J&K Temples Restoration : दक्षिण काश्मीरमधील १७ मंदिरांचा होणार जीर्णोद्धार !

जम्मू-काश्मीर सरकारकडून १७ कोटी रुपयांचा निधी संमत

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर सरकारने दक्षिण काश्मीरमधील १७ मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि संवर्धन यांचे काम प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या वेळी ज्या मंदिरांची हानी झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करण्यात येईल. या उपक्रमामुळे विस्थापित काश्मिरी हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे. खोर्‍यातील त्यांच्या धार्मिक स्थळांचे संवर्धन आणि पुनर्बांधणी करण्याची त्यांची दीर्घकाळापासून मागणी होती.

१. अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांतील मंदिरांसाठी सरकारने ही रक्कम संमत केली आहे. ज्या मंदिरांना हे साहाय्य मिळणार आहे, त्यात ममलेश्‍वर मंदिर, शिव भगवती मंदिर, पापरण नाग मंदिर आणि क्षीर भवानी मंदिर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. तसेच खिरम येथील माता रागन्या भगवती मंदिर, सालिया येथील कर्कोटक नाग मंदिर, त्राल येथील बनमीर गावातील गुफ्कराल मंदिर, द्रंगबल पंपोर येथील श्री शिदेश्‍वर मंदिर, मील मंदिर, अनंत मंदिर, अवंतीपोरा येथील मंदिर, त्रिचल येथील मंदिर, पुलवामाचे तहब मंदिर आदी मंदिरांचा यात समावेश आहे.

२. पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय विभागाने संबंधित जिल्हा उपायुक्तांच्या शिफारशींच्या आधारे मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. याअंतर्गत प्रत्येक मंदिराला त्याच्या संरचनात्मक कामांनुसार निधी दिला जाणार आहे.