मी उपमुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत नाही ! – खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना

खासदार श्रीकांत शिंदे

मुंबई – सत्तेमधील पदाची मला कुठलीही लालसा नाही. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच मी नेटाने काम करणार आहे. राज्‍यातील सत्तेत कोणत्‍याही मंत्रीपदाच्‍या शर्यतीत मी नाही, असे स्‍पष्‍टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘एक्‍स’ खात्‍याद्वारे दिले आहे. श्रीकांत शिंदे हे महाराष्‍ट्रात उपमुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीत असल्‍याची वृत्ते काही प्रसारमाध्‍यमांवरून प्रसारित होत आहेत. यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरील स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्‍हटले, ‘एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे २ दिवस गावाला जाऊन विश्रांती घेतली. त्‍यामुळे अफवा अधिक पसरवल्‍या गेल्‍या. ‘मी उपमुख्‍यमंत्री होणार’, अशा बातम्‍या प्रश्‍नचिन्‍हे टाकून मागील २ दिवस प्रसारित केल्‍या जात आहेत. यामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही. मला उपमुख्‍यमंत्रीपद हवे असल्‍याची सर्व वृत्ते निराधार आणि बिनबुडाची आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्‍ये मंत्रीपदाची संधी होती. माध्‍यमांचा उत्‍साह आणि स्‍पर्धा आम्‍ही समजू शकतो; परंतु बातम्‍या देतांना त्‍यांनी वास्‍तवाकडे पाठ फिरवू नये, अशी माझी विनंती आहे.’