राष्ट्राध्यक्ष बशर अल् असद देश सोडून पळाले !
दमास्कस (सीरिया) – सीरियावर गेल्या २७ नोव्हेंबरपासून चालू असलेल्या अंतर्गत बंडाळीनंतर ८ डिसेंबरला बंडखोरांच्या ‘हयात तहरीर अल-शाम’ या गटाने सीरियावर नियंत्रण मिळवले. याला सीरियाच्या सैन्याने दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल् असद देश सोडून पळून गेले आहेत. स्वतःच्या कुटंबासमवेत एका विमानातून ते देशाबाहेर गेले; मात्र त्यांचे विमान नंतर रडारवर दिसेनासे झाल्याने ते पडले असल्याचा दावाही केला जात आहे; मात्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच असद यांनी कोणत्या देशात आश्रय घेतला, हेही स्पष्ट झालेले नाही. ५० वर्षांपूर्वी बशर अल् असद यांचे वडील हाफेज अल-असाद यांनी मोठ्या रक्तपात घडवून देशाची सत्ता कह्यात घेतली होती.
१. आता सत्तापालट झाल्यामुळे बंडखोर गटाचा प्रमुख अबू महंमद अल-गोलानी याच्या हाती देशाची सत्ता जाऊ शकते.
२. असद यांनी देश सोडल्यानंतर सीरियाच्या पंतप्रधानांनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पंतप्रधान महंमद गाझी अल् जलाली यांनी म्हटले की, ते देशातच रहातील आणि सीरियातील लोक ज्याला निवडतील त्यांच्यासमवेत काम करतील.
३. बंडखोरांनी सीरियातील ५ प्रमुख शहरांवर नियंत्रण मिळवले आहे. यांत राजधानी दमास्कस शहरासह अलेप्पो, हमा, होम्स आणि दारा यांचा समावेश आहे. ८ डिसेंबरला सकाळी बंडखोरांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला. लोक असद सरकार पडल्याचा आनंद साजरा करत आहेत. शहरातील प्रत्येक चौकात लोकांचा जमाव पाहायला मिळात असून लोक स्वातंत्र्याच्या घोषणा देत आहेत. बंडखोरांच्या कमांडरांनी राजकीय बंदीवानांची सुटका करण्याची घोषणा केली आहे
सीरियापासून अमेरिका लांबच रहाणार ! – ट्रम्प
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सीरियातील घटनेवर पोस्ट करतांना म्हटले की, सीरिया आमचा मित्र नाही. अमेरिकेचा याच्याशी काहीही संबंध नाही. हा आमचा लढा नाही. आपण यात गुंतून राहू नये आणि यापासून दूर रहावे. असद यांचा मित्र रशिया आहे; परंतु आजकाल तो युक्रेन युद्धात अडकला आहे. अशा स्थितीत सीरियात जे काही घडत आहे त्याबाबत रशिया फार काही करण्याच्या स्थितीत नाही. रशियाने अनेक वर्षे सीरियाचे रक्षण केले. रशियाने सीरिया सोडल्यास त्याचा लाभ केवळ रशियालाच होईल; कारण त्यांना सीरियाकडून काहीही मिळालेले नाही.
कोण आहेत बंडखोर?
हयात तहरीर अल-शाम संघटना ही वर्ष २०११ मध्ये अल-कायदाची थेट सहयोगी म्हणून ‘जबात अल् नुसरा’ नावाने स्थापन करण्यात आली होती. ही जिहादी विचारसरणीची संघटना मानली जाते. वर्ष २०१६ मध्ये हयात तहरीर अल-शाम संघटनेचे नेते अबू महंमद अल-गोलानी यांनी अल्-कायदाशी संबंध तोडून, कट्टर अधिकार्यांची सुटका करत धार्मिक सहिष्णुता स्वीकारण्याची शपथ घेतली आणि संघटनेची प्रतिमा पुन्हा निर्माण केली. सीरियामध्ये कट्टरतावादी इस्लामी शासन स्थापन करणे हे संघटनेचे ध्येय आहे. या संघटनेचा उद्देश असद यांना सत्तेवरून हटवणे आणि नवीन सरकार स्थापन करणे होते. त्यांना देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार हवे होते. सर्व लोकांना समान हक्क मिळावेत, अशीही मागणी होती.