष करणे सोडून दिले, असे नाही. अगदी शेख हसीनांच्या शासनकाळातही हिंदु मंदिरांवर आक्रमणे होतच होते. अनेक ठिकाणी हिंदु कुटुंबे दहशतीच्या छायेखाली दिवस कंठत होती. हिंदु स्त्रिया आणि मुली यांचा अनेक प्रकारे छळ केला जातच होता.
हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांविषयी असा अंदाज आहे की, बांगलादेश मुक्ती युद्धाच्या वेळी ३ लाख ते ३० लाख हिंदू मारले होते, तसेच लाखो बंगाली हिंदू महिलांवर बलात्कार झाले होते. वर्ष १९७१ चे पाकिस्तानी सैन्य आणि इस्लामी मूलतत्त्ववादी यांनी केलेल्या हिंसक अत्याचारामुळे अनुमाने १ कोटी पूर्व पाकिस्तानी लोकांनी भारतात आश्रय घेतला होता, ज्यात ८० टक्के हिंदु होते. एका आकडेवारीनुसार वर्ष १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्य आणि इस्लामी मिलिशिया (जे अर्धप्रशिक्षित असतात अन् अडचणीच्या वा आवश्यकतेनुरूप सैनिक म्हणून काम करू शकतात, असे लोक) यांच्या छळापासून वाचण्यासाठी सुमारे ८० लाख हिंदू भारताच्या विविध भागांत पळून गेले. बांगलादेश मुक्ती संग्रामानंतर असे आढळून आले की, त्यापैकी १५ लाख हिंदू भारतात राहिले, तर उर्वरित ६५ लाख बांगलादेशात परत गेले. हिंदूंवर अत्याचार करण्यात पंजाबी मुसलमानांइतकेच बंगाली मुसलमानही आघाडीवर असतात. दुर्दैवाने फाळणीचा रक्तरंजित इतिहास सांगतांना पूर्व पाकिस्तानविषयी (आजच्या बांगलादेशाविषयी) तेवढे लिहिले किंवा बोलले जात नाही.
७. बांगलादेशात कोणत्याही पक्षाची सत्ता येणे, हे हिंदूंसाठी भयावहच !
आताही बांगलादेशात जी काही उलथापालथ होते आहे, त्याचा अपलाभ घेऊन बंगाली मुसलमान हिंदूंवर अत्याचार करण्याची एकही संधी सोडायला सिद्ध नाही; कारण आज शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी घातली गेली आहे. त्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी ३ राजकीय पक्ष पुढे आलेले दिसतात. एक बेगम खलिदा झिया यांची ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’, दुसरी ‘जमियत ए इस्लामी’ आणि तिसरी अन् सर्वांत धोकादायक, तसेच मूलतत्त्ववादी असलेली ‘हिजबुल तहरिर’. यात ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ आणि ‘जमियत ए इस्लामी’ यांनी तेथील प्रशासकीय यंत्रणा कह्यात घेतलेल्या आहेत. मुळात हे दोन्ही पक्ष कडवे इस्लामी राजकारण करणारे पक्ष आहेत; परंतु सर्वांत धोकादायक, म्हणजे या उलथापालथीने ‘हिजबुल तहरिर’ पक्षालाही काही संधी मिळू शकतात. ‘हिजबुल तहरिर’ हा पक्ष आतंकवादी इस्लामी विचारसरणीचा पक्ष असून याचा खिलाफतला पाठिंबा आहे, तसेच या पक्षाचा बांगलादेशाच्या लष्करावर प्रभाव पडतांना दिसून येत आहे. या तीनही गटांनी बांगलादेशाला अधिकच इस्लामी किंवा इस्लामवादी करण्याची मागणी केलेली आहे. त्यातही ‘हिजबुल तहरिर’ या पक्षाचा बांगलादेशामध्ये शरीयत कायदा लागू करायचा आहे. हे सगळेच तेथील हिंदूंच्या दृष्टीने भयावह आहे.
रा.स्व. संघ, विश्व हिंदु परिषद यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविषयी आवाज उठवणे
रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी ‘महंमद युनूस यांच्या नेतृत्वात तेथील व्यवस्था अशा हिंसक कारवायांना आळा घालण्याऐवजी निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहे, ते चिंताजनक आहे. आपल्या संरक्षणासाठी घटनात्मक मार्गाने एकत्र येणार्या हिंदूंवर देशद्रोहासारखे आरोप ठेवणे अयोग्य आहे’, असे त्यांनी प्रतिपादन केले. ‘बांगलादेशमध्ये कोणताही हिंदू आज सुरक्षित नाही. भारतीय हिंदु समाज फार काळ या हिंसाचारावर संयम बाळगू शकणार नाही’, असे विश्व हिंदु परिषदेचे देहली प्रांताचे अध्यक्ष कपिल खन्ना यांनी म्हटले आहे.
– डॉ. विवेक राजे
८. बांगलादेशातील हिंदूंसह भारतातील हिंदूंनी कृतीशील होणे महत्त्वाचे !
या सगळ्या दंग्यांच्या आणि हिंसक आंदोलनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस अन् सैन्य यांची शस्त्रे पळवण्यात आली. हीच शस्त्रे मग तेथील हिंदूंवर आक्रमणांसाठी वापरण्यात आली. महंमद युनूस यांनी मध्यावधी सरकार स्थापन केल्यानंतर सहस्रो हिंदु शिक्षकांना मारझोड करून त्यागपत्र देण्यास भाग पाडण्यात आले. अनेक छोट्या हिंदु व्यावसायिकांना आणि शेतकर्यांना मारझोड करून त्यांच्या जागा सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले. हिंदूंच्या दृष्टीने हे अत्यंत चिंताजनक आहे. भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंवर हिंसक आक्रमणे होऊ नयेत, तेथील हिंदू समाज सुरक्षित रहावा, यांसाठी आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांच्या चौकटीत जे जे शक्य आहे, ते ते करतेच आहे. महंमद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात जिहादी इस्लामी मूलतत्त्ववादी विचारसरणी फोफावतांना दिसत आहे. तेथील हिंदू जरी घटनात्मक चौकटीत स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एकत्र आलेले दिसत असले आणि महंमद युनूस जरी मानवाधिकाराच्या गप्पा करत असले, तरी त्यांच्या सरकारमधील घटक पक्षच जिहादी मुसलमान मूलतत्त्ववादी आहेत, हे विसरता येत नाही. त्यामुळे तेथील हिंदूंनी एकत्र येऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी व्यूहरचनात्मक सिद्धता करणे आवश्यक आहे. आता बांगलादेशातील हिंदू नेमस्त राहिले, तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे आणि भारतीय हिंदूंनी तेथील हिंदूंना संपूर्ण कृतीशील पाठिंबा देणे क्रमप्राप्त आहे.
(समाप्त)
– डॉ. विवेक राजे
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र येऊन ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी व्यूहरचनात्मक सिद्धता करणे आवश्यक ! |