-
२०३ कोटी रुपयांची थकबाकी !
-
आतापर्यंत ५५० कोटी रुपये जमा
पिंपरी (पुणे) – शहरातील ३ लाखांपेक्षा अधिक मालमत्ताकर थकबाकी असलेल्या व्यावसायिक, औद्योगिक, निवासी मालमत्तांच्या जप्तीच्या कारवाईस लवकरच प्रारंभ होत आहे. ३ लाखांपेक्षा पुढे थकबाकी असलेल्या १ सहस्र ६५१, ५ लाखांच्या पुढे १ सहस्र ३२ अशा २ सहस्र ६८३ मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे २०३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. (मालमत्ता जप्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण करून तिचा लिलाव होणे आवश्यक आहे. त्यातून कर वेळेवर भरला नाही, तर मालमत्ता जप्त होते, असा संदेश करधारकांना मिळेल. – संपादक)
पिंपरी-चिंचवड शहरातील ६ लाख ३३ सहस्र २९४ मालमत्तांची महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाकडे नोंद आहे. त्यात ५ लाख ४१ सहस्र १६ निवासी मालमत्ता, तर ५७ सहस्र ७३३ बिगरनिवासी मालमत्ता आहेत. चालू आर्थिक वर्षांतील ९ महिन्यांत करापोटी ५५० कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा ८३ कोटी रुपयांनी अल्प आहे. ५५० कोटी रुपयांतील ८९ कोटी ८० लाख रुपये ही थकबाकीपोटी जमा झाले आहेत. (महापालिका प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर ही थकबाकी राहिली नसती ! – संपादक)