‘वर्ष २००१ मध्ये एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला ‘क्षत्रिय’ आणि ‘क्षात्रवीर’ यांच्यातील भेदाची सूत्रे लिहिण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्यावर पुढच्याच मिनिटाला मी सर्व सूत्रे आपोआप सुचल्याप्रमाणे भरभर लिहून काढली. त्यानंतर पुढे पुढे असे लक्षात येऊ लागले की, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी प्रत्यक्ष सांगितलेले नसले, तरी सेवेच्या संदर्भात बहुतांश वेळा माझ्याकडून आपोआप लेखन केले जाते. बर्याचदा मला ध्यानीमनी नसतांनाही (उदा. सकाळी झोपेतून उठल्यावर, स्नान करतांना) लिखाण करण्यासाठी सूत्रे सुचतात. याचसह साधकांशी सेवा आणि साधना यांविषयी बोलतांनाही बहुतेक वेळा ‘काय बोलायचे ?’ हे आधी ठरवलेले नसतांनाही मी कुणीतरी मला सुचवल्यासारखे बोलत असतो. मग हे कोण सुचवते ? मी नेहमी असा भाव ठेवायचा प्रयत्न करतो, ‘माझ्या अंतःकरणात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सूक्ष्मातून आहेतच आणि तेच मला बुद्धी अन् शक्ती देत आहेत.’ ‘जसे बोलविसी प्रभु तू अनंता । तसे या जना मार्ग दावीन आता ।।’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीनुसार माझ्या संदर्भात घडते’, असे मला वाटते. थोडक्यात गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरच हे सर्व मला सुचवत असतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेमुळे केवळ मलाच नव्हे, तर सनातनच्या बर्याच साधकांना अध्यात्म, साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे लिखाण आपोआप सुचत आहे. साधकांना येणार्या या अनुभूतीमुळे ‘कर्ता मी नसून गुरु आहेत’ हा भाव साधकांमध्ये निर्माण झाल्याने त्यांचा अहंभाव नष्ट होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती शीघ्रतेने होत आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आम्हा सर्व साधकांना सूक्ष्मातून अध्यात्मातील हे सारे शिकवत आहेत’, याविषयी आम्ही त्यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– (पू.) संदीप आळशी (६.१०.२०२३)
|