गोरक्षक ऋषिकेश कामथे यांचा ‘हिंदुत्‍व शौर्य पुरस्‍कार २०२४’ या पुरस्‍काराने सन्‍मान !

श्री. ऋषिकेश कामथे यांना पुरस्‍कार प्रदान करताना  विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) (डावीकडे)

पुणे, १० डिसेंबर – येथील हिंदु हुतात्‍मा शरदभाऊ मोहोळनगर, नातूबाग, शुक्रवार पेठ येथे हिंदुहिताचे कार्य करणारे ‘गोरक्षा सामाजिक संस्‍था, महाराष्‍ट्र राज्‍या’चे गोरक्षक श्री. ऋषिकेश कामथे यांना शिवप्रतापदिनानिमित्त ‘हिंदुत्‍व शौर्य पुरस्‍कार २०२४’ या पुरस्‍काराने गौरवण्‍यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्‍हणून विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त), जगद़्‍गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे उपस्‍थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ शिवपूजनाने आणि शिव आरतीने झाला. त्‍यानंतर शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम झाला. श्री. मिलिंद एकबोटे यांनी सर्व हिंदूंना आवाहन केले की, सर्व आर्थिक व्‍यवहार हिंदूंकडूनच करावा. सर्वधर्मसमभाव न बाळगता ‘सर्व हिंदू ममभाव’, असा विचार करून आपण पुढे जायला हवे.

स्‍मिथ शिंदे, अधिवक्‍ता  अमोल डांगे, विंग कमांडर शशिकांत ओक, संभाजीनगरचे आमदार श्री. अतुल सावे, श्री. मिलिंद एकबोटे, ह.भ.प शिरीष महाराज मोरे, श्री. बाळासाहेब बामरे, श्री. ऋषिकेश कामथे

विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांनी उपस्‍थितांना संबोधित करतांना सांगितले की, जशी अन्‍य धर्मियांची एकी आहे, त्‍याचप्रमाणे आपल्‍या हिंदु बांधवांची एकी होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. येणार्‍या काळात ही एकीच आपली मोठी शक्‍ती असणार आहे.

जगद़्‍गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी उपस्‍थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जसे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्‍ट हे देशाचा ‘प्रजासत्ताकदिन’ आणि ‘स्‍वातंत्र्यदिन’ म्‍हणून आपण साजरे करतो, तसेच शिवप्रतापदिनही हिंदूंनी मोठ्या प्रमाणात स्‍वातंत्र्यदिन म्‍हणून साजरा करायला हवा.

विविध मान्‍यवरांचा गौरव ! 

छत्रपती संभाजीनगरचे आमदार श्री. अतुल सावे यांना ‘हिंदवी स्‍वराज्‍य भूषण वीर जीवा महाले पुरस्‍कारा’ने गौरवण्‍यात आले. हिंदुत्‍वाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्‍यांसाठी सदैव तत्‍पर असलेले अधिवक्‍ता अमोल डांगे यांना ‘शिवभूषण गोपीनाथपंत बोकील पुरस्‍कार’ (हा पुरस्‍कार हिंदुत्‍वासाठी कार्य करणार्‍या अधिवक्‍त्‍यांना दिला जातो.) देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. श्री. बाळासाहेब बामरे, माजी नगरसेवक पर्वती पायथा आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ अधिवक्‍ता स्‍मिथ शिंदे यांना विशेष पुरस्‍कार देऊन गौरवण्‍यात आले.